
Vishwajit Rane Visit Mapusa District Hospital
म्हापसा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाला आज अचानक भेट देऊन कामचुकारपणा करणाऱ्या तिघा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तसेच रुग्णांशी कसे वागावे याचे डॉक्टरना ‘धडे’ देतानाच त्यांना महत्त्वपूर्ण ‘डोस’ही दिले.
या इस्पितळातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांच्या गैरशिस्तपणाबद्दल आरोग्यमंत्र्यांपर्यंत लोकांच्या तक्रारी पोचल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज इस्पितळाला अचानक भेट दिली असता तेथील अंदाधुंद कारभार पाहून ते संतप्त बनले. दरम्यान, आरोग्यमंत्र्यांचा रुद्रावतार पाहून इस्पितळातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली.
कामचुकार कर्मचाऱ्यांची माहिती देण्याची सूचना त्यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केली. यापूर्वी हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी या इस्पितळास भेट देऊन तेथील गैरव्यवस्थापनाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
1. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची सेवा करण्याऐवजी काही कर्मचारी दार बंद करून गप्पा मारत होते. त्यातील एक महिला ही त्यांच्या वाळपई मतदारसंघातील आहे.
2. आपण कोणत्याही परिस्थितीत हा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असे त्यांनी सांगितले. तसेच तिघा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. त्यात रुग्णवाहिकेचा चालक सुबोध नाईक व गुरुदास पेडणेकर आणि एलडीसी यशवंत गावठणकर यांचा समावेश आहे.
3. इस्पितळातील काही डॉक्टरांच्या बेशिस्तपणाबद्दल आरोग्यमंत्र्यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला. त्यांनी एप्रन हा पोशाख घातला नव्हता, तसेच नेम प्लेटही लावली नव्हती. ज्यांनी एप्रन परिधान केले नव्हते, त्यांना ते ताबडतोब घालण्याचे फर्मान मंत्र्यांनी सोडले.
4.तसेच कामात बेशिस्तपणा व हलगर्जीपणा खपवून घेणार नाही. तसे केल्यास तात्काळ निलंबित करण्यात येईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला.
रुग्णवाहिकेच्या दोन चालकांसह तिघांना सेवेतून निलंबित करण्यामागे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त यावी आणि ते लोकसेवेसाठी असतात हा संदेश जाणे आवश्यक आहे, असे राणे म्हणाले. इस्पितळात कधी डॉक्टर तर कधी कर्मचारी वेळेवर उपलब्ध नसतात, असे यावेळी आढळून आले. जिल्हा इस्पितळात सुधारणा कराव्या लागतील. काही व्यवस्था नीट कराव्या लागतील, असेही राणे म्हणाले. यापुढे गोव्यातील सर्व सरकारी इस्पितळांमध्ये रक्तचाचणी करताना कॅन्सरच्या चाचण्यांची सोय उपलब्ध करून दिली जाईल, असे राणे म्हणाले.
उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात ‘आयसीयू’ विभाग सुरू करण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध मिळाव्यात याची आम्ही काळजी घेत आहोत.
जे कर्मचारी कामचुकारपणा करतील त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, ती भरून काढली जाईल.
इस्पितळाच्या बेसमेंटमध्ये काही खासगी रुग्णवाहिका गैरप्रकार करत आहेत, त्यांच्यावर देखील योग्य कारवाई केली जाईल.
मागील सात महिन्यांपासून इस्पितळातील सीटी-स्कॅन मशीन नादुरुस्त आहे. नवीन मशीन उपलब्ध करून देण्याबाबत सरकारला कळविले आहे.
उत्तर गोवा इस्पितळ ‘जीएसआयडीसी’ने बांधले आहे. त्यामुळे या इस्पितळाची देखरेख देखील जीएसआयडीसीकडे असावी यासाठी सरकारला विनंती करणार आहे.
शवागृहातील काही कंपार्टमेंटचे तापमान कमी-जास्त होत आहे. त्याची दुरुस्ती केली जाईल.
रुग्णवाहिकांची मुद्दाम मोडतोड करणे, त्या नादुरुस्त करणे तसेच कर्मचाऱ्यांनी कामावर दांडी मारणे असे प्रकार यापुढे कधीच खपवून घेतले जाणार नाहीत. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त यावी म्हणूनच आज तिघांना निलंबित करण्यात आले. त्यांना पुढील दोन वर्षे कामावर घेतले जाणार नाही.
विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.