

मडगाव: गोव्यात 'धीरयो' म्हणजेच बैलांच्या झुंजीवर न्यायालयीन बंदी असतानाही दक्षिण गोव्यात पुन्हा एकदा बेकायदेशीरपणे हा प्रकार समोर आला आहे. बाणावली येथे मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बैलांच्या झुंजीदरम्यान एका बैलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, गोव्यातील धीरयोचा मुद्दा आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास बाणावली किनाऱ्यावरील पार्किंगसाठी वापरल्या जाणाऱ्या खुल्या जागेत या बेकायदेशीर धीरयोचे (बैलांच्या झुंजीचे) आयोजन करण्यात आले होते. झुंज सुरू असताना दोन्ही बैल एकमेकांवर तुटून पडले. मात्र, काही वेळातच एका बैलाने दुसऱ्या बैलाचा तीव्र पाठलाग करण्यास सुरुवात केली.
दुसऱ्या बैलाच्या हल्ल्याला आणि पाठलागाला घाबरून एक बैल स्वतःचा जीव वाचवण्यासाठी थेट समुद्राच्या दिशेने धावला. यावेळी समुद्राला मोठी भरती असल्याने आणि पाणी खवळलेले असल्याने, तो बैल समुद्राच्या वेगवान प्रवाहात अडकला. लाटांचा वेग जास्त असल्याने बैलाला किनाऱ्यावर परतता आले नाही आणि अखेर पाण्यात बुडून त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. हा सर्व थरार किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी आपल्या डोळ्यांनी पाहिला.
प्राथमिक माहितीनुसार, या झुंजीत जीव गमावलेला मृत बैल हा नावेली येथील एका नामांकित व्यावसायिकाच्या मालकीचा असल्याचे समजते. या बेकायदेशीर झुंजीसाठी बैलाला बाणावली किनाऱ्यावर आणण्यात आले होते. गोव्यात (Goa) प्राण्यांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने धीरयोवर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. असे असतानाही, पोलिसांचा ससेमिरा चुकवून ग्रामीण आणि किनारपट्टीच्या भागात अशा झुंजी चोरट्या मार्गाने आयोजित केल्या जातात. बाणावलीतील या घटनेनंतर प्राणिमित्रांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, बेकायदेशीर धीरयोचे आयोजन करणाऱ्यांवर आणि बैल मालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.