पणजी: यंदाच्या चतुर्थीसाठी मातीपासून गणपती मूर्ती बनवणाऱ्या ४११ कलाकारांनी अनुदानासाठी गोवा हस्तकला विकास महामंडळाकडे अर्ज केला आहे. त्यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना १०० रुपये मानधन प्रत्येक मूर्तीमागे देण्यात येत होते. त्यात वाढ करून आता २०० रुपये करण्यात आल आहे अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
या वर्षी मूर्तिकारांच्या आर्थिक मदतीत वाढ करताना वित्त विभागाने तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. प्रत्येक मूर्तिकाराला केवळ २५० मूर्तींसाठी अनुदान मिळणार आहे.
महामंडळाकडे नोंदणी केलेले कलाकारच अनुदानास पात्र असतील. त्यामुळे त्याचा फायदा नवीन कलाकारांना घेता येणार नाही. गणेशमूर्ती कलाकारांनी मातीच्या मूर्ती स्वतः केलेल्या असणे आवश्यक आहे. नवीन कलाकारांची नावे यादीतून वगळल्यावरच त्यांची नोंदणी केली जाईल, असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
गणेशमूर्तींच्या रंगकामासाठी लागणारे साहित्य बरेच महाग झालेले आहे. त्यामुळे सरकारने गोमंतकीय मूर्ती कलाकारांसाठी देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याची मागणी यापूर्वी केली होती. हा प्रश्न हल्लीच झालेल्या विधानसभेवेळी काही मतदारसंघातील आमदारांनीही खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी उपस्थित केला होता. तेव्हा संबंधित मंत्र्यांनी त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.