Lok Sabha Election 2024: उत्तर गोव्यात अजूनही संभ्रम; श्रीपाद नाईक यांच्या उमेदवारीला अडथळे

दक्षिण गोव्यात दिगंबर कामत यांची कामाला सुरुवात; काँग्रेसच्या उमेदवारांचा पत्ताच नाही
Brahmeshanand Swami Meet Pm Modi
Brahmeshanand Swami Meet Pm Modi Dainik Gomantak
Published on
Updated on

Brahmeshanand Swami Meet Pm Modi: लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. तरी भाजपला त्यांची सर्वात खात्रीशीर जागा वाटत असलेल्या उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवार निश्चित करता आलेला नाही.

ब्रह्मेशानंद स्वामीजींनी या जागेसाठी लढण्याची इच्छा दर्शविली, तर नाईक यांची उमेदवारी धोक्यात येईल. गेल्या आठवड्यात स्वामीजींनी उत्तर प्रदेशातील पाच महामंडलेश्वर (स्वामी) यांच्यासह पंतप्रधानांची भेट घेतली होती व त्यानंतर स्वतः नरेंद्र मोदींशी वैयक्तिक चर्चा केली होती.

स्वामीजींच्या या भेटीनंतर गोव्यात भाजपमध्ये चलबिचल सुरू झाली व श्रीपाद नाईक यांच्या वाढदिनाच्या कार्यक्रमात नेत्यांनी त्याची वाच्यता केल्यानंतर स्वामीजींचा गोव्यातील संप्रदाय नाराज झाला.

या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रवक्ते दामू नाईक यांनी भाजपातील ‘आमचे स्वामी’ श्रीपादभाऊच असल्याचे मत मांडले व त्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी श्रीपादभाऊ यांचे स्थान स्वामीजींसारखे असल्याचे व संत महंतांच्या संगतीत नेहमी ते असल्याचे ठासून सांगितले होते.

हा हातुर्ली मठाधीशांना कमी लेखण्याचा प्रकार असल्याचे वाटून स्वामीजींच्या संप्रदायात कटुता निर्माण झाली असली, तरी या विषयावर गोव्यात धीरगंभीर शांतता आहे. गेल्या वर्षभरात ब्रह्मेशानंद स्वामीजी पंतप्रधान व योगी आदित्यनाथ यांना अनेकवेळा भेटले आहेत.

गोव्यातील प्रसार माध्यमांमध्येही गेल्या महिन्याभरात स्वामीजींना गोव्यात लोकसभा निवडणूक लढविण्यात रस असल्याच्या वार्ता झळकल्या असून त्यावरूनच श्रीपादभाऊंच्या वाढदिवशी त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक करून भाजपचे नेते व कार्यकर्ते श्रीपादभाऊंबरोबर असल्याचा संदेश पाठविण्याचा निर्णय झाला होता.

‘‘ही अत्यंत जाणीवपूर्वक व ठरवून केलेली मल्लिनाथी होती व तिचा योग्य उपयोग झाला,’’ अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘गोमन्तक’ला दिली.

भाजपच्या दिल्लीपर्यंत संपर्क असलेल्या एका स्थानिक नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, गोवा प्रदेश भाजप संपूर्णतः श्रीपाद नाईक यांच्या पाठीशी उभा आहे व पक्षश्रेष्ठींकडे त्यांच्याच नावाचा आग्रह धरण्यात आला आहे.

Brahmeshanand Swami Meet Pm Modi
Goa Politics: खंवटे - लोबोंमधील दरी कायम; पर्वरीत एका व्यासपीठावर येणे टाळले

दिगंबर कामत यांनी आपल्या निवडणूक निधी उभारण्याच्या कामाला सुरवात केली आहे व ठिकठिकाणी जाऊन देवदर्शन घ्यायलाही सुरवात केली आहे.

चतुर्थीनिमित्ताने ते पहिल्यांदाच यंदा म्हापसा गणेशोत्सवात दर्शनासाठी व त्यानंतर गृहनिर्माण वसाहतीतही दर्शनासाठी पत्नीसह दाखल झाले होते. दक्षिण गोव्यात तर ते विलक्षण क्रियाशील बनले असून ते एकही महत्त्वाचा कार्यक्रम चुकवत नाहीत.

दिगंबर कामत यांना राज्यात मंत्रिपद न देता दिल्लीत पाठविण्याचे मनसुबे या प्रकारे यशस्वी होणार असले तरी कामत हे राजकारणात मुरलेले नेते आहेत, ते केवळ खासदारकीवर स्वस्थ बसणार नाहीत; केंद्रात मंत्रिपद मिळविण्याचा ते प्रयत्न करतील व ते मिळाले नाही, तर गोव्यात मुख्यमंत्री म्हणून परततील, असे मत भाजपाच्या या राजकीय विश्लेषकाने व्यक्त केले.

गोव्यात प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या नेत्यांमध्ये चालू असलेल्या सुंदोपसुंदीवर उपाय काढण्यासाठी पक्षश्रेष्ठी कामत यांना पसंती देण्यास कमी करणार नाहीत. कारण कामत यांचे दिल्लीतही पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध आहेत, असे हा नेता म्हणाला.

गोव्यात ज्या पद्धतीने पेडणे झोन प्लानचा खेळखंडोबा करण्यात आला, त्यामुळे भाजपातील अनेक जुने नेते उद्वेग व्यक्त करताना दिसतात. अशा पद्धतीने धोरणात्मक निर्णय घेतले जातात का, हा पोरखेळ झाला अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली.

गिरीश चोडणकर यांच्या मते, दक्षिणेसाठी आता हिंदू उमेदवार अधिक प्रबळ बनू शकतो असाच काँग्रेस पक्षाचा होरा आहे, परंतु त्यासाठी पक्षाने अद्याप कसलेही सर्वेक्षण केलेले नाही, यात तथ्य आहे.

चोडणकर व खलप हे या पक्षाचे उमेदवार राहिले, तर भाजपला जास्त त्रास काढण्याची आवश्यकता राहणार नाही, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी पक्षातून व्यक्त झाली. गोवा फॉरवर्ड सध्या काँग्रेसकडून दुर्लक्ष होत असल्याने तटस्थ राहू इच्छितो असे संकेत मिळाले आहेत.

ब्रह्मेशानंद स्वामीजींच्या पंतप्रधान भेटीनंतर गोव्यात चलबिचल

दक्षिणेची उमेदवारी दिगंबर कामत यांनाच

दक्षिण गोव्यात - जेथे भाजपचा उमेदवार अभावानेच निवडून येतो, तेथे दिगंबर कामत यांच्या रूपाने तगडा उमेदवार भाजपला मिळाला असून त्याची अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे

या उमेदवार स्पर्धेतून माजी खासदार नरेंद्र सावईकर कधीच बाद झाले असून त्यांनी भाजप कार्यालयात येणेही कमी केले आहे, असे वृत्त यापूर्वी सर्वप्रथम ‘गोमन्तक’ने दिले होते.

सध्या उमेदवारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कामत व दुसऱ्या क्रमांकावर बाबू कवळेकर आहेत.

भेटीगाठींंना सुरवात

‘‘कामत यांना अनधिकृतपणे उमेदवारीचे कळविण्यात आल्यानंतर त्यांनी लोकांच्या भेटीगाठी घेण्याच्या कामाला सुरवातही केली आहे,’’ अशी माहिती भाजप सूत्रांनी दिली. भाजपने दक्षिण गोव्यात यापूर्वी तीन सर्वेक्षणे केली, त्यात कामत यांचे नावच सर्वात वर आहे.

काँग्रेस कळपात संपूर्ण निराशा

भाजपाने लोकसभेसाठी गोव्यात केवळ दोन जागा असल्या तरी ज्यापद्धतीने मोर्चेबांधणी चालविली आहे ती वैशिष्ट्यपूर्ण असून देशात ‘इंडिया’च्या नावे जोरदार चळवळ चालविणाऱ्या काँग्रेस कळपात मात्र संपूर्ण निराशा आहे.

दक्षिणेसाठी गिरीश चोडणकर व उत्तर गोव्यासाठी रमाकांत खलप आघाडीवर आहेत. फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा पक्षाने उमेदवारी देऊ नये, असे एक सांघिक मत गोव्यातून पक्षश्रेष्ठींकडे पाठविण्यात आले आहे.

कॅप्टन विरियातो फर्नांडिस व एल्विस गोम्स यांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले आहेत, परंतु पक्षात त्यांची स्वतःची लॉबी नाही.

दृष्टिक्षेपात आगामी लोकसभा निवडणूक

  1. दिगंबर कामत यांची दक्षिण लोकसभा निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारून कामाला सुरवात

  2. ब्रह्मेशानंद स्वामीजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दोनदा भेट घेतल्यानंतर त्यांच्या उमेदवारीसंदर्भातील चर्चेला चालना

  3. स्वामीजींना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबरोबर पाच ज्येष्ठ महामंडलेश्वर स्वामीजींचा पाठिंबा असल्याने पक्षात चलबिचल, परंतु स्थानिक पक्ष भक्कमपणे श्रीपाद नाईकांच्या पाठीशी

  4. दिगंबर कामत यांना दिल्लीला पाठविण्याची घाई झालेल्या स्थानिक नेत्यांना कामत काटशह देऊ शकतात. ते खासदार झाल्यास एकतर केंद्रात मंत्रिपद मिळवतील किंवा मुख्यमंत्री बनून राज्यात परततील, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.

Brahmeshanand Swami Meet Pm Modi
दुधाच्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी, कराड - चिपळूण मार्गावर 19.75 लाखांचा मुद्देमाल जप्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com