Goa : गोव्यात घातलं होतं 'या' साथीच्या रोगांनी थैमान

इतिहासातील प्रत्येक शतकाला एका प्राणघातक महामारीने ग्रासले, जिने आबालवृद्धांचे मौल्यवान जीवन संपवले.
Diseases in Goa
Diseases in GoaDainik Gomantak

इतिहासातील प्रत्येक शतकाला एका प्राणघातक महामारीने ग्रासले, जिने आबालवृद्धांचे मौल्यवान जीवन संपवले. ब्लॅक डेथ : चौदाव्या शतकात 1331 साली बुबोनिक प्लेगची महामारी सुरू झाली होती. 1331-1770 या कालावधीत या साथमारीने युरोपच्या एक तृतीयांश लोकांचा बळी घेतला. नंतर आलेल्या सर्व साथरोगांच्या विषाणूंचा आद्य-विषाणू या प्लेगमध्ये होता.

युरोप व्यतिरिक्त या विषाणूने आशिया आणि जगाच्या इतर भागांमध्ये आपले पाय पसरवले. पश्चिम युरेशिया आणि उत्तर आफ्रिकेत 1346 ते 1353 या सात वर्षांच्या कालावधीत, अंदाजे वीस दशलक्ष लोक या राक्षसी प्लेगला बळी पडले. याला ‘ग्रेट पेस्टिलेन्स’, ‘ग्रेट प्लेग’ आणि ‘ग्रेट मॉरटॅलिटी’ अशा अनेक नावांनी संबोधले जाते. बुबोनिक प्लेग (उंदरांमुळे होणारे) याशिवाय, न्यूमोनिक प्लेग (हवेतून पसरत जो प्रथम फुफ्फुसांवर हल्ला करतो) आणि सेप्टिकॅमिक प्लेग (कीटकांच्या चाव्याद्वारे उद्भवणारा साथरोग) यांचाही माणसे मारण्यात हात होता. अठराव्या शतकात स्मॉल पॉक्स आणि टायफस यांनी त्यांचा वारसा पुढे चालवला. एकोणिसाव्या शतकात कॉलराने थैमान घातले. विसाव्या शतकात स्पॅनिश फ्लू आणि एकविसाव्या शतकात सार्स कोविड आला. प्रत्येक शतकाने विषाणूंनी केलेला हा मनुष्य संहार उघड्या डोळ्यांनी पाहिला आहे.

जगात थैमान घालणारे हे विषाणू गोव्याला तसा बरा सोडतील? गोमंतकीय इतिहासाच्या विविध कालखंडात या विषाणूंनी आपला प्रभाव दाखवला आहे. 1543 साली तत्कालीन राजधानी असलेल्या जुन्या गोव्यात कॉलराचा प्रादुर्भाव झाला. तेव्हाच्या वाढत्या लोकसंख्येला पुरेल अशी मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध नव्हती. सांडपाणी पेयजलात मिसळल्यामुळे पाणी पुरवठा दूषित झाला व ही समस्या उद्भवली. जुने गोव्याला वेगवेगळ्या कालखंडात कॉलरा, मलेरिया आणि प्लेगचा फटका बसला आहे.

लिन्शोटेन (डच व्यापारी आणि इतिहासकार, ज्याने 1583-1588 दरम्यान गोव्यात आर्चबिशप सेक्रेटरी म्हणून काम पाहिले) यांच्या मते 1583 साली कॉलराची दुसरी महामारी आली आणि 1635 साली तिसऱ्यांदा पसरलेली साथ सर्वांत भयंकर होती. त्यानंतर पुन्हा एकदा जुने गोवे ओस पाडणारी साथमारी पसरली. सर्वांनी स्थलांतर केले. अखेरीस एका शाही हुकुमाद्वारे, 1843 साली पोर्तुगिजांनी पणजी शहराला गोव्याची राजधानी म्हणून घोषित केले.

सोळाव्या शतकात गोव्यात सिफिलीस नावाचा एक अतिशय गंभीर आजार बराच कुप्रसिद्ध झाला होता. बनारस येथील भवमिश्र नावाच्या आयुर्वेदातील अत्यंत प्रतिष्ठित वैद्यांनी लिहिलेल्या ‘भावप्रकाश’ नावाच्या निबंधात, ‘पोर्तुगीजांनी गोव्यात सिफिलीसचा प्रादुर्भाव केला’, असा आरोप त्यांनी केला आणि या रोगाचे नाव ‘फिरंगा’ असे ठेवले. प्रत्येक बंदरात वेश्यावस्तीला भेट देणाऱ्या खलाशांमुळे हा रोग फैलावला. या ‘फिरंग्या’चा सर्वाधिक प्रभाव मुरगावमध्ये होता.

इन्फ्ल्युएंझाच्या साथीने शोरांव बेटावरील हजाराहून अधिक रहिवाशांचा मृत्यू झाला. विशेषत: 1766 ते 1775 या कालावधीत केरे गावातील हजारो ग्रामस्थांनी स्थलांतर केले. मध्ये काही काळ बरा गेला. त्यानंतर 1878 साली बेटावर पुन्हा या तापाने थैमान घातले. अनेक श्रीमंत कुटुंबांनी बेट सोडले. यामुळे 1859 साली 98 वर्षांचा इतिहास असलेले रिअल कोलेजिओ डी एज्युकाकाओ डी शोराओ बंद झाले. एफ.एक्स. गोम्स कॅटाओ, ’द आयलंड ऑफ शोराओ (हिस्टॉरिकल स्केच)’ या अभ्यासपूर्ण पुस्तकात लिहितात की, अनेकांना ही भूमी सोडवत नव्हती. त्यांच्या पूर्वजांची जमीन शोराओ येथील अवर लेडी ऑफ ग्रेस चर्चच्या आखत्यारीत राहिली. या महामारीमुळे हे बेट जवळपास 100 वर्षे निर्मनुष्य होते.

Diseases in Goa
Mahadayi Water Dispute : ...म्हणून म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं कारण

1918 साली जेव्हा ‘स्पॅनिश फ्लू’च्या साथीने जगभर थैमान घातले होते, तेव्हा गोव्यालाही त्याचा फटका बसला. गोव्यातील अनेक गावे निर्मनुष्य झाली. स्मशानभूमी आधीच भरलेली असल्याने डोंगराच्या माथ्यावर मृतदेह टाकले जात होते. मुंबईत राहणाऱ्या गोमंतकीयांनी त्या जागी एक क्रॉस उभारला होता. साल्वादोर द मुंद येथील ही जागा आजही ‘बाँबेकारांचो खुरीस’म्हणून ओळखली जाते. क्रॉसच्या समोरील चॅपलजवळच्या विहिरीत सांगाड्याचे अवशेष ठेवण्यात आले होते. चर्चजवळील दफनभूमीत सामूहिक दफन केलेल्यांची थडगी 2001 साली खोदण्यात आली.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे साथमारीमध्ये सर्वांत कमी बळी शोरावमधील लोकांचे गेले होते. राचोल गावात प्लेग सुरू झाला, त्यावेळी तेथील पांथिक विद्यालयात पोर्तुगाल, स्पेन आणि फ्रान्स या युरोपियन देशांतील अनेक परदेशी विद्यार्थी आणि प्राध्यापक राहत होते. त्यावेळेस स्पेनमध्ये साथरोगाने जोर धरला होता. स्पेनमधील एका विद्यार्थ्यामुळे येथील सर्वांना या साथमारीने ग्रासले. अनेकांचे बळी गेले. अनेकांनी राशोल सोडले. राय हा त्यावेळेस राशोलचा भाग होता, तोही राशोलसह निर्मनुष्य झाला. तेथे नवीन रहिवासी येऊन पुन्हा स्थायिक होण्यासाठी अनेक वर्षे लागली. ओसाड पडलेले पांथिक विद्यालयही हळूहळू पुन्हा गजबजू लागले.

मृतदेह बेडशीटमध्ये पूर्णपणे गुंडाळले जात आणि रात्रीच्या पूर्ण अंधारात मृतदेह मुख्य दरवाजाबाहेर ठेवला जात असे. रॉकेलचा दिवा किंवा मेणबत्ती पेटवून मृतदेहाजवळ ठेवली जायची, जेणेकरून दुरूनच तो दिसावा. हे यासाठी केले जायचे की, कुणा न घाबरणाऱ्या व्यक्तीने किंवा दोन बाटल्या फेणी व काही पैशांच्या लोभापायी एखाद्या व्यक्तीने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावावी. काही लोक मृतदेह गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी येत असत. मृतदेहाची विल्हेवाट फक्त रात्रीच लावण्यात येत असे आणि ते विल्हेवाट कुठे लावतात हे कोणालाही माहीत नसे.

या साथमारीत इतके लोक दगावले की, दफनासाठी दफनभूमीही कमी पडू लागली. तेव्हा दफनभूमीबाहेर एक मोठा खड्डा खणून त्यात स्पॅनिश फ्लूने मरण पावलेल्यांचे मृतदेह सामूहिकरीत्या दफन केले गेले. आजही राय येथील दफनभूमीच्या बाहेर एक स्मारक आहे, ज्यावर ‘1918 साली ग्रीप(स्पॅनिश फ्लू) या साथरोगात मृत पावलेल्यांच्या स्मृत्यर्थ’ असे पोर्तुगीजमध्ये लिहिले आहे.

अगदी अलीकडच्या काळात, कोविडमुळे या स्मारकाचा जीर्णोद्धार करण्यात आला. लोकांनी त्या स्मारकासमोर प्रार्थना करण्यास सुरुवात केली, जेणेकरून पूर्वीच्या काळात ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते त्यांच्या मध्यस्थीने गोव्याला या महामारीपासून वाचवले जाऊ शकतील. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार 300 हून अधिक लोकांचे मृतदेह एका सामूहिक कबरीत दफन केले गेले आहेत.

डॉ. फातिमा डी सिल्वा ग्रेशियास यांनी त्यांच्या पोर्तुगीजकालीन गोव्यातील आरोग्य आणि स्वच्छता या विषयावरील पुस्तकात लिहिले आहे की, 1917 साली बार्देश तालुक्यात इन्फ्ल्युएंझाचा पहिला रुग्ण आढळला होता. शिवोलीमध्ये दररोज 8 ते 10 लोकांचा मृत्यू होत होता. सरकारचे विशेष लक्ष साथमारीकडे गेले नाही कारण सुरुवातीच्या काळात मृत होण्याचे प्रमाण कमी होते. 1988 साली गोव्यात कॉलराची साथ आली होती. जुने गोवे, शोेराओ, साल्वादोर द मुंद, भाटी, राय आणि शिवोली या जुन्या काबिजादीतील विविध भागांतील गावे इतिहासात वेगवेगळ्या वेळी महामारीने ग्रस्त झाली होती.

मार्च 2020 मध्ये कोविडने गोव्याला हादरा दिला आणि त्याच्या दुसऱ्या लाटेने सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये गोव्याचे आदरातिथ्य अनुभवले. गेल्या तीन वर्षांत गोव्यातील जवळजवळ प्रत्येक कुटुंबाला कोविडने ग्रासले आहे. अनेकांनी आपले जवळचे आप्त गमावले आहेत. तरुण मुला-मुलींचे अकाली मृत्यू झाले आहेत. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट जास्त जीवघेणी होती. गोव्याने दररोज कुणी ना कुणी कोविडमुळे गमावले आहे. आताशा कोविड तेवढा जीवघेणा उरला नाही. त्यामुळे, समाजजीवन पुन्हा पूर्ववत झाले आहे.

कोविड -19, ओमिक्रॉन बीएफ.7 आणि एक्स-बीबी विषाणूचे दुसरे उपप्रकार चीनमध्ये डोके वर काढत आहेत. साथमारी, महामारीचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आम्हांला फारसा त्रास होणार नाही. मागील काही शतकांच्या तुलनेत, या शतकात पुष्कळ जीवहानी झाली आहे. आपण फक्त आशा करू शकतो की नवीन वर्ष 2023, एकविसावे शतक संपण्यास उरलेल्या 77 वर्षांपैकी पहिले वर्ष, सर्व मानवजातीसाठी. निरामय आरोग्य घेऊन आले आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com