
नीलेश करंदीकर
‘सायडीक राव रे, म्हद्दी किदें उबो रावला?’
अत्यंत करारी, हिणकस आवाजाने मी दचकलो. तो हाकारा माझ्यासाठीच होता. चट्कन बाजूस झालो. ती व्यक्ती एकाला घेऊन आत गेली. ‘कशाला त्या व्यक्तीला जाऊ दिले?’ असा प्रश्न घेऊन आजूबाजूचे असंख्य चेहरे माझ्याकडे पाहत होते. मी गोंधळलो होतो. वास्तविक, अत्यवस्थ असलेल्या माझ्या मित्राच्या आईला स्ट्रेचरवर ठेवून रांगेत उभा होतो. नंबर माझाच होता. सकाळपासून नंबर लावून रांगेत उभे राहिलेले अनेक जण होते, ते कावले.
‘जीएमसीत कधीच सुधारणा होणार नाही’, ‘आम्ही काय झक मारायला उभे राहिलो आहोत इथे?’, ‘सगळीकडे मेली वशिलेबाजी!’, अशी वाक्ये कानावर आदळत होती. बाहेरच्या गर्दीपेक्षा मनात विचारांची गर्दी जास्त काहूर माजवत होती.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा म्हणजेच जीएमसीचा ओपीडी परिसर म्हणजे असंख्य मानवी भावनांचा महाकुंभ. दु:ख, वेदना, असहाय्यता, अगतिकता, चिंता, दगदग, चिडचीड, काळजी, शिस्त, सेवाभाव, समर्पण, सुटकेचा नि:श्वास अशा असंख्य भावनांच्या डोहांमध्ये डुबक्या मारणारे श्रद्धावंत इथले वारकरी. लोक इथे जन्मही घेतात आणि दगावतातही. जन्मापासून मृत्यूपर्यंत देहाला होणारी व्याधी अनेकांना इथे घेऊन येते. कधी आपल्या स्वत:साठी तर कुणा आप्तेष्टासाठी माणूस ‘जीएमसी’ नामक या रहाटगाडग्यात येतो.
प्रसंगामुळे कधीतरी येथे येणारे आपण इतके वैतागतो, तर दररोज इथे सेवा बजावणारे डॉक्टर, परिचारिका, परिचारक, सेवेकरी, ओपीडीच्या दारावर उभे असणारे सेक्युरिटी, रजिस्ट्रेशनच्या खिडकीपलीकडे असलेले कर्मचारी, वॉर्डबॉय आणि इतर असंख्य लोक यांचे काय होत असेल? पराकोटीची सहनशक्ती आणि सेवाभाव हे दोन्ही सांभाळताना होणारी तारेवरची कसरत यांना स्वत:साठी जगायला देत असेल का?
कधी कधी आपण फक्त आपल्यापुरता विचार करतो. त्यांच्या भूमिकेत जाऊन आपण आपल्याला होणारी दगदग पाहतच नाही. ‘त्यांना याचसाठी पगार मिळतो’, असा अत्यंत हिणकस, व्यावहारिक विचार आपण करतो. पण त्यासाठी जे त्यांना सोसावे लागते ते आपण तेवढे पैसे मिळाले तरी सोसू का, हा विचारही आम्हांला शिवत नाही.
स्वत:ला विसरून इतरांसाठी सेवाभावनेने व्रत म्हणून केलेल्या कार्यासाठी प्रसंगी शिव्याही खाव्या लागतात, दुषणे सहन करावी लागतात त्याचा विचारही आपण करत नाही. आपण स्वत: किंवा आपण ज्याला घेऊन आलो आहोत, तो रुग्ण बरा होण्याशी आपला मतलब असतो. डॉक्टरांच्या हातून किंवा अन्य कुणाच्या दुर्लक्ष करण्याने रुग्ण दगावतो तेव्हा ती घडलेली अपवादात्मक घटना आपण एवढी मोठी करतो की, त्यांच्या हातून ठणठणीत बरे होऊन गेलेली लाखो माणसे, घटना आपल्याला स्मरतही नाहीत. तशा अर्थाने हा ‘थँकलेस जॉब’ असतो.
‘वैद्यो नारायणो हरि:’ ते ‘गरज सरो वैद्य मरो’पर्यंतचा आपला प्रवास सहज होतो. अपवादाने घडलेली चूक, मुद्दाम केलेला वैद्यकीय घोटाळा, पैशांचा अपहार या अशा घटनांच्या नकारात्मक बातम्या आम्ही वर्तमानपत्रवाले जेव्हा ठळकपणे छापतो, तेव्हा याच जीएमसीमध्ये नियमित घडणाऱ्या लाखो घटनांची सकारात्मक बातमी अभावानेच करतो.
नकारात्मक, वाईट, चुकीचे ऐकायची व वाचायची इतकी सवय झाली आहे की, जगात काही चांगले घडते यावरचा आपला विश्वासच उडालाय! चांगुलपणाला आपण मूर्खपणाच्या सदरात टाकतो. हजारो दहशतवादी घटना सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कधी घडतच नाहीत. दहशतवाद्यांचा एखादा मनसुबा प्रत्यक्षात उतरतो तेव्हा मात्र आम्ही सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह लावून मोकळे होतो.
पोलिसांनी अट्टल गुन्हेगाराला पकडल्याची छापून आलेली बातमी एका हॉटेलमध्ये वाचणाऱ्या गृहस्थाचा ‘आरे हप्तो पावूंक ना म्हणोन धल्ला आसतलो’ हा हिणकस शेरा मला विषण्ण करून गेला. हे व्यवस्थेचे अपयश आहे की आपला चांगुलपणावरचा, कर्तव्यपरायणतेवरचा उडालेला विश्वास आहे, हेच कळेनासे होते.
चांगल्या घटनेकडेही आपण निर्भेळ, चांगल्या नजरेने पाहू शकत नाही हे वैचारिक आंधळेपण आपण पूर्वग्रहाची पट्टी डोळ्यावर बांधल्यामुळे गांधारीगत ओढवून घेतलेले आहे. वाईट घडत नाही, अशातला भाग नाही; पण आपण त्याकडे अपवाद म्हणून पाहत नाही. ‘हे असेच होणार’ म्हणून पाहतो. वाईट होणे आपण गृहीत धरतो आणि चांगुलपणा दूर ठेवतो.
अभावितपणे आत घुसलेल्या गृहस्थालाही डॉक्टरने तपासले आणि माझ्या मित्राच्या आईलाही. वेळेत उपचार झाले. यमाच्या दारी पोहोचलेल्या तिला डॉक्टरांनी परत आणले. या सगळ्या प्रक्रियेत आणि फार पूर्वी मला स्वत:ला उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यामुळे कराव्या लागलेल्या तपासण्यांदरम्यान जीएमसीचे हे सगळे सेवाव्रती विश्व त्रयस्थपणे अनुभवता आले.
बरे वाईट सगळ्या तर्हेचे अनुभव आले. ड्रेसिंग करण्याच्या विभागातील कर्मचारी काम व्यवस्थित करतो पण कायम त्रासलेला का असतो, आलेल्या गेलेल्यावर तो कायम कावत का असतो, याचे उत्तर सापडले तेव्हा एक वेगळीच बाजू समजली.
तो त्याला कामाचा त्रास होतो म्हणून दगदगत नव्हता तर रुग्ण आपली काळजी घेत नाहीत याचा त्याला प्रचंड राग यायचा. रुग्णासोबत आलेले लोक इतर रुग्णांचाही विचार करत नाहीत, याचा त्याला राग यायचा. अशा असंख्य कावलेल्या कर्मचाऱ्यांच्या मागचा माणूस दिसला तेव्हा त्यांचा वैताग, मला चीड आणेनासा झाला.
कोविड काळामध्ये या सर्व आरोग्यसेवकांनी जे काही केले त्याला कशाचीही तोड नाही. ‘पॉझिटिव्ह’ निदान झालेला मित्र, आप्त आता वाचेल की नाही, या काळजीने आपण किती घाबरायचो.
आताही विचार केला तर अंगावर काटा येतो. पण, रुग्णांना सामोरे गेल्याने आपणही पॉझिटिव्ह होऊ शकतो, याची पूर्ण कल्पना असूनही जे प्राप्त परिस्थितीला सामोरे गेले त्यांची व त्यांच्या घरच्यांची मानसिक अवस्था आपल्या मनाला कधी शिवलीच नाही. ‘फ्रन्टलाइन’ला कोविडकाळी लढणाऱ्या या योद्ध्यांचे कार्य आपल्याला आता जराशा गैरसोयीच्या तक्रारी करताना अजिबात स्मरत नाही. झालेली आरोग्याची समस्या निवारण झाली की, पहिले मागणे आपण देवाजवळ करतो ते म्हणजे, ‘पुन्हा येथे आणू नकोस रे बाबा!’
आज मित्राच्या आईला घरी पोहोचवण्यापूर्वी हे सगळे एखाद्या चलचित्राप्रमाणे डोळ्यांसमोर तरळून गेले. जीएमसीच्या अखंड सेवाभावाचा हा स्रोत एक वेगळीच ऊर्जा देऊन गेला. गाडी बाहेर काढलीच होती, ती जीएमसीकडे वळवली. दुचाकी पार्क करून जीएमसीच्या ‘एन्टरन्स’ व ‘एक्झिट’ कमानीच्य मधोमध उभा राहिलो तेव्हा मित्राच्या आईला मरणाच्या दारातून परत आणणारी वास्तू पाहताना क्षणभर डोळे ओलावले. हात आपोआप जोडले गेले. का कोण जाणे, दंडवत घालायला वाकणार इतक्यात मागून हॉर्नच्या पार्श्वसंगीतासह आवाज आला;
‘सायडीक राव रे, म्हद्दी किदें उबो रावला?’
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.