मडगाव : सरकारी शाळांकडे पाहून नाक मुरडणाऱ्यांच्या डोळ्यांत यंदाच्या शालान्त मंडळाच्या दहावीच्या निकालाने झणझणीत अंजन घातले आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या प्रयत्नांना चांगले यश प्राप्त झाले आहे. यंदा तब्बल 35 सरकारी विद्यालयांनी 100 टक्के निकाल नोंदविला.
केपेच्या आदिवासी भागातील मोरपिर्ला येथील सरकारी विद्यालयाने सतत सातव्या वर्षी हा विक्रम करत आपली शंभर टक्क्यांची परंपरा कायम ठेवली आहे.
मागच्या वर्षीही एवढ्याच सरकारी शाळा 100 टक्के निकाल देणाऱ्या होत्या. 2018 साली 21 सरकारी शाळांनी हा असा निकाल नोंदविला होता. 2019 साली हे प्रमाण 31 वर आले होते. यंदा सरकारी शाळांच्या निकालाचा टक्का वाढलेला आहे.
सरकारी शाळांतून चांगले शिक्षण दिले जात नाही? हा जो काही लोकांनी समज करून घेतला आहे, त्याला या निकालाने छेद दिला असून उलट गावात जी सरकारी विद्यालये आहेत. तेथील शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर अधिक कष्ट घेतात, हे या निकालातून सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया साहाय्यक शिक्षण संचालक डॉ. उदय गावकर यांनी व्यक्त केली.
डॉ. गावकर हे मूळ ओकांब-धारबांदोडा या खेडे गावातील असून ते केपे येथील होली क्रॉस विद्यालयाचे प्राचार्य होते. त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या संकुलात येणाऱ्या सरकारी प्राथमिक शाळांवरील विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करत चांगला निकाल आणला होता. अन्य शाळापेक्षा ग्रामीण भागातील शाळा चांगल्या असून या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी तुलनेत कमी विद्यार्थी येत असल्याने त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांना चांगले मार्गदर्शन करणे शिक्षकांना शक्य होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
मुरगाव तालुका वगळता अन्य सर्व सरकारी शाळांनी 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल आहे. डिचोली तालुक्यात 9 शाळांनी 100 टक्के, निकाल नोंदवला आहे. सत्तरीतून 8, पेडण्यातून 5, तिसवाडीतून 4, काणकोण तालुक्यातून 3, फोंडा व सांगे या तालुक्यातून प्रत्येकी 2 तर बार्देश, धारबांदोडा, केपे व सासष्टी या तालुक्यातून प्रत्येकी एका सरकारी शाळेने 100 टक्के निकाल दिला आहे.
मोरपिर्ला शाळेच्या मुख्याध्यापिका मोरेन मिरांडा यांनी सांगितले, गावातील मुलांना शिकवण्या वगैरे घेता येत नाहीत. त्यांची सर्व मदार आम्ही शाळेत जे काय शिकवतो, त्यावर आधारित असते. आमच्या शाळेत अगदी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांना तयार केले जाते. मागच्या सात वर्षात आम्ही 100 टक्के निकाल दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.