
तिसवाडी: बायंगिणी येथे कचरा व्हिलेवाट प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शनिवारी (18 जानेवारी) कुंभारजुवे मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रांमधील पंचमदस्यांनी दिला. सरकारने मागच्या दाराने प्रकल्प आणू नये. कारण जनसुनावणीत सुमारे 90 टक्के लोकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता, तर आता पुन्हा मोठ्या सभागृहात घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
दरम्यान, सरकार कशासाठी निविदा काढत आहे? प्रकल्प त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी स्थानिकांनी केली. जुने गोवे पंचायतीच्या सभागृहात पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली. या प्रकल्पाला आताच नव्हे, तर 2006 पासून विरोध होत आहे. यासंदर्भात सुनावणी देखील घेतली असून लोकांनी तीव्र विरोध केला होता.
दुसरीकडे, बायंगिणी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प होणारच, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बुधवारी (15 जानेवारी) स्पष्ट केले असता कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. हिंमत असेल तर मंत्री मोन्सेरात यांनी हा प्रकल्प बायंगिणी येथे उभा करुन दाखवावा, असे रोखठोक आव्हान त्यांनी दिले होते. त्यामुळे या प्रकल्पावरुन पुन्हा सत्ताधाऱ्यांमधील मंत्री-आमदारांमध्ये वादाची ठिणगी उडाली होती.
दरम्यान, पणजी आणि तिसवाडीतील दररोज 100 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायंगिणी येथे प्रकल्प उभारण्यावर राज्य सरकार ठाम आहे. कुंभारजुव्याचे आमदार राजेश फळदेसाई यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पासाठी पुन्हा निविदा मागवण्याचे ठरवण्यात आले. गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाचे उपाध्यक्ष महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती देताना बायंगिणी येथे प्रकल्प होणार, अशी माहिती दिली होती.
बायंगिणी येथील प्रस्ताविक कचरा प्रकल्पाची जागा माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी निश्चित केली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर पर्रीकरांनी ती जागा कचरा व्यवस्थापन मंडळाकडे वर्ग केली होती. तिसवाडी तालुक्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्यानेच सर्वोच्च न्यायालयानेही (Supreme Court) त्यावर मोहर उमटवली आहे आणि तो प्रकल्प होणार असून, त्याची निविदा प्रक्रिया पुन्हा सुरु झाली, असे मत बाबूश मोन्सेरात यांनी ‘गोमन्तक''शी बोलताना व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.