गोवा: निवडणुकी झाल्या, निकाल लागला आणि भाजपचे सरकार येणार हे निश्चित झाले. इतर राज्यात मंत्रिमंडळ कार्यरत झाले, पण गोव्यात थोडा उशीर झाला. पण इंधन, गॅस सिलिंडरच्या किमतीत मात्र वाढ झाली. त्यामुळे गृहिणींनी भाजपच्या तीन सिलिंडर मोफत आश्वासनाची आठवण झाली. सोमवारी मंत्रिमंडळाचा शपथ विधी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्वरित इंधन दरवाढीचा विचार करावी आणि तीन गॅस सिलिंडर मोफतची योजना सुरू होईल, अशा अपेक्षित महिलावर्ग असून या आश्वासनाचीच चर्चा गावागावांत सुरू आहे. विरोधक ती फसवी घोषणा असल्याचे म्हणत असून भाजपवाले मात्र निश्चितपणे तीन सिलिंडर मोफत मिळतील, असे ठामपणे गावागावांत महिलावर्गाला आश्वासन देत आहेत. काहीही झाले तरी पुढील आठवड्यात मोफत सिलिंडरची घोषणा होईल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
प्रियोळात विरोधक थंडावले!
प्रियोळ मतदारसंघात परिवर्तनाचा नारा घेऊन काहींनी निवडणूक लढवली. स्थानिक उमेदवाराचा आग्रह झाला, पण स्थानिकांनाच मतदारांनी डावलले. कदाचित विकासाला म्हणजे ‘हर बोले प्रगतिपथावर प्रियोळ’लाच विजयी केले. अर्थातच भाजपचे गोविंद गावडे विजयी झाले असून त्यांचे कार्यही सुरू झाले. नेहमीप्रमाणे जनसंपर्क, गाठीभेटीही सुरू आहे. ते कार्यक्रमात दिसतात, उद्घाटन, पूजन करतात. पण विरोधक कुठेच दिसत नाहीत. विरोधासाठी निर्माण केलेल्या सोशल मडियावरील ग्रुपमधूनही अनेक जण ‘लेफ्ट’ होत आहेत. एकूणच विरोधक गारद झाल्याचे चित्र दिसत आहे. नेते गायब झाल्याने त्यांचे कार्यकर्तेही शांतच आहेत. कदाचित पंचायत निवडणुकीवेळी ते पुन्हा सक्रिय होतील, अशी जाणकारांत चर्चा सुरू आहे. ∙∙∙
संगनमताचे राजकारण
काँग्रेसचे पराभूत उमेदवार जनार्दन भंडारी यांना कार्यकर्ते काणकोणचे शॅडो आमदार संबोधतात. मात्र दोन दिवसामागे रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे आंदोलनाच्या पावित्र्यात असलेल्या भंडारी व गोवा फॉरवर्डच्या प्रशांत नाईक यांनी चक्क आमदार रमेश तवडकर यांची त्याच्या घरी भेट घेऊन मागणीचे निवेदन देऊन डांबरीकरणाचे साकडे घातले. त्यामुळे काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. काहींनी प्रशांत तुम्ही सुद्धा असा सूर लावला. विरोधकांनी सरकार दरबारी निवदने द्यायची असतात. निवेदने देऊन सुद्धा सरकार ऐकत नसल्यास आंदोलनाची भाषा त्यांना समजावी लागते, मात्र येथे घडले, मात्र उलटेच. त्यामुळे सध्या रमेश तवडकर व भंडारी यांच्यात दिलजमाई तर झाली नसेल ना? ही चर्चा रंगात आली आहे. ∙∙∙
प्रतिमाताई तुम्ही कुठे आहात?
विधानसभा निवडणुकीत प्रतिमा कुतिन्होंनी पक्ष बदलला, प्रचारात गतीही दिसली, पण मतदारांनी नाकारले. आवेर्तान फुर्तोदो, वालंका आलेमाव यांना डावलून मतदारांनी भाजपच्या उल्हास तुयेकरांना विधानसभेत पाठविले. तेव्हापासून इतर उमेदवार विजनवासात गेल्याचा भास होत आहे. कारण ते कुठे आहेत, काय करतात? याबाबत मतदारांना काहीच माहीत नाहीत. प्रतिमाताई कॉंग्रेस पक्षात होत्या तेव्हा व आपमध्ये प्रवेश केल्यावरसुद्धा प्रतिमाताई एकदम क्रियाशील होत्या. गेल्या पाच वर्षांत प्रतिमाताईनी कित्येक आंदोलने केली. नारळांच्या किमती वाढीसाठी, इंधन वाढीसाठी, महागाईसाठी व नंतर आपमध्ये ते नुवेच्या आमदाराला केकसुद्धा घेऊन गेल्या. मात्र त्याचा परिणाम तिच्या मतदारसंघातील मतदारांवर झाला नाही. हल्लीच कॉंग्रेस पक्षाने इंधन दरवाढीवरुन आंदोलन केले.
पण जेव्हा प्रतिमाताई होत्या तेव्हा आंदोलनाला जशी धार व आक्रमकता असायची तशी या वेळेच्या कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनात दिसली नाही. या आंदोलनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबच लोकांनाही प्रतिमाताईची खूप आठवण झाली. कारण आंदोलनात प्रत्येक जण त्यांची आठवण काढत होता. ∙∙∙विधानसभा निवडणुकीत प्रतिमा कुतिन्होंनी पक्ष बदलला, प्रचारात गतीही दिसली, पण मतदारांनी नाकारले. आवेर्तान फुर्तोदो, वालंका आलेमाव यांना डावलून मतदारांनी भाजपच्या उल्हास तुयेकरांना विधानसभेत पाठविले. तेव्हापासून इतर उमेदवार विजनवासात गेल्याचा भास होत आहे. कारण ते कुठे आहेत, काय करतात? याबाबत मतदारांना काहीच माहीत नाहीत.
प्रतिमाताई कॉंग्रेस पक्षात होत्या तेव्हा व आपमध्ये प्रवेश केल्यावरसुद्धा प्रतिमाताई एकदम क्रियाशील होत्या. गेल्या पाच वर्षांत प्रतिमाताईनी कित्येक आंदोलने केली. नारळांच्या किमती वाढीसाठी, इंधन वाढीसाठी, महागाईसाठी व नंतर आपमध्ये ते नुवेच्या आमदाराला केकसुद्धा घेऊन गेल्या. मात्र त्याचा परिणाम तिच्या मतदारसंघातील मतदारांवर झाला नाही. हल्लीच कॉंग्रेस पक्षाने इंधन दरवाढीवरुन आंदोलन केले. पण जेव्हा प्रतिमाताई होत्या तेव्हा आंदोलनाला जशी धार व आक्रमकता असायची तशी या वेळेच्या कॉंग्रेस पक्षाच्या आंदोलनात दिसली नाही. या आंदोलनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांबरोबच लोकांनाही प्रतिमाताईची खूप आठवण झाली. कारण आंदोलनात प्रत्येक जण त्यांची आठवण काढत होता. ∙∙∙
मैने बोला था ना..
गोव्याची धुरा पुन्हा प्रमोद सावंत यांच्याकडेच असेल हे आता ठरले. समाजमाध्यमांमध्येही याची जोरदार चर्चा रंगली होती. कदाचित, विषय नसल्याने काही राष्ट्रीय वाहिन्याही राजकीय चक्की दळत होते. आता मात्र या सर्वांवर ‘फुल स्टॉप’ लागला. मंत्रिमंडळाच्या नेतेपदाची माळ गळ्यात पडल्यानतर सावंत यांची देहबोली पाहण्यासारखी होती. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि आत्मविश्वास अनेकांच्या नजरेस पडला. आता कुठेही बैठक झाली की कार्यकर्ते सावंत यांना म्हणतात, दोतोर, तुमचा अंदाज खरा ठरला. यावर ‘सीएम’ हे मैने बोला था ना..असे सांगून आपला अंदाज खरा होता हे सांगग्याची संधी सोडत नाहीत. ∙∙∙
वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करा!
राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी मंगळवारी होणार आहे. प्रथमच भव्य अशा शामप्रसाद स्टेडियमवर हा सोहळा होणार असून प्रधानमंत्र्यांसह अति महनीय व्यक्तींची मोठ्या संख्येने उपस्थिती असेल हे नक्की. मात्र ज्या ठिकाणी हा सोहळा होणार आहे, त्या ठिकाणच्या शाळा, हायस्कूल आणि इस्पितळांचे काय, हा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारत आहे. कुजिरा - बांबोळीतील शाळा संकुलातील विद्यार्थ्यांना योग्य तऱ्हेने जाता येईल, की वाहतूक कोंडीत ही बिचारी मुले अडकतील, त्याचबरोबर गोवा मेडिकल कॉलेजसह मणिपाल इस्पितळही जवळच असल्याने या इस्पितळात जाणाऱ्यांना मोकळीक असेल की त्यांनाही अडवून ठेवण्यात येईल, काही कळलेले नाही. त्यामुळे वाहतुकीचे योग्य नियोजन करा रे बाबांनो, अशी हाक या मार्गावर वाहतूक करणाऱ्यांनी मारली आहे. अन्यथा या लोकांच्या हौसेपोटी सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांची व्हायची आबाळ. ∙∙∙
गिरीशने खरंच राजीनामा दिला?
गिरीश चोडणकर यांनी आता तिसऱ्यांदा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते. मात्र त्यांचा राजीनामा स्वीकारला की फेटाळला, हे काँग्रेसने अजूनही स्पष्ट केलेले नाही. गिरीशने यापूर्वी दोनवेळा दिलेला राजीनामा न स्वीकारता तसाच लोंबकळत ठेवला होता. आता प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत कित्येक जण असल्याची नावे पुढे येत असून आता त्यात आलेक्स सिक्वेरा यांचेही नाव पुढे आले आहे. सिक्वेरा यांना तुम्ही या रेसमध्ये आहात का? असे विचारले असता ते म्हणाले, मी कुठल्याही रेसमध्ये नाही. पण गिरीशने दिलेला राजीनामा स्वीकारला आहे का? आलेक्स यांना नेमके काय म्हणायचे आहे बुवा? त्यांच्या प्रश्नांत उत्तर आहे की उत्तरात प्रश्न आहे, हे एक कोडेच आहे. ∙∙∙
गिरीशबाबूंची बोलतीच बंद
निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात ज्या काही उलथापालथी झाल्या, त्यात प्रदेश काँग्रेसचे मावळते अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा बंद झालेला आवाज हा देखील एक आहे. त्यांनी भाजपबाबत घेतलेली आक्रस्ताळेपणाची भूमिका काँग्रेसला मारक ठरली. त्याऐवजी काँग्रेस सत्तेवर येणे गरजेचे कसे आहे? ते पटविण्यास ते अपयशी ठरले, असे त्यांचे सहकारीच आता बोलू लागले आहेत. त्यानंतर काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेतल्याने त्यांची बोलतीच बंद झालेली आहे. ∙∙∙
सगळेच झाले सक्रिय
यावेळी साठ टक्के नवे चेहरे विधानसभेत पोचले आहेत. त्यामुळेच असेल, अजून नवे सरकार सत्तेवर आलेले नसले, तरी बहुतेक आमदार आपापल्या मतदारसंघातील प्रश्नांबाबत सक्रिय झालेले आढळून येतात. हळदोणे, शिवोली, सांत आंद्रे येथील आमदार या बाबत अधिक उत्साही असल्याचे दिसते. हा उत्साह नव्याची नवलाई तीन दिवस म्हणतात तसा राहिला नाही, म्हणजे मिळवले असे अनेक पावसाळे पाहिलेले मतदार बोलू लागले आहेत. पण नव्या आमदारांनी विकासासाठी पाऊल उचलले आहे, हेही चांगलेच आहे. कारण पावसाळ्यापूर्वीच अनेक रस्त्यांची व इतर कामे पूर्ण होणे गरजेचे असते. कदाचित मतदारांच्या मागणीनुसार त्यांनी लक्ष घातल असावे. ∙∙∙
त्यांनी आशा सोडून दिली!
आशेवरच संसार कायम आहे, असे म्हणतात. मात्र आशा कधी कधी निराशेत बदलल, तर नको ही नुस्ती आफत म्हणण्याची पाळी येते. कुंकळ्ळी नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघा माजी नगरसेवकांनी काही महिलांना हाताशी धरून पालिका निवडणुकीत महिला आरक्षण लागू केले नाही, म्हणून उच्च न्यायालयात निवडणुकीलाच आव्हान दिले होते. मात्र वर्ष झाले, तरी या याचिकेचा निकाल लागत नाही, म्हणून याचिकेचे सूत्रधार चिंतित झाले आहे. ज्या आमदारांनी पक्ष बदलला होता, त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतर तर त्या माजी नगरसेवकांनी पालिकेचे मंडळ बरखास्त होणार व पुन्हा निवडणुका घेणार? असा न्याय न्यायालय देणार हा विचार सोडून दिला असून आता त्या ‘बुदवत’ नगरसेवकांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. ∙∙∙
सार्दिनचा डोळा प्रदेशाध्यक्ष पदावर?
खासदार फ्रांसिस सार्दिन यांना कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावर आरूढ होण्याची इच्छा झाली आहे. तसे त्यांनी बोलून दाखवलेले नसले तरी त्यांच्या पाठीराख्यांकडून ही बाब पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. गेल्या तीन वर्षांत पत्रकार परिषदा सोडून खासदार म्हणून सार्दिनबाबनी दक्षिण गोव्यात काहीही केले नाही. त्याचा पश्र्चाताप आता ज्यांनी त्यांना मतदान केले त्यांना होत आहे. मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत कुडतरीतून आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी, म्हणून त्यांनी आटापिटा केला. पण त्यात ते सफल झाले नाहीत. निवडणुकीच्या निकालापूर्वी कॉंग्रेस पक्षात म्हणे मुख्यमंत्री व मंत्रिपदांसाठी चढाओढ होती. आता विरोधी पक्ष नेते व पक्षाध्यक्ष या पदांसाठी चढाओढ आहे. पण कॉंग्रेस पक्षाला जर टिकायचे असेल तर युवा नेत्यांना संधी द्यायला हवी, अशी चर्चा मतदारांत सुरू आहे. ∙∙∙
पाण्यासाठी पंतप्रधानांना पत्र
केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी केपेतील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आता पाण्याची समस्या ही खरे तर राज्य सरकारने सोडवायची त्यासाठी जास्तीत जास्त मुख्यमंत्र्यांना साकडे घालता येऊ शकते. त्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र म्हणजे घरातील नळ मोडला तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना फोन करण्यासारखी ही गोष्ट झाली नाही का? ही त्यांची वेगळी युक्ती केपेची पाणी समस्या सोडविण्याचीसाठी उपयुक्त ठरते की फक्तच पत्राचा गाजावाजा, हे येत्या काळात कळेल. ∙∙∙
महामार्गाला ‘वाली’ नाही!
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पराभवामुळे बाळ्ळी ते गुळे दरम्यानच्या महामार्गाला कोणी ‘वाली’ राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे. महामार्गाचा हा भाग सध्या उखडून गेल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत, तर सरकार काणकोणमधील अंतर्गत रस्त्यांच्या हॉटमिक्समध्ये व्यस्त आहे. कवळेकर हे उपमुख्यमंत्री असताना या रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी घेऊ शकले नाहीत, तर तत्कालीन उपसभापतींनी काणकोणमधील
सर्व रस्त्यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे की नाही गंमत! ∙∙∙
नव्या सरकारची महागाई भेट
राज्यात अजून सरकार स्थापन झालेले नसताना दररोज वाढती महागाई रोखणे शक्य नसल्याचेही काही जण सांगत आहेत. त्यात रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असेही सांगतात. पण निवडणूक काळातही युद्धच सुरू होते, तेव्हा काही महागाईमुळे पेट्रोल डिझेल वाढले नाही. नेमके निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महागाई कशी वाढली? याबाबत ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे. निवडणूक काळात महागाई रोखून ठेवणे, हेही सरकारला कळते. कारण वाढत्या महागाईत जनता उमेदवारांना भरडून काढेल, म्हणून कदाचित इंधनाचे दर वाढवले नसतील. वाढलेल्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवे सरकार ठोस निर्णय घेईल, असेही काही जणांना वाटते. पण नवे सरकार स्थापन होण्यापूर्वीच महागाईत वाढ, ही एक प्रकारची भेट आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.