

पणजी : माशेल येथील प्रसिद्ध चिखलकाला उत्सवानिमित्त यंदाही विविध बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. २४ ते २६ जुलैला देवकीकृष्ण मंदिर परिसरात हा उत्सव रंगणार आहे.
उत्सवाची सुरुवात २४ जुलै रोजी विविध कार्यक्रमांनी होणार आहे. प्रारंभी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर ‘अनुभूती’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळा होईल.
त्यानंतर महेश काळे यांचा ‘अभंगवाणी’ हा विशेष कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे. उत्सवादरम्यान पारंपरिक गोमंतकीय पाककलेचे सादरीकरण, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ‘मॉन्सून मॅजिक ऑफ गोवा’ या संकल्पनेवर आधारित छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चिखलकाला हा गोमंतकीय परंपरेचा आणि सामाजिक एकात्मतेचा उत्सव असून, सर्व मतभेद विसरून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्यात सहभागी होतात. हा उत्सव गोमंतकीय संस्कृतीचा अनोखा आनंद देणारा असल्याने त्याचे वेगळे महत्त्व आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले. तसेच सर्वांनी उत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.