
Manhole construction delay in St Inez
पणजी: खोदलेल्या खड्ड्याच्या कडा ढासळल्याने मॅनहोलच्या उभारणीला विलंब होत असल्याचे चित्र सध्या ताडमाड-सांतिनेज येथील काम पाहिल्यानंतर दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून येथे खड्डा खोदकाम करण्यात आले, परंतु बाजूच्या कडांना चिकटपणा नसल्याने त्याची माती ढासळत राहिली आहे. त्यामुळे कामाला विलंब होत आहे.
इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) वतीने काकुलो मॉलच्या पुढील बाजूस मिरामारकडे जाणाऱ्या मार्गावर अंतिम ३०० मीटर मोठी भूमिगत मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम पावसाळ्यामुळे बाकी राहिले होते.
ते काम मागील महिन्यात हाती घेण्यात आले आहे. यासाठी हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. या बंद करण्यात आलेल्या मार्गामुळे टोंककडे जाणाऱ्या वाहनांना बालभवनमार्गे जावे लागतेय. स्मार्ट सिटीची उर्वरित सर्व कामे ३१ मार्चपर्यंत संपविली जाणार असल्याचे आयपीएससीडीएलने न्यायालयाला सांगितले आहे.
मधुबन सर्कल ते तांबडीमाती चौक, भाटलेतील श्रीराम मंदिर ते सटी-भवानी मंदिर येथील रस्त्यापर्यंत भूमिगत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. शिवाय आल्तिनो येथील सरकारी वसाहतीतील रस्त्यांवरही खोदकाम गतीने सुरू असून काही चेंबरचे कामही पूर्ण झाले आहे. याशिवाय मधुबन कॉम्प्लेक्ससमोरही मॅनहोलचे काम सुरू आहे.
मधुबन कॉम्प्लेक्ससमोर खोदकामांमुळे, मडकईकरनगर ते ताळगाव रस्त्यावर आणि भाटले, शिवाय शहरातील फार्मसी कॉलेजच्या चौकात वाहनांमुळे धूळच धूळ उडत आहे. याबाबत वारंवर आवाज उठवूनही संबंधित कंत्राटदाराकडून या रस्त्यांवर पाण्याचा मारा होताना दिसत नाही. दुचाकीस्वारांना या धुळीचा त्रास खूप सहन करावा लागतो. संबंधित कंपन्यांही त्याकडे लक्ष देत नाही. आता न्यायालयानेच कान टोचल्यावर तरी कंत्राटदाराला जाग येणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.