फोंडा: इच्छाशक्ती असेल तर वयाचे बंधन आडवे येत नाही. हवी असते ती केवळ जिद्द आणि उमेद. पुण्यातील चार ज्येष्ठ नागरिकांनी ही दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवत थेट सायकलवरून गोव्यातील फोंडा तालुक्यामधील नागेशी येथील प्रसिद्ध भजनी सप्ताहाला उपस्थिती लावली आणि सर्वांना चकीत केले. एवढा मोठा प्रवास करूनही या ज्येष्ठांच्या चेहऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा शीण नव्हता, हे विशेष.
अरुण नेवशे, दत्तात्रय पोतदार, निरुपमा भावे आणि जयश्री जाधव या पुण्यातील चारही सायकलमित्रांनी साठी उलटली तरी अजूनही आपण ‘फिट’ आहोत हे दाखवून देत चार दिवसांत पुणे ते गोवा अंतर कापले. या चौघांनी आपल्या सायकली पुण्यातून दामटल्या व कराड, मलकापूर, अनुस्करा घाटातून राजापूरमार्गे गोवा गाठले.
गेल्या शुक्रवारी १६ तारखेला सकाळी ६ वाजता त्यांनी पुण्यातून प्रयाण केले होते व सोमवारी १९ रोजी त्यांनी गोवा गाठले ते थेट नागेशी. तेथे श्री नागेश महारुद्राचे दर्शन घेतले. ‘सर्व काही पावले’ असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता.
सायकल चालवण्याचा अनुभव आणि उत्साही वृत्ती यामुळे हा सुमारे ५०० किलोमीटरचा प्रवास खूप चांगला झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. वाटेत चहा-नाश्ता, भोजन व आवश्यक त्या ठिकाणी जरासा विसावा घेतला. पुन्हा नव्या दमाने सायकल दामटली. हे चौघेही सेवानिवृत्त आहेत.
निरुपमा भावे विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर सायकल भ्रमंती सुरू केली. चौघांचीही ओळख सायकल फेरीतच झाली, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी अशी महाराष्ट्रातच सायकलवरून अनेकवेळा भ्रमंती केली आहे.
अरुण नेवशे, दत्तात्रय पोतदार, निरुपमा भावे आणि जयश्री जाधव या चौघांनीही नागेशी गाठल्यानंतर श्री नागेश देवाचे दर्शन घेतले. तसेच भजनी सप्ताहाला उपस्थिती लावली. परमेश्वराचे अधिष्ठान असेल तर काहीही अशक्य नाही. एवढा मोठा पल्ला या वयात कसा काय तुम्ही गाठला, असे विचारल्यावर ‘हवी असते ती इच्छाशक्ती’ असे उत्तर मिळाले. खरेच अशा ज्येष्ठांना सलाम!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.