

संजय घुग्रेटकर
गेली आठ दशके दुग्ध व्यवसायात अविरत व्यस्त असणारे धवलक्रांतीदूत खुशाली सावंत 103 वर्षांचे आहेत. आजही ते आपल्या मुलाला दुग्ध व्यवसायाबाबत मार्गदर्शन करतात. या वयातही जनावरांपाशी जाणे, त्यांच्या पाठीवर मायेचा हात फिरवणे हा त्यांचा क्रम चालू असतो. धवलक्रांतीचा खांडोळा-जाईडवाड्यातील हा अवलिया म्हणजे नव्या पिढीने प्रेरणा घेण्यासारखे व्यक्तिमत्व आहे.
बालपणापासूनच पाळीव जनावरांची आवड असल्यामुळे नोकरी किंवा इतर कामधंद्याच्या मागे न लागता, वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी दुग्ध व्यवसायात उडी घेतली. सुरुवातीच्या काळात चोडण या गावातून त्यांनी म्हशीचे रेडकू विकत घेतले. त्या रेडकाला वाढवून तिच्यापासून मिळणारे दूध हॉटेलना देण्यापासून त्यांच्या व्यवसायाची सुरूवात झाली.
पुढे एका म्हशीच्या अनेक म्हशी झाल्या, मोठा गोठा तयार झाला, दुधाचा व्यवसायही वाढला. गोवा मुक्तीनंतर गोव्यात दूधक्रांतीची सुरूवात झाली होती. भाऊसाहेबांच्या कार्यकाळात दुग्ध संस्था सुरू व्हायला लागल्या होत्या. या संधीचा लाभ खुशाली यांनी घेतला.
ते स्वतः या संस्थेचे सदस्य झाले. गोव्यात सुरू झालेल्या धवलक्रांतीत त्यांनी स्वत:ला झोकून दिले आणि इतरांनाही प्रोत्साहन दिले. खुशाली यांनी गेल्या ८४ वर्षांत हजारो जनावरांची देखभाल केली, अनेक वासरे, रेडकांना त्यांनी मोठे केले आहे. यातील अनेक वासरे, रेडके त्यांनी इतरांनांही मोफत पाळण्यासाठी दिली. अनेकांच्या संसाराला त्यातून हातभार लागला. आज त्यांच्या स्वत:पाशी २० जनावरे आहेत.
खुशाल यांनी फक्त जनावरे पाळली नाहीत, तर त्यांनी गावोगावी जाऊन जनावरांवर उपचारही केले आहेत. गोवा मुक्तीपूर्वी पशुवैद्य जवळ जवळ नव्हतेच. त्या काळात झाडपाल्यांच्या उपचारातून त्यांनी अनेक जनावरांना जीवदान दिले आहे. जनावरांवर कोणत्याही रासायनिक औषधाचा मारा न करता झाडपाल्यांद्वारे उत्तम उपचार करणारे खुशाली पशूवैद्य म्हणून त्यांचा आजही नावलौकिक आहे.
खुशाली सावंत यांचा एकुलता एक मुलगा उल्हास व सून प्रशांती ही जनावरे पालनात तरबेज आहे. खुशालीच्या मार्गदर्शनानुसार ते जनावरे सांभाळत असतात. अलीकडची पिढी शेती करत नाही, जनावरे पाळत नाहीत, असे म्हटले जाते, पण खुशालीचा परिवार आजही बागायत, शेतीसह दुध व्यवसायात सक्रीय आहे.
गोवा मुक्तीनंतर विधानसभा, लोकसभा, पंचायत, ओपिनियन पोल, जिल्हा पंचायतीसारख्या अनेक निवडणुकीत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आगामी निवडणुकीतही आपण हक्क बजावणार आहे असे ते ठामपणे सांगतात. गोव्यातील विविध पक्षाच्या सरकारांचा त्यांनी कारभार पाहिला आहे, तरीसुद्धा ते आजही भाऊसाहेबांची आठवण काढतात. वयाच्या १०३ व्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे.
१०३ वर्षांचे आजोबा असूनही खुशाली एकाद्या युवकाप्रमाणे उत्साहाने दररोज गोठ्यात येऊन जनावरांची पाहणी करतात, जनावराची मोजणी करतात. त्यांना वेळेवर पाणी, चारा देण्याचा काम करतात. उन्हाळ्यात जनावरांना ऊन लागू नये, म्हणून त्यांच्यासाठी झावळांचा मंडप उभारण्यास मुलाला दररोज सांगतात. जनावरांवर त्यांचे मुलांप्रमाणेच प्रेम आहे.
धवलक्रांतीसाठी झटणाऱ्या १०३ वर्षांच्या खुशाली सावंत यांना इंडियन डेअरी असोसिएशन, पश्चिम विभागातर्फे जीवन गौरव पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. गोवा सरकार, इंडियन डेरी असोसिएशन, गोवा डेअरी, सुमूल डेअरी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना हा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.