
पणजी: गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर, फलोत्पादन महामंडळाने स्वस्त दराने नारळ विक्री केल्यामुळे सर्वसामान्य जनतेत समाधान पसरले. गेल्या बारा ते तेरा दिवसांत महामंडळाने ७५ हजार नारळांची विक्री केली.
नारळांचे वाढते दर लक्षात घेऊन महामंडळामार्फत ही सेवा यापुढेही कायम ठेवण्याचा आपला विचार असल्याचे आमदार तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील नारळाच्या उत्पन्नात घट होत असल्याने दररोज इतर राज्यांतूनही नारळाची आयात करावी लागते. त्यामुळे नारळाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.
गणेश चतुर्थी काळात त्याचा फटका स्थानिकांना बसू नये, यासाठीच फलोत्पादन महामंडळाने स्टॉल्सवर स्वस्त दरात नारळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. महामंडळाच्या या निर्णयाला स्थानिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच अवघ्या बारा ते तेरा दिवसांत ७५ हजार नारळांची विक्री झाली, असे आमदार शेट म्हणाले.
नारळाच्या वाढत्या किमती लक्षात घेता सरकारच्या मदतीने अधिकाधिक नारळाची बाहेरून आयात करून ते स्वस्त दरात नागरिकांना उपलब्ध करून देता येऊ शकतात. त्यासंदर्भात आपण विचार करीत आहे.
सरकारने मान्यता दिल्यास पुढील काळातही महामंडळामार्फत स्वस्त दराने नारळ देण्याची सेवा कायम ठेवली जाईल, असे ते म्हणाले. सद्यःस्थितीत गोमंतकीय जनतेला दररोज लाखो नारळ लागतात. त्यामुळे ही सेवा कायम सुरू ठेवल्यास त्याचा सर्वसामान्यांना मोठा फायदा मिळेल, असेही आमदार शेट यांनी नमूद केले.
गोव्यातील नारळाच्या बागायती आजोबा, वडील यांच्या पिढीने तयार केल्या आहेत. माडाचे आयुर्मान ६० ते १०० वर्षे असते. परंतु, ७० वर्षांनंतर त्याच्याकडून उत्पन्न कमी मिळत जाते. इतर देशांमध्ये माडाचे आयुर्मान ६० वर्षांवर गेल्यानंतर त्याच्या बाजूला दुसरा माड लावला जातो. पाच ते दहा वर्षांनंतर नव्या माडापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाल्यानंतर जुना माड कापला जातो. गोव्यात तसे होताना दिसत नाही.
राज्यात जमिनीचे दर, महागाई वाढत आहे. त्यामुळे जमीन विकत घेऊन नारळाच्या बागायती तयार करण्यास नवी पिढी तयार नाही.
माकड, रानडुक्कर, गवे आदी जंगली प्राण्यांमुळे नारळाच्या पिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. माकडांमुळे तर ५० टक्के उत्पादन घटत आहे.
गेल्या काही वर्षांपासून नारळाला कीड लागत आहे. त्यामुळे त्याची वाढ होत नाही. परिणामी, अशा नारळांची विक्री होत नाही.
बागायतींत काम करण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. किंबहुना माडावरून वेळेत नारळ उतरण्यासाठी पाडेली मिळत नाहीत.
– पूर्वीचे पाडेली माडावर चढल्यानंतर कीड वगैरे आढळून आल्यास तत्काळ त्याची माहिती शेतकऱ्यांना देत होते. तितका त्यांचा अभ्यासही होता. त्यामुळे शेतकरी तत्काळ उपाययोजना करून माड वाचवत होते. आताचे बहुतांशी पाडेली बाहेरच्या राज्यांतील आहेत. त्यांना याबाबतचा अभ्यास नाही. त्यामुळे अनेक ठिकाणचे माड मरून जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.