Goa Party: सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष, पोलिसांचा नाकर्तेपणा आणि पर्यटन व्यावसायिकांचा सहभाग यामुळेच अमलीपदार्थांचे लोण गोव्यात पसरले आहे असा आरोप करून हा प्रकार वेळीच रोखला नाही तर भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा गंभीर इशारा माजी मंत्री तथा शिवोलीचे माजी आमदार विनोद पालयेकर यांनी दिला.
गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते व हॉटेलमालक संघटनेचे सदस्य सेराफिन कोता यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
राज्याच्या समुद्रकिनारी भागात बेसुमार वाढलेल्या संगीत पार्ट्या आणि त्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण, त्यात होणारा ड्रग्जचा सर्रास वापर, लहान मुले आणि महिलांचे लैंगिक शोषण आणि वापर यामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळेच उच्च न्यायालयाने दखल घेऊन रात्री 10 नंतर कोणत्याच स्वरूपाच्या पार्ट्या उघड्यावर करता येणार नाहीत असा आदेश दिला आहे.
किनारपट्टी भागातील बेकायदेशीर बाबी रोखण्यासाठी पर्यटन व्यवसायावर ताशेरे ओढत पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेला सतर्राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात अनैतिक व्यवसायांत गुंतलेल्या सर्वांचे धाबे दणाणले आहे. या विषयावर गोमंतक टीव्हीने विशेष मालिका चालविली आहे.
सेराफिन कोता म्हणाले की, राज्यातील पर्यटन व्यवसायात वाढलेल्या बेकायदेशीरपणामुळे गोव्याचे नाव बदनाम होत आहे. प्रामुख्याने उत्तर गोव्यातील किनारी भागात पसरलेला ड्रग्जव्यवसाय गोव्याला बदनाम करीत आहे.
पूर्वी गोव्याबाहेरील लोक गोवेकरांना सन्मानपूर्वक वागवत होते. आज ही परिस्थिती राहिलेली नाही. याला व्यावसायिकच जबाबदार आहेत. सरकारनेही अशा बेकायदेशीर कृत्यांना रान मोकळे सोडले आहे. यावर वेळीच अंकुश घालणे गरजेचे आहे, अन्यथा राज्यातील पर्यटन व्यवसाय अन्य राज्यांमध्ये वळला जाईल, असे ते म्हणाले.
ड्रग्ज लॉबी सक्रिय असल्याचा सनसनाटी आरोप
सरकारी यंत्रणांचे दुर्लक्ष आणि उदासीनता यामुळेच अशा प्रकारच्या कर्णकर्कश संगीत पार्ट्यांनी किनारी भागात धुमाकूळ घातला आहे. या पार्ट्यांचे आयोजकच अमलीपदार्थ पुरवितात. यावर पोलिसांनी यंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पूर्वी हे प्रमाण कमी स्वरूपात होते. आज उत्तर गोव्यातील किनाऱ्यांवर अक्षरशः ड्रग्जचा वापर वाढल्यामुळेच न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागत आहे.
ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या लॉबीज् कार्यरत असतात, तशी ड्रग्ज लॉबीही राज्यात सक्रिय आहे. त्यामध्ये स्थानिकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग्स पेडलर सहभागी आहेत. यापूर्वीही आपण सरकारी यंत्रणेचे याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काहीच उपयोग झाला नाही, अशी खंत पालयेकर यांनी यावेळी बोलून दाखविली.
विनोद पालयेकर, माजी मंत्री-
राज्यात सहज मिळणाऱ्या ड्रग्जमुळे पर्यटकही वाढले आहेत. या पर्यटकांना तशाच स्वरूपाच्या पार्ट्यांची आवश्यकता असते. राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखवताना ड्रग्जव्यवसाय पूर्णतः मोडून काढला पाहिजे. अन्यथा युवापिढी बरबाद होईल.
सेराफिन कोता हॉटेलमालक संघटनेचे सदस्य
ड्रग्ज, रेव्ह पार्ट्यांना सरकारने रान मोकळे सोडले आहे. यावर वेळीच अंकुश घालणे गरजेचे आहे. अन्यथा राज्यातील पर्यटन व्यवसाय अन्य राज्यांमध्ये वळता होईल. आपण आतापासूनच काळजी घेतली पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.