केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या गोवा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. गडकरींनी गोवा राज्याची कमर्शियल राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मडगाव ते कर्नाटक सीमेदरम्यान 45 किलोमीटरचा बायपास बांधण्याची घोषणा केली. याशिवाय, पणजी आणि बेळगाव महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचीही घोषणा यावेळी त्यांनी केली.
दरम्यान, गडकरींनी गोव्यात मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते धारगळदरम्यान सहा पदरी रस्त्याचेही उद्घाटन केले. त्यांनी आपल्या उद्घाटन भाषणात राज्यासाठी दोन नवीन प्रकल्पांचे आश्वासन दिले.
मडगाव-कर्नाटक सीमा बायपास सुमारे 45 किमी लांबीचा असेल आणि सुमारे 3,500 कोटी रुपये खर्च येईल. तर गोव्यातील (Goa) राष्ट्रीय महामार्ग 748 च्या पणजी-बेळगाव विभागाच्या चौपदरीकरणासाठी सुमारे 4,000 कोटी रुपये खर्च येईल. गोव्यात येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा हा 52 किमीचा भाग असेल.
गडकरी शुक्रवारी सकाळी अधिकाऱ्यांसोबत गोव्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतील, असे अधिकृत निवेदनात सांगितले होते.
गडकरींनी आपल्या भाषणात नमूद केले की, ''राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यायी इंधन आणि जैव इंधनाचा अवलंब केला पाहिजे. हा पर्याय गोव्यातील लोकांसाठी महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरेल."
दुसरीकडे, गुरुवारी सायंकाळी 1,183 कोटी रुपये खर्चाच्या या 7 किलोमीटरच्या प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या रस्त्यामुळे मोपा येथे असलेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी अगदी सोपी होईल. तसेच, जलद आणि त्रासमुक्त प्रवास करता येईल.
"या विकास कामांमुळे राज्याचे पर्यटन वाढेल त्याचबरोबर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल, ज्यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होईल," असेही मंत्रालयाने म्हटले.
याव्यतिरिक्त, सुरळीत आणि सुरक्षित रहदारी सुनिश्चित करणे हे देखील त्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे इंधनाचा वापर आणि प्रवासाच्या वेळेत बचत होईल. याशिवाय, एलिव्हेटेड कॉरिडॉरसह लिंक रोड, मुंबई-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग 66 चा वापर करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुलभ करेल.
राष्ट्रीय महामार्ग 66 हा मुंबईजवळील पनवेलपासून सुरु होतो आणि कन्याकुमारीमधील केप कोमोरिन येथे संपतो. तो महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमधून जातो. लिंक रोडमुळे गोव्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि यापैकी कोणत्याही राज्यादरम्यान आणि त्याहूनही पुढे प्रवास करणाऱ्या लोकांचा प्रवास सुलभ होईल.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant) यांनी गुरुवारी संध्याकाळी घोषणा केली की, ते मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर गोव्यातील पेडणे रेल्वे स्थानकाशी जोडण्याची आणि प्रत्येकासाठी प्रवास सुलभ करण्यासाठी राज्यभरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याची योजना आखत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.