Goa : गोव्याची उत्पत्ती कशी झाली आहे माहितीए का?

गोवा, भारताच्या इतर भागांबरोबरच, गोंडवनभूमीचा (गोंडवानालँड) या दक्षिण खंडाचा एक भाग होता.
Goa Geography Formation
Goa Geography Formation Dainik Gomantak
Published on
Updated on

सुमारे 13.8 अब्ज वर्षांपूर्वी एका मोठ्या महास्फोटाने अखिल विश्वाची उत्पत्ती झाली, असे शास्त्रज्ञ मानतात (बिग बँग थिअरी) आणि आपल्या पृथ्वीची निर्मिती 4.54 अब्ज वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते. साधारणतः 50 कोटी वर्षांच्या आत, म्हणजे चार अब्ज वर्षांपूर्वी, आज अस्तित्वात असलेले महासागर तयार झाले. आर्थर वेगनर यांनी 1912 साली ‘कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट’ हे गृहीतक (नंतरचा सिद्धांत) शास्त्रीय जगतासमोर मांडले. या सिद्धांतानुसार आपल्या पृथ्वीतलावर समुद्राच्या पाण्यावर विसावलेले भूखंड वेगळे होण्यापूर्वी एकत्रित होते. पृथ्वीवर एकच अखंड भूभाग होता.

आता वैज्ञानिकांनी मान्य केले आहे की, कोटी कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा भूभाग अखंड होता. या भूखंडाला नंतर ‘पांगिया’ असे नाव देण्यात आले. सुमारे 20 कोटी वर्षांपूर्वी हा भूखंड गोंडवन आणि लॉरेशिया अशा दोन खंडात विभाजित झाला. पृथ्वीवरच्या या भूखंडांचा प्रवास सातत्याने चालू असतो, कधी एकमेकांपासून दूर, तर कधी एकमेकांजवळ. पण, या घटना भूगर्भीय पातळीवर आणि भूशास्त्रीय प्रमाणांवर होत असल्यामुळे आपल्याला या हालचाली जाणवत नाहीत.

गोवा, भारताच्या इतर भागांबरोबरच, गोंडवनभूमीचा (गोंडवानालँड) या दक्षिण खंडाचा एक भाग होता. सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी गोंडवनखंडाचे विघटन सुरू झाले. भारतीय प्लेट (भूखंड) आफ्रिका खंडापासून विभक्त झाली आणि उत्तरेकडे सरकू लागली. गोंडवन खंडापासून वेगळा झालेला भारतीय भूखंड उत्तर दिशेला सरकत सरकत 4.5 कोटी वर्षांपूर्वी युरेशियन उपखंडाला जोडला गेला. हा कालखंड क्रेटेशीयस कल्पाच्या शेवटी व ईओसीनच्या प्रारंभीचा काळ आहे.

तत्पूर्वी म्हणजे तो जोडण्यापूर्वी, या मधल्या 10 कोटी वर्षांच्या वाटचालीत, अनेक भूगर्भीय घटना घडल्या. भारतीय भूखंड पृथ्वीच्या आतील आवरणात खोलवर असलेल्या अतिशय गरम जागेवर सरकल्यामुळे भारतीय प्लेटवर ज्वालामुखीय क्रियाकलाप निर्माण झाला होता. भारतीय खंड आफ्रिकेच्या री-यूनियों बेटावरून सरकत असताना मध्येच ज्वालामुखीचा उद्रेक झाला. सुमारे 8.8 कोटी वर्षांपूर्वी या ज्वालामुखींचे उद्भेदन व्हायला सुरुवात झाली. हजारो वर्षे हे ज्वालामुखींचे उद्रेक चालू होते. या ज्वालामुखींच्या उद्रेकांच्या मालिकेने डेक्कन ट्रॅप्सला जन्म दिला आणि पश्चिम घाटाने आकार घेतला.

भूखंडाखाली वाढलेल्या उष्णतेमुळे बेसाल्टिक मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या आवरणात, लिथोस्फियरमध्ये फेकला गेला होता. या घडामोडींमुळे भारतीय प्लेट पूर्वेकडे झुकली आणि भारतीय द्वीपकल्पातील (पेनिनस्युलर इंडिया) प्रमुख नद्यांचा प्रवाह पूर्वेकडे बदलला. शेवटी सुमारे 6.5 कोटी वर्षांपूर्वी लाव्हा थंड झाल्यावर इथे ‘डेक्कन ट्राप’ किंवा ‘दक्षिणेचे पठार’ म्हणजे ‘पश्चिम घाट’ तयार झाले.

स्वीडिश भाषेतल्या ‘ट्राप्पा’ म्हणजे पायऱ्या या शब्दापासून या पठाराला ‘डेक्कन ट्राप’ असे नाव पडले. पश्चिम घाटातील गोवा आणि महाराष्ट्राजवळील डोंगररांगांना ‘सह्याद्री’ असेही म्हणतात. हा कालावधी डायनासोरसह पृथ्वीवरच्या अनेक प्रजाती मोठ्या प्रमाणात विलुप्त झाल्या, तो काळ आहे. जगातील अनेक शास्त्रज्ञांच्या मते भारताच्या भूभागावर झालेले ज्वालामुखींचे उद्रेक या प्रजाती नामशेष होण्यामागील प्रमुख कारण आहे.

Goa Geography Formation
Goa : गोव्यात घातलं होतं 'या' साथीच्या रोगांनी थैमान

हा भूखंडीय प्रवाह सुमारे 10 कोटी वर्षे चालू होता. हळूहळू उत्तरेकडे सरकत भारतीय भूखंड 4.5 कोटी वर्षांच्या आसपास युरेशियन उपखंडावर आदळला आणि आशियाई मुख्य भूमीशी एकसंध झाला. या प्रवाहामुळे आफ्रिका आणि भारत यांच्यामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली. येथे अरबी समुद्राचा उगम झाला. आशियाई मुख्य भूमीशी झालेल्या भारतीय भूखंडाच्या टक्करीमुळे, आशियाई खंडात चीनजवळ असलेला टेथिस समुद्र नाहीसा झाला आणि हिमालयीन पर्वतरांगा तयार झाल्या.

या भूखंडीय प्रवाहादरम्यान द्वीपकल्पीय भारताचा काही भूभाग कमकुवत ठिकाणी मुख्य भूखंडापासून तोडला गेला. यातील थोडा भाग समुद्रात वाहून गेला. मुख्य भूखंडावर उरलेल्या भागात भारतातील पश्चिम घाट व पश्चिम किनारपट्टीचा उदय झाला. अशा प्रकारे, भारताचा पश्चिम किनारा, ज्याचा गोवा एक भाग आहे, भारतीय भूभागाची (इंडियन प्लेट) आशियाच्या मुख्य भूभागाशी टक्कर होण्यापूर्वी तयार झाला होता. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगा यांनी भौगोलिक सुरक्षितता प्राप्त झालेल्या गोव्याचा जन्म इतक्या विलक्षण रितीने झालेला आहे. आजही पृथ्वीच्या आवरणाखाली चालू असलेल्या अनेक भूगर्भीय घटना आपल्या गोव्याला आकार देत आहेत, सुंदर ‘सोबीत’ बनवत आहेत.

अशी ही गोवाजन्माची कथा आहे. गोव्यासारखीच गूढ, रहस्यमय अन् मनोवेधक व रम्य!

-डॉ. संगीता साेनक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com