Goa Rain : गोव्यात पुन्हा दाणादाण! जोराचे वारे आणि विजांचा कडकडाट; काही ठिकाणी 24 तास बत्ती गुल

Goa Rain Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच आहे. पडझडीसह वाहतूक कोंडी, खंडित वीज पुरवठ्यामुळेही जनजीवन विस्कळीत झाले. वीज कर्मचारी टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात गुंतले आहेत.
Mangeshi Temple
Mangeshi TempleDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली/वाळपई ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झाडांची  पडझड सुरूच आहे. या पडझडीमुळे डिचोली, सत्तरीत मोठे नुकसान झालेले आहे. गेल्या तीन दिवसापासून  संध्याकाळी सत्रात गडगडाटासह  पावसाची हजेरी लागते. पडझडीसह वाहतूक कोंडी, खंडित वीज पुरवठ्यामुळेही जनजीवन विस्कळीत झाले.

सोमवारी संध्याकाळपासून विविध ठिकाणी मोठी पडझड झाली आहे. त्यात  घोटेली  धनगरवाडा, केरी-सत्तरी येथे रस्त्यावर माड पडल्याने वाहतूक कोंडी झाली. पर्ये सत्तरी येथील भूमिका  विद्यालयाच्या गेटवर  आणि कुंपणावर गुलमोहोराचे झाड पडून नुकसान झाले. तसेच परवारवाडा खोतोडा सत्तरी येथे सोनिया सदानंद परवार यांच्या घरावर सावरीचे झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले.

सुदैवाने घरावर झाड पडले, त्यावेळी सोनिया ही घरात आतील खोलीत होती. तर मुलगा घराबाहेर होता. त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली. यावेळी परवार यांच्या घरातील सर्व कौले जमीनदोस्त झाली. यात सुमारे २ लाखांहून अधिकचे घराचे नुकसान झाले असून ३ लाखांहून अधिकची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

मंगळवारी संध्याकाळी  पर्ये तुळशिमळ  येथे रस्त्यावर व वीज वाहिनीवर झाड पडून नुकसान झाले आहे. यावेळी सर्व ठिकाणी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने मदत कार्य केले आहे. पणजीसह राज्यभरात आज सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. परिणामी विविध ठिकाणी वाहतूक कोंडी वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे लोक त्रस्त झाले होते.

डिचोलीत दुसऱ्या दिवशीही धुमाकूळ

सलग दुसऱ्यादिवशी परतीच्या पावसाने धुमाकूळ घालताना डिचोलीतील बहूतेक भागात दाणादाण उडवली. सोमवारीप्रमाणेच आज (मंगळवारी) सायंकाळी विजांचा लखलखाट, ढगांचा गडगडाट आणि जोरदार वाऱ्यासह डिचोलीसह काही भागात परतीच्या पावसाने तडाखा दिला. मात्र, कालच्या मानाने आज पावसाचा जोर ओसरला होता. जोरदार वाऱ्यामुळे काही भागात किरकोळ पडझड झाली. तर डिचोली शहर भागात वीज खंडित झाली. तासभर सर्वत्र अंधार पसरला होता. आज सायंकाळी ६.१५ च्या सुमारास विजांच्या लखलखाटासह पर्जन्यवृष्टी झाली.

वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान

रस्त्यावर झाडांची पडझड होत असल्याने बहुतांशवेळा वीज वाहिन्यांचे नुकसान होते. त्यामुळे वीज  पुरवठ्यावरही विपरीत परिणाम होत आहे.  वीज कर्मचारी  टप्याटप्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात गुंतले  आहेत. यावेळी वाळपई अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेश्वर गावस, कृष्णा गावस, श्रीकांत गावकर, सोमनाथ गावकर व इतरांनी मदत व बचावकार्य केले. 

पावसाचा तडाखा; उसकईत २४ तास बत्तीगुल

सोमवारी सायंकाळी विजेच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा तडाखा बार्देश तालुक्याला बसला. तर उसकई गावाला या पावसाचा फटका जरा जास्तच बसल्याने, पाच ठिकाणी झाडे कोसळली. परिणामी वीजपुरवठा खंडित झाला, जो २० तासानंतरही पूर्ववत झाला नव्हता.

सेंट अँथनीवाडा येथे वीज कोसळली. यामुळे चिंचचे झाड उन्मळून वीज खांबसमवेत सुभाष पोकळे यांच्या घरावर पडले. यात उच्च दाब वाहिन्यांचे तीन खांब व वाहिन्या तुटल्या. शिवाय पोकळे यांच्या घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोसळलेल्या विजेचा स्पर्श कुणालाही झाला नाही.

उच्च दाब वीज वाहिन्यांसह खांब तुटल्याने संपूर्ण उसकई-पालये-पुनोळा आणि बस्तोडा पंचायत क्षेत्राचा वीजपुरवठा खंडित झाला. रात्री उशिरा वीज कर्मचाऱ्यांनी बस्तोड्याचा वीज पुरवठा सुरळीत केला. मात्र, उसकईतील तुटलेले वीज खांब आणि वीज वाहिन्या जोडण्याचे काम मंगळवारी सकाळी हाती घेण्यात आले.

जागबाई मंदिराजवळ तुटलेल्या वाहिन्या दुपारपर्यंत दुरूस्त केल्या. तसेच तुटलेल्या खांबांच्या जागी नवीन खांब उभारण्याचे काम वीज खात्याने कंत्राटदारांमार्फत हाती घेतले. पुनोळा येथे मद्य उत्पादक कंपनीजवळ आणि चर्चजवळ तुटलेल्या वीज वाहिन्या जोडणीचे काम संध्याकाळी सुरू करण्यात आले. काही भाग वगळता बहुतेक उसकई पंचायत क्षेत्रातील वीज पुरवठा मंगळवारी संध्याकाळी ४ पर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

Mangeshi Temple
Goa Rain : परतीच्या पावसाने 'अग्निशमन'ची तारांबळ! बार्देश, डिचोली, सत्तरीत झाडांची पडझड; पिकांचेही नुकसान

बार्देश तालुक्यात ३० झाडांची पडझड

रात्री ८ पर्यंत हा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वीज खात्याच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उसकईतील लोकांना २४ तास विजेअभावी काढावे लागले. सोमवार, ७ रोजी संध्याकाळी लागलेल्या वादळी पावसामुळे बार्देश तालुक्यात एकूण ३० झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. यातील बहुतेक झाडेही हळदोणा मतदारसंघात कोसळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com