

आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्यूशनरी गोवन्स (आरजीपी) या तीन पक्षांची युती होईल, अशी शक्यता निर्माण झालेली असतानाच आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब यांनी पोगो विधेयकाला पाठिंबा देतील, त्यांच्याशीच युती करू, असे मंगळवारी जाहीर केले. आमदार विजय सरदेसाईंनी गेल्या काही महिन्यांत पोगो विधेयकाला पाठिंबा दिल्याने युतीबाबत गोवा फॉरवर्डचा विषय नसेल. पण, काँग्रेस आरजीपीला याबाबत साथ देणार का? काँग्रेसने पोगोला पाठिंबा देण्याचे अमान्य केल्यास काँग्रेससोबत युतीत असलेला गोवा फॉरवर्ड भूमिका बदलणार का? असे प्रश्न या पक्षांच्या कार्यकर्त्यांसमोर उभे राहिले आहेत. ∙∙∙
आपण स्वप्ने पाहतो मात्र सगळीच स्वप्ने अस्तित्वात येतात असे नव्हे. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी गेल्या चार वर्षात कोणती विकास कामे पूर्ण केली, याचा हिशोब युतीचे विरोधक विचारायला लागले आहेत. ज्या गतीने विकास कामे युरीच्या वडिलांनी आपल्या कार्यकाळात पूर्ण केली, ते गेल्या चार वर्षांत यूरीला जमले नाही, हे सत्य युरी समर्थकही नाकारू शकत नाहीत. मात्र क्रिकेट खेळात ज्या प्रमाणे स्लॉग ओव्हरात बल्लेबाज धावांचा पाऊस टाकतो तशाच प्रकारे युरी आता विकासकामांचा कुंकळ्ळीत विकासकामांचा पाऊस टाकायला लागले आहेत. युरी यांच्या प्रयत्नाने कुंकळ्ळीत वीस कोटी खर्चून भव्य नगर आरोग्य केंद्र उभे राहणार आहे. कुंकळ्ळीत करोडो रुपये खर्चून फूटसॉल मैदान उभे राहत आहे. फूड कोर्ट प्रकल्प उभा राहणार आहे. त्या शिवाय सौंदर्यीकरण, चिफफ्टन स्मारक, स्वतंत्र सैनिक उद्यान व इतर प्रकल्प अस्तित्वात येणार आहेत. जे प्रकल्प वडिलांनी उभारले त्याची दुरुस्ती ही युरी येणाऱ्या वर्षभरात हाती घेणार असल्याचे कळते. आता जनता म्हणायला लागली आहे, ‘देर आए दुरुस्त आए.’∙∙∙
फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांचे ज्येष्ठ सुपुत्र रितेश नाईक यांनी अखेर भाजपने उमेदवारी दिल्यास फोंड्यात पोटनिवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. याआधी त्यांचे बंधू रॉय नाईक यांनीही असेच वक्तव्य केले होते. या दोघाही बंधूंनी उमेदवारीवर थेट दावा केलेला नाही. पक्ष जो निर्णय घेईल, तो आपल्याला मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना रितेश नाईक यांनी रॉय आणि आपण सोबत असल्याचेही म्हटले आहे. आता दोन भाऊ एकत्र आल्याने रवींच्या सहानुभूतीचा विचार करायचा की ‘केडर’ला प्राधान्य द्यायचे, अशा पेचात प्रदेश भाजपचे वरिष्ठ नेते सापडल्याची चर्चा भाजपात सुरू झाली आहे. ∙∙∙
सोमवारी मध्यरात्री बांबोळी येथे टँकर आणि रेंट अ कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील वाढत्या रस्ते अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. याबाबत पत्रकारांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मंत्री दिगंबर कामत यांना विचारले असता, ‘अपघात होणे हे जो कुणी वाहन चालवतो त्याच्यावर अवलंबून असते’, असे उत्तर दिले. याआधी झालेल्या अनेक अपघातांना रस्ते जबाबदार ठरल्याचे समोर आलेले असतानाही वाहन चालकांवर खापर फोडून आता कामतही ‘हात वर’ करीत आहेत की काय? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. ∙∙∙
सेरेंडिपीटी महोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. जगभरातील प्रख्यात कलाकारांचा सहभाग असलेला हा महोत्सव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रसिकांसाठी पर्वणी ठरतो. सध्या पणजी या महोत्सवानिमित्त प्रख्यात ब्रिटिश-इस्त्रायली स्ट्रीट आर्टिस्ट सॉलोमन सूझा हे पणजीतील इमारतींच्या भिंतीवर वेगवेगळी चित्रे रेखाटत आहेत. आजही त्यांनी पणजीतील एका भिंतीवर त्यांनी संगीतवाद्य वाजवणाऱ्या कलाकाराचे चित्र रेखाटले आहे. शहरातील रस्त्याच्या बाजूच्या उंच इमारतींवर यापूर्वीही अशीच चित्रे रेखाटली गेली होती आणि आजही ती त्या-त्या वर्षीच्या महोत्सवाची आठवण करून देतात. सध्या सॉलोमन सूझा हा गोव्यात असून, त्याची ही कलाकूसर त्याच्या चित्रातून स्पष्टपणे झळकत आहे. खरेतर गोव्यातील किती चित्रकारांना सूझा गोव्यात आला आहे, हे माहीत असेलही किंवा नसेलही. पण त्याची कलाकूसर सध्या सुरू झाली आहे आणि ती पाहणेही एक पर्वणीच आहे. ∙∙∙
उगवे येथे झालेल्या गोळीबारामागे खंडणीचा प्रकार असावा अशी दबक्या आवाजातील का होईना चर्चा कानावर पडू लागली आहे. यापूर्वीही असे प्रकार घडत होते. बंदुकीचा धाक दाखवला जात होता असे बोलले जात आहे. असे असेल तर मग ही खंडणीची रक्कम कुठे जात होती असा प्रश्न समोर येत आहे. बेकायदा रेती व्यवसायातून निर्माण होणारी माया मोठी आहे. त्यातून अनेकांना यापूर्वी खरेदी करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे आवाज बंद करण्यात यश आले होते. दडपशाहीतून पैसे उकळणे रात्रीच्या अंधारात चालत होते, देणाराही गप्प राहत होता त्यामुळे अशा गोष्टी बाहेर येत नव्हत्या. आता चुकून दोन छर्रै लागले आणि साऱ्याचा भांडाफोड झाला असे बोलले जाते. खरे खोटे उगवेवासियांनाच माहीत. ∙∙∙
‘मागतल्याक मागतलो सोसंना’ अशी कोकणीत एक म्हण आहे. मंत्री रमेश तवडकर यांनी स्वतःच्या हिमतीवर राजकारणात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. शारीरिक शिक्षक ते मंत्री असा प्रवास करताना त्यांनी समर्थकांची मजबूत फळी निर्माण केली आहे. अनुसूचित जमातीचे एक मोठे नेते अशी ‘नामना’ त्यांनी मिळवली असली, तरी त्यांच्याच काणकोण मतदारसंघात त्यांच्याच एसटी समाजातील नेते त्यांची साथ सोडायला लागले आहेत. त्यांच्या गावातील काही आजीमाजी सरपंच व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाशी हात मिळवले आहेत. जिल्हा पंचायत निवडणूक जवळ आल्याने अनेकजण रमेश सरांची साथ सोडून काँग्रेस खासदारांच्या विश्वासाने काँग्रेसचा मफलर गळ्यात घालायला लागले आहेत. आता पाहूया रमेश तावडकर यांना सोडून गेलेले ते माजी सरपंच तावडकराचा विजय रथ थोपवितात की त्यांची बडखोरी पेल्यातील वादळ ठरते. ∙∙∙
पक्षांतर्गत बाबी प्रसार माध्यमांपर्यंत पोचू नयेत, यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विशेष रणनिती अवलंबली आहे. बैठकांच्या बातम्या कोण फोडतो, ते हेरून त्यांनी ही उपाययोजना केली आहे. याचमुळे महामंडळावर आमदारांच्या नियुक्त्या या झाल्यानंतरच प्रसार माध्यमांना समजल्या. पूर्वी निदान गाभा समितीचे सदस्य काही माहिती बैठकीनंतर देत असत. आता त्यांनी अध्यक्ष काय ते सांगतील असे पालुपद सुरू केले आहे. याला पक्षशिस्त म्हणावी की भीती याचे उत्तर सध्या चर्चेत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.