Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पात गोव्यासाठी कोणतीच आर्थिक तरतूद नाही. गोव्यातील कल्याणकारी योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि उपक्रमांसाठी आर्थिक तरतूद होईल अशी अपेक्षा होती, मात्र ती फोल ठरली.
याउलट म्हादईप्रश्नी राज्यात असंतोष भडकला असतानाच कर्नाटक विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तेथील सिंचनावर 5 हजार 300 कोटी रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. गोव्याच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार असल्याची प्रतिक्रिया विरोधकांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ विचारवंत क्लिओफात कुतिन्हो यांनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकला आणखी किती कोटी देणार? असा खोचक प्रश्न विचारला आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्नाटकासाठी अनेक योजनांमध्ये विशेष तरतूद केल्याचे दिसून येत आहे. त्यात गोव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आणि गंभीर बाब म्हणजे कर्नाटकतील सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार 300 कोटींचा भरीव निधी अर्थसंकल्पात मंजूर केला आहे.
यापूर्वीच तेथील सत्ताधारी भाजप सरकारने म्हादई प्रकल्पासाठी 500 कोटींची तरतूद केल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे कर्नाटकाचा म्हादईचे पाणी वळवण्याचा इरादा स्पष्ट होतो. याचबाबत राज्यात प्रचंड असंतोष आहे.
लोकांचा अर्थसंकल्प
अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ध्येय ‘सबका साथ, सबका विकास’, ‘सबका विश्वास, सबका प्रयास’ अधोरेखित करणारा आहे. खऱ्या अर्थाने हा लोकांचा अर्थसंकल्प आहे. त्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार मानतो. सामान्य घटकांच्या आशा-आकांक्षा समाविष्ट आहेत, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
‘अर्थसंकल्प की भाजपचे घोषणापत्र?’
कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी वळवू देणार नाही, असे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकही म्हणत आहेत. त्यासाठी न्यायालयीन लढा सुरू आहे.
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही या अर्थसंकल्पावर कडाडून टीका करत हा देशाचा अर्थसंकल्प नसून भाजपचे निवडणूक घोषणापत्र आहे, असे म्हटले आहे.
म्हादईचे पाणी वळविण्याबाबत राज्यभरात असंतोष असतानाच त्यासाठी केंद्राकडून कर्नाटकाला विशेष भरीव आर्थिक मदत देणे हा गोमंतकीय जनतेच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.