Goa International Airport: सगळे प्रकल्प उत्तरेतच? 'खरी कुजबूज'

Dabolim Airport: दाबोळीचे समर्थन करुन जेव्हा मोपाला विरोध केला जातो, त्यावेळी गोव्यात दक्षिण व उत्तर असे दोन तट पडतात की काय असे वाटू लागले आहे.
Dabolim Airport
Dabolim AirportDasainik Gomantak

Dabolim Airport: दाबोळीचे समर्थन करून जेव्हा मोपाला विरोध केला जात होता, त्यावेळी गोव्यात दक्षिण व उत्तर असे दोन तट पडतात की काय असे वातावरण तयार झाले होते, पण नंतर गोव्यात व केंद्रात सत्ताबदल होऊन मोपाचा केवळ मार्गच खुला झाला नाही, तर प्रत्यक्ष कामालाही सुरवात होऊन तो खुला होण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.

योगायोगाची गोष्ट म्हणजे पेडणे तालुक्यात उभ्या राहिलेल्या आयुर्वेद इस्पितळाचे उद्घाटनही एकाचवेळी होत आहे. मात्र, केंद्राच्या अखत्यारीतील हे दोन्ही प्रकल्प उत्तर गोव्यात व तेही पेडणे तालुक्यात का असे सांगून काहीजण नाके मुरडताना व दक्षिण गोव्यावर हा अन्याय असल्याचा कांगावा करताना दिसत आहेत.

प्रत्यक्षात हे इस्पितळ दक्षिण गोव्यात व तेही माकाजन येथील कुष्ठरोग इस्पितळाच्या जागेत होणार होते, पण कोणत्याही नव्या प्रस्तावाला विरोध करण्याचा स्वभाव तेथे नडला असे म्हणतात.

तवडकरांचे (ध्येय) वेडे साथीदार

कुठल्याही कामाच्या फळाची पर्वा न करता जे निःस्वार्थपणे काम करतात तेच खरे कार्यकर्ते. रमेश तवडकर यांना तसलेच कार्यकर्ते मिळाल्याने आपण एवढी मोठी शिक्षण संस्था आणि लोकोत्सव आयोजित करू शकलो असे त्यांनी काल जाहीरपणे सांगितले.

आपल्या एका अशा कार्यकर्त्याचे उदाहरण देताना तवडकर म्हणाले, लोकोत्सवाची तयारी चालू असताना असाच एक कार्यकर्ता त्याला कुणीही न सांगता काम करणाऱ्या इतर कार्यकर्त्यासह एका मोठ्या डब्यात भरून भाजी आणि पाव घेऊन आला.

पुढे जाऊन तवडकर म्हणाले, असे 100 वेडे कार्यकर्ते कुणाला मिळाले तर तो माणूस कुठलेही मोठे कार्य सहज पार करू शकेल. सुदैवाने आपल्याला असे कित्येक वेडे कार्यकर्ते मिळाले. त्यामुळेच मी हे शिवधनुष्य पेलू शकलो, असे तवडकर म्हणाले.

सतीश धोंड जातीने हजर

गोव्याचे भाजपचे पूर्वीचे संघटनमंत्री आणि सध्या पश्चिम बंगालमध्ये पक्षाचे काम करणारे सतीश धोंड आणि सभापती रमेश तवडकर यांचे नाते अगदी जवळचे. यावेळी काणकोण मतदारसंघात रमेश तवडकर यांना भाजपची उमेदवारी न देता ती इजिदोर फर्नांडिस यांना द्यावी अशी मागणी भाजपातील एक गट करत असताना सतीश धोंड खंबीरपणे त्यांच्या मागे राहिल्याने तवडकरांना उमेदवारी मिळाली आणि ते जिंकूनही आले.

असे हे सतीश धोंड मागची 21 वर्षे न चुकता या लोकोत्सवाला उपस्थित राहतात. मात्र, आता त्यांना दीदींच्या प्रदेशात पाठविल्याने या 22 व्या लोकोत्सवाला ते उपस्थित राहतील की नाही हे कळत नव्हते, पण काल त्यांनी लोकोत्सवाला हजेरी लावलीच आणि आपल्या रोजच्या स्टाईलप्रमाणे व्यासपीठावर न बसता त्यांनी लोकांमध्येच बसून कार्यक्रम पाहणे पसंत केले.

Dabolim Airport
Mopa Airport: 2,870 कोटी रुपयांचे 'मोपा'; रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, असा असेल मोदींचा गोवा दौरा

काब्राल यांचा पुन्हा ‘आउट शर्ट’

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळातील मोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्त्व जर कोणी असेल, तर ते सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल. मनोहर पर्रीकरांप्रमाणे त्यांनाही आउट शर्ट स्टाईलमध्ये वावरायला आवडते, पण निवडणुकीच्या वेळी कुणी तरी त्यांच्या मनात बिंबविले की ते आउट शर्ट करून वयस्कर दिसतात.

त्यामुळे आपण तरुण दिसण्यासाठी ते इन शर्ट करून फिरू लागले. पण काल ते लोकोत्सवात पूर्वीच्या आउट शर्ट स्टाईलमध्ये दिसले. आपल्या मोकळ्या स्वभावाला आउट शर्टच चांगला हे त्यांना कळून चुकले असावे.

कवळेतील दोघांना वगळण्याचे कारण...

कवळेत येत्या रविवारी महिला दिंडी महोत्सवाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची पब्लिसीटीही छान झाली आहे, पण खटकणारी गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर नऊ पंचायत सदस्यांपैकी दोन पंच सदस्यांची नावेच नाहीत. इतर सर्व सातही पंच सदस्यांची नावे छापण्यात आली आहेत.

आता हा कार्यक्रम खासगी असला तरी ढवळीकर ट्रस्टने पुढाकार घेतला आहे आणि राज्यात इतर कोणत्याच ट्रस्ट अथवा संस्थांपेक्षा ढवळीकर ट्रस्टकडून खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक उपक्रम साकारले जातात.

त्यामुळे ढवळीकर ट्रस्टचे नावही गोव्यात बऱ्यापैकी झाले आहे. विशेष म्हणजे कवळे पंचायतही ढवळीकर समर्थक आहे, तर मग कार्यक्रमावेळी नऊपैकी दोघाजणांना वगळण्याचे कारण काय? असा सवाल खुद्द या दोन्ही प्रभागातील लोकांकडून विचारला जात आहे.

कथा एका एसी शौचालयाची!

मडगावात पंधरा लाख रुपये खर्चून उभारलेल्या, पण तेथे पाण्याची तजवीज न केलेल्या कालकोंडे येथील शौचालयाचा किस्सा ताजा असतानाच काही वर्षांपूर्वी नगरपालिका उद्यानात उभारलेल्या, पण वापरात नसलेल्या वातानुकूलित शौचालयाची चर्चा आता जोर धरू लागली आहे.

मडगावातील ते पहिले एसी शौचालय असल्याची फुशारकीही मारली जात होती. कोविड निर्बंध काळात अन्य सर्व व्यवहारांबरोबर हे शौचालयही बंद केले गेले ते अजून सुरू झाले नसल्याने त्या पंधरा लाखांच्या शौचालयासारखी या शौचालयाचीही गत झाली नाही म्हणजे मिळवली असे कालकोंडेतील रहिवासी बोलू लागले आहेत.

Dabolim Airport
Kala Academy Goa: गोवा कला अकादमी अन् कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ दोन्ही 'एकाच माळेचे मणी'!

एकामुळे सोळा कारकुनांना शिक्षा?

‘कुणाच्या म्हशी आणि कोण काढतो उठाबशी’ अशी एक म्हण आहे. फातर्पा पंचायतीचे कारकून संतोष देसाई हे आपल्या पंच पत्नीच्या आशीर्वादाने पंचायतीत ढवळाढवळ करतात. ते आपल्या कुत्र्याला पंचायतीत आणतात अशा तक्रारी आमदार एल्टन समर्थकांनी वारंवार केल्यामुळे पंचायत संचालकांनी संतोष यांची बाळळी पंचायतीत बदली केली होती. तसे फातर्पा व बाळ्ळी अंतर आहे फक्त दोन किलोमीटर.

मात्र, एल्टनच्या दबावामुळे आपल्या पतीची बदली केली म्हणून माजी सरपंच व विद्यमान पंच मेदिनी या संतापल्या आणि चोवीस तासात घरी बसून त्यांनी पतीची बदली रद्द केली. संतोष सुटले, पण याचवेळी ज्या इतर सोळा कारकुनांची बदली झाली होती ते बिचारे नाहक त्रासात पडले. पंचायत कर्मचाऱ्यांना प्रथमच बदलीची व्यवस्था लागू करण्यात आली ती ही संतोषसाठी.

सिकेटी पुलाचे राजकारण

सासष्टीतील राजकारण हे वेगळ्या प्रकारचे आहे. तेथील रहिवासी नेमके कधी व कशाला विरोध करतील हे सांगता येत नाही. पण या विरोधालाही वेगवेगळे पदर असतात. चर्चिल हे साबांखा मंत्री असताना त्यांनी साळ नदीवर तीन पूल बांधण्याचा प्रस्ताव हाती घेतला व काम सुरू केले. त्यातील सिकेटी-बाणावली पुलाला चर्चिलच्या 2012 मधील पराभवानंतर विरोध होऊ लागला, तोपर्यंत पुलाचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले.

नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले व त्याच्या आदेशानंतर सरकारने ते काम सुरू करण्याबाबत पावले उचलल्यानंतर विरोधक पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. कारण त्यांना त्यात चर्चिलचा विजय वाटतो. खरे खोटे कोण जाणे, पण चर्चिलची आमदारकी जाऊन पाच वर्षे उलटली तरी त्यांचा दबदबा कायम आहे असे म्हणावे लागते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com