
मिलिंद म्हाडगुत
गोव्यातला चौदावा मराठी चित्रपट महोत्सव ९ व १० ऑगस्ट रोजी पणजी येथे होत आहे. या महोत्सवाने आपले असे स्थान निर्माण केले असले तरी आजच्या स्थितीचा विचार केल्यास या महोत्सवाला अनेक प्रश्नांची झालर लागलेली दिसून येत आहे. खरं तर मराठी चित्रपटांना आशयघन अशी पार्श्वभूमी आहे.
प्रगल्भता व प्रतिभा यांचा विचार केल्यास मराठी चित्रपट, हिंदी चित्रपटांच्या मानाने बरेच सरस ठरतात. असे असूनसुद्धा आजच्या मराठी चित्रपटांची स्थिती समाधानकारक आहे, असे बिलकूल वाटत नाही. यंदा जुलैपर्यंत पन्नासाहून अधिक मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यातल्या ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ व ‘जारण’ या तीन चित्रपटांचा अपवाद वगळता इतर सर्व चित्रपट धाराशायी झाले. आणि या तीन चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर मिळालेले रिटर्न्ससुद्धा गेल्या वर्षाच्या मानाने फारच कमी वाटतात.
‘जारण’ हा यंदाचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कमाई आहे ७.३८ कोटी. गेल्या वर्षीचा सर्वांत यशस्वी मराठी चित्रपट होता ‘नाच गं घुमा’. या चित्रपटाने गेल्या वर्षी २३ कोटीहून अधिक कमाई केली होती. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची कमाई होती वीस कोटी बारा लाख. ‘धर्मवीर २’, ‘जुने फर्निचर’, ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटांनीसुद्धा गेल्या वर्षी दहा कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली होती.
पण यंदाच्या आतापर्यंतच्या प्रदर्शित झालेल्या एकाही मराठी चित्रपटाने आठ कोटींचासुद्धा उंबरठा ओलांडलेला नाही. त्यात परत सुबोध भावे यांचा ‘संगीत मानापमान’, अलका कुबल यांचा ‘मंगला’, स्वप्निल जोशी, प्रसाद ओक यांचा ‘जिलेबी’, अशोक सराफ यांचा ‘अशी ही जमवाजमवी’, महेश मांजरेकर यांचा ‘देवमाणूस’, नुकताच प्रदर्शित झालेला तेजस्विनी पंडित यांचा ‘येरे येरे पैसा ३’ यांसारख्या बहुचर्चित मराठी चित्रपटांचे अपयश खटकल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच आता प्रेक्षकांनी मराठी चित्रपटाकडे पाठ वळवायला का सुरुवात केली आहे यावर विचार होणे आवश्यक आहे.
गोव्यात तर मराठी चित्रपटांची स्थिती अधिकच बिकट दिसते आहे. प्रेक्षक नसल्यामुळे शो कॅन्सल करावे लागत आहेत. हे मी स्वतः फोंड्याच्या चित्रपटगृहात अनेकवेळा अनुभवले आहे. आता १४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या राज्य चित्रपट महोत्सवात फक्त एकच मराठी चित्रपट सामील झाला आहे. यातूनच आजच्या गोमंतकीय मराठी चित्रपटांची परवड सूचित होते. दर्जाबाबतही आजचे मराठी चित्रपट विशेष समाधानकारक आहे असे दिसत नाही. गेल्यावर्षी नाना पाटेकरांचा ‘ओले आले’ नावाचा एक अप्रतिम चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण एरव्ही असे मराठी चित्रपट आज अभावानेच पाहायला मिळत आहेत.
मराठी चित्रपटांना योग्य चित्रपटगृहे व वेळ मिळत नाही अशी ही ओरड केली जात आहे आणि ती चूक आहे असे म्हणता येणार नाही. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘येरे येरे पैसा ३’ या चित्रपटाला मुंबईत एका हिंदी चित्रपटाकरता गाशा गुंडाळावा लागणे यातच आजच्या मराठी चित्रपटांची व्यथा प्रकट होते. नंतर मनसे व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी आवाज उठवल्यामुळे महाराष्ट्र शासनाला जाग आली हा भाग वेगळा! आता महाराष्ट्र शासनातर्फे अशा गोष्टींकरता एक योजना तयार करण्याचे चालले आहे. त्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आता यामुळे तरी मराठी चित्रपटांना ऊर्जा मिळते की काय हे बघावे लागेल. पण यात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे तो चित्रपटांचा दर्जा व प्रेक्षकांचा पाठिंबा.
पूर्वी दादा कोंडकेंचे चित्रपट हिंदी चित्रपटांशी स्पर्धा असूनसुद्धा धो धो चालायचे ते विसरता येत नाही. एवढेच कशाला महेश कोठारे, सचिन पिळगावकर यांनीसुद्धा मराठी चित्रपटांना तिकीटबारीवर महत्त्वाचे स्थान प्राप्त करून दिले होते याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मात्र ‘सैराट’, ‘बाईपण भारी देवा’, या चित्रपटांनंतर बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे हुकूमत गाजविणारे मराठी चित्रपट निर्माण झालेले नाहीत हेही तेवढेच खरे आहे.
गोव्यातही अनेक मराठी भाषाप्रेमी असूनसुद्धा मराठी चित्रपटांची अशी परवड का होते यावरही लक्ष टाकायला हवे. तसे पाहायला गेल्यास गोव्यात ‘हॅलो गंधे सर’, ‘चांदी’, ‘गड्या आपुला गाव बरा’, ‘जन्म’, ‘सावरिया डॉट कॉम’सारखे चांगले मराठी चित्रपट निर्माण झाले आहेत. पण या चित्रपटांत भरत जाधव, रीमा लागू, मकरंद अनासपुरे, मोहन आगाशे, सयाजी शिंदे, सुबोध भावे यांसारखे मराठीतले दिग्गज कलाकार असूनसुद्धा हे चित्रपट फ्लॉप ठरले होते. खरे तर हे चित्रपट मराठी असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात सुद्धा मार्केट होते. पण त्या मार्केटात हे चित्रपट टिकू शकले नाहीत, एवढे खरे.
तामिळनाडूमध्ये तामीळ, कर्नाटकमध्ये कन्नड, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू, बंगालमध्ये बंगाली असे त्या त्या स्थानिक भाषेतील चित्रपट जर चालू शकतात तर मग महाराष्ट्रात व गोव्यात मराठी भाषेतील चित्रपट का चालू शकत नाहीत हा प्रश्न उपस्थित होतोच. आणि या प्रश्नाचे उत्तर या महोत्सवात मिळविण्याचे बघितले पाहिजे. तसे झाले तरच हा महोत्सव खऱ्याअर्थी यशस्वी झाला असे म्हणता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.