
पणजी : गुरुवारी गोव्याचा 47 वा विधिकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी आमदार निर्मला सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी माजी आणि विद्यमान आमदारांनी म्हादई नदीचे पाणी वळवण्यापासून ते वाढत्या जातीय संघर्ष अशा विविध मुद्दांवरून सरकारला घेरलं.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हणाले की, गोव्यात वाढता कॅसिनो व्यवसाय आणि जमिनींची बेपर्वा विक्री हे राज्यातील प्रमुख मुद्दे आहेत. आपण विकासित गोंय 2047 बद्दल बोलत आहोत, 2047 पर्यंत गोव्यात काही शिल्लक राहील का? हा प्रश्न आहे. 2023 पासून राज्यातील समस्या आणखी बिकट झाल्या आहेत.
कॅसिनो आणि जुगार व्यवसाय गोव्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं मानलं जातं, ही अंत्यत लाजीरवाणी गोष्ट आहे. हीच आपली संस्कृती आहे का? असा सवाल आलेमाव यांनी उपस्थित केला.
"गोव्यातील लोकांच्या मनात जातीयवादाचे विष पेरलं जात आहे. गोव्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणावर त्याचा परिणाम होत आहे. हे मुस्लिम धर्मीय सरपंच झाला म्हणून 2024 मध्ये पेडण्यात निदर्शने झाली. यावरून असे दिसून येते की गोव्यातील लोकांच्या मनात जातीय संकट आधीच शिरले आहे," असं आलेमाव म्हणाले.
सरकार गोव्याला हरित गोवा करतानाच म्हादईच्या रक्षणासाठी गंभीरपणे पावले उचलत आहे. माजी आमदार हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी सरकारला सूचना कराव्यात. त्या सूचनांवर अंमलबजावणी केली जाईल, असं राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना म्हणाले.
"सरकार व्याघ्र प्रकल्पाला अधिसूचित करण्याच्या बाजूने नाही. माकड येऊन आपल्या बागायती शेती नष्ट करत आहेत. वाघ आणि बिबटे जंगलात उरले नाहीत. केंद्राने हवामान बदलाचा विचार करावा आणि कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी वळवण्याची परवानगी देऊ नये," असं माजी आमदार निर्मला सावंत 'टाइम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना म्हणाल्या.
गोवा विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर म्हणाले की, "पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्या ध्येयपूर्तीसाठी माजी आमदार, माजी मंत्री, विरोधी पक्षनेत्यांचे पाठबळ आवश्यक आहे."
यावेळी गोवा राज्याच्या विधानसभेच्या (1989-94) सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या वर्षी निधन झालेले माजी सदस्य आणि माजी आमदार फ्रान्सिस्को मोंटे क्रूझ आणि सुरेश परुळेकर यांच्या निधनाबद्दल विधानसभेत शोक व्यक्त करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.