

पणजी: कुणबी साडी, घुमटासह सहा वस्तूंना ‘जीआय’ मानांकन देण्याचे ‘जीआय’ निबंधकांनी निश्चित केले आहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल जून अखेरपर्यंत निबंधकांना पाठवण्यात येणार असून, चार महिन्यांनंतर या सहाही वस्तूंना जीआय मानांकन मिळाल्याची घोषणा होईल, अशी माहिती राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदेचे नोडल अधिकारी दीपक परब यांनी बुधवारी ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.
राज्य सरकारने काहीच महिन्यांपूर्वी कुणबी साडी, घुमटासह कावी कला, दोदोल, चोरिसा आणि कोकोनट क्राफ्ट या सहा वस्तू ‘जीआय’ मानांकनासाठी पाठवल्या होत्या. त्यावर अभ्यास करून ‘जीआय’ निबंधकांनी या सहाही वस्तूंना जीआय मानांकन देण्याचे निश्चित केले आहे. त्यासंदर्भातील अहवाल जून अखेरीस सरकार निबंधकांना पाठवणार आहे. त्यानंतर सूचना आणि हरकतींसाठी १२० दिवस राखीव असतात. त्यामुळे या सहाही वस्तूंना ‘जीआय’ मानांकन मिळाल्याचे चार महिन्यांनंतर घोषित होईल, असे परब यांनी सांगितले.
दरम्यान, ‘जीआय’ मानांकनामुळे एखाद्या विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उत्पादित होणाऱ्या कृषी, नैसर्गिक किंवा हस्तकला वस्तूंना त्यांची गुणवत्ता आणि वैशिष्ट्यांमुळे जागतिक स्तरावर विशेष ओळख व कायदेशीर प्रमाणपत्र मिळते. शिवाय संबंधित उत्पादनाची बाजारातील किंमत वाढून उत्पादक शेतकऱ्यांचा (Farmer) आणि कारागिरांचा आर्थिक फायदा होतो. ‘जीआय’ मानांकनामुळे बनावट उत्पादनांना आळा बसतो आणि ग्राहकांना अस्सल वस्तू मिळतात.
मुगड्याची सारण आणि विणकाम क्राफ्ट या आणखी दोन वस्तूंना ‘जीआय’ मानांकन मिळावे, असा प्रस्ताव जून अखेरपर्यंत ‘जीआय’ निबंधकांकडे पाठवण्यात येणार आहे, असेही दीपक परब यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.