Goa TET 2025: शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेत 'विवाहबाह्य संबंधांवर' उतारा, परीक्षार्थी संतप्त; समाज माध्यमांवर उठली टीकेची झोड

Konkani Paper Controversy: गोव्यामध्ये बुधवारी (10 डिसेंबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेमध्ये एक अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह बाब समोर आली आहे.
Konkani Paper Controversy
Konkani Paper ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यामध्ये बुधवारी (10 डिसेंबर) घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेमध्ये एक अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह बाब समोर आली आहे. या परीक्षेच्या कोकणी भाषेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरांसाठी देण्यात आलेला एक दीर्घ मजकूर हा अश्लील आणि महिलांचा अवमान करणारा असल्याचा जोरदार आरोप करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

नवे शैक्षणिक धोरण (NEP) लागू झाल्यानंतर शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या आणि नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. यावर्षी राज्यभरातून सुमारे २,८०० बीएड पदवीधर या परीक्षेला प्रविष्ट झाले होते. मात्र, या महत्त्वाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील मजकूर आक्षेपार्ह ठरल्याने परीक्षेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Konkani Paper Controversy
Goa TET 2025: सुवर्णसंधी! शिक्षक होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, गोवा 'टीईटी'चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर

नेमका कोणता मजकूर आक्षेपार्ह?

कोकणी प्रश्नपत्रिकेमध्ये 'उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा' या विभागासाठी जो मजकूर देण्यात आला होता, त्याचा आशय अत्यंत संतापजनक आहे. प्राप्त माहितीनुसार, त्या मजकुरात "नवरा नपुंसक असल्याने अपत्यप्राप्तीसाठी विवाहबाह्य संबंध ठेवले गेले" या विषयाशी संबंधित कथा किंवा मजकूर होता. या दीर्घ मजकुरावर आधारित काही प्रश्न परीक्षेत विचारण्यात आले होते. अनेक परीक्षार्थींनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या मजकुराच्या निवडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये, विशेषत: शिक्षकांच्या (Teacher) पात्रता चाचणीमध्ये, अशा प्रकारच्या संवेदनशील आणि लैंगिक विषयावर आधारित मजकूर देणे पूर्णपणे अयोग्य आणि निंदनीय असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

कोकणी राखणदार मंचकडून तक्रार आणि मागणी

या आक्षेपार्ह मजकुराविरुद्ध कोकणी राखणदार मंच या संस्थेने कठोर भूमिका घेतली आहे. या मंचने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप महिलांचा अवमान करणारे आणि नैतिकतेच्या दृष्टीने घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. मंचने शिक्षण विभागाकडे तातडीने तक्रार दाखल केली असून, प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या आणि त्याला अंतिम मंजुरी देणाऱ्या व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. प्रश्नपत्रिकेच्या आरेखनामध्ये अशा प्रकारचा मजकूर कसा समाविष्ट करण्यात आला, यामागील हेतू काय होता, याची संपूर्ण जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Konkani Paper Controversy
Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

समाजमाध्यमांवर तीव्र टीका

प्रश्नपत्रिकेचा संबंधित आक्षेपार्ह भाग परीक्षा संपताच समाजमाध्यमांवर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या मजकुरामुळे सर्व स्तरांतून, विशेषतः महिला संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांकडून तीव्र टीका आणि संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षकांना प्रशिक्षण देणाऱ्या आणि त्यांची पात्रता तपासणाऱ्या यंत्रणेने अशा प्रकारची असंवेदनशील चूक करणे हे गोव्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अत्यंत लाजिरवाणे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून शैक्षणिक संस्थांची विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सरकारवर आली आहे.

शिक्षण विभागाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com