Teacher Medical Leave: गंभीर आजारी शिक्षकांना मिळणार वर्षभर रजा! शिक्षण संचालकांकडून आदेश जारी; संपूर्ण माहिती वाचा..
पणजी: सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील नियमित शिक्षकांना ज्यांना ‘टर्मिनल (टोकाचा) आजार’ असल्याचे निदान झाले आहे, त्यांना ३६५ (तीनशे पासष्ट) दिवसांपर्यंत पूर्ण पगारी वैद्यकीय रजा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. विशेष वैद्यकीय रजा धोरणाअंतर्गत ही रजा मिळणार आहे, हे धोरण शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व नियमित शिक्षकांना लागू असेल, असे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी म्हटले आहे.
झिंगडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, पात्र शिक्षकांना ३६५ दिवसांपर्यंत पूर्ण पगारी वैद्यकीय रजा मिळेल. आवश्यक असेल तर ३६५ दिवसांपेक्षा जास्त मुदतवाढ देण्याचा विचार फक्त सरकारी वैद्यकीय मंडळाच्या शिफारशीवर आणि सरकारच्या मान्यतेने केला जाईल. वैद्यकीय प्राधिकरणाने प्रमाणित केलेले, ते आजार असावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
रजेच्या कालावधीत, शिक्षकांचे सेवा लाभ, ज्येष्ठता, सेवेची सातत्य, पेन्शनरी फायदे व इतर स्वीकार्य हक्क अप्रभावित राहतील. सरकारी/सरकारी अनुदानित/प्राथमिक/ उमा. व विशेष शाळांच्या प्रमुखांनी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. पात्र प्रकरणांवर प्रक्रियेत कोणतीही टाळाटाळ करू नये. हा आदेश तात्काळ लागू होईल.
या आजारांसाठी मिळणार पगारी रजा
शेवटच्या टप्प्यातील कर्करोग
अंतिम टप्प्यातील अवयव निकामी होणे (मूत्रपिंड, यकृत, हृदय)
अम्योट्रोफिक लॅटरल स्क्लेरोसिस (एएलएस)
प्रोग्रेसिव्ह न्यूरोडीजनरेटिव्ह डिसऑर्डर
रजा अशी मिळवावी लागेल!
शिक्षकाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय (बांबोळी) यांनी जारी केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आणि इतर सहाय्यक कागदपत्रे, जर असतील तर, संस्थाप्रमुखांकडे अर्ज सादर करावा.
संस्थाप्रमुख पडताळणी आणि मंजुरीसाठी अर्ज शिक्षण संचालनालयाकडे पाठवतील. आवश्यक असल्यास, पुढील मूल्यांकनासाठी प्रकरण सरकारी वैद्यकीय मंडळाकडे पाठवता येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

