

पणजी: भविष्याचा विचार करून सरकारने राज्यभरात सुमारे ३२५ एमएलडी क्षमतेच्या एकूण ११ जलशुद्धीकरण प्रकल्पांचे काम सुरू केले आहे. यातील काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यामुळे पुढील वर्षभरात गोमंतकीय जनतेला दरदिवशी एक हजार लीटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.
यासंदर्भात शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना पेयजल खात्याचे मुख्य अभियंता विश्वंभर भेंडे म्हणाले, ‘‘राज्यात साळावली, गांजे, वेर्णा, शिवोली, अस्नोडा, तुये, मोर्ले, मेणकुरे अशा ११ ठिकाणी पिण्याचे पाणी खात्याने जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले होते. त्यातील पाच ते सहा प्रकल्प पूर्ण झाले आहेत. उर्वरित प्रकल्प पुढील वर्षभरात पूर्ण होतील.
सध्या गोमंतकीयांना दररोज ६७५ एमएलडी पिण्याच्या पाण्याचा खात्याकडून पुरवठा केला जात आहे. त्यात वर्षभरात ३२५ एमएलडी पाण्याची भर पडेल. भविष्यात लोकसंख्या वाढीसह आस्थापने, कंपन्या, हॉटेल्स, पायाभूत साधन सुविधा आदींमध्ये वाढ होणार आहे. अशा स्थितीत पाण्याची मोठ्या प्रमाणात गरज भासणार असून, या नव्या प्रकल्पांमुळे वर्षभरानंतर प्रत्येक दिवशी सुमारे एक हजार लीटर पाणी गोमंतकीयांना मिळू शकेल, असे भेंडे यांनी नमूद केले.
तर पाण्यावर निर्बंध
मान्सून लांबल्याने शुक्रवारी पेयजल आणि जलसंपदा खात्यांचे मंत्री, अधिकाऱ्यांची बैठक झाली. हवामान विभागाने २२ जूनपासून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. तसे न झाल्यास संबंधित खात्यांची पुन्हा बैठक घेऊन पाणी वापरावर मर्यादा घालण्याचे निश्चित केले आहे, असेही मुख्य अभियंता विश्वंभर भेंडे यांनी सांगितले.
जलशुद्धीकरण प्रकल्पांसोबतच विविध लघु, मध्यम आकाराची धरणे तसेच बंधारे बांधण्याची कामे जलसंपदा खात्याने सुरू केली आहेत. त्यामुळे धरण, बंधाऱ्यांतील पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पांत आणून त्याचा नागरिकांना पुरवठा करण्यात येणार आहे. भविष्यात जनतेला पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आतापासूनच करण्यात येत आहेत. - विश्वंभर भेंडे, मुख्य अभियंता, पेयजल खाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.