काही दिवसांपूर्वी कळंगुटमध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन 50 हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच नव्या दोन आगीच्या घटना समोर आल्या आहेत. आज पहाटे हडफडे येथील इंदुमती दिवकर यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. तसेच वेरे येथे तेलंगणातील पर्यटकाची चारचाकी आगीत जळून खाक झाली आहे.
साकववाडी-हडफडेतील हनुमान मंदिराशेजारी इंदुमती दिवकर यांच्या घरी आज पहाटे इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉर्ट सर्किट झाले. यामुळे पूर्ण घराला आग लागली. ही घटना सकाळी 5.20 वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
माहितीनुसार या आगीत एकूण 4 लाखांचे नुकसान झाले असून, 8 लाखांची मालमत्ता वाचवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.
तेलंगणा येथील पर्यटक आर.विनायक रेड्डी यांनी आपली चारचाकी (MG GLOSTER BLACK STORM) वेरे येथे रेईश मागूस किल्ल्याशेजारी पार्क केली होती. त्यांच्या कारने अचानक पेट घेतला आणि पूर्ण कार आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही. मात्र आगीची माहिती मिळताच पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीत 25 लाखांहून अधिक नुकसान झाले आहे.
"एमजी ग्लॉस्टरचा समावेश असलेल्या गोव्यातील नुकत्याच झालेल्या थर्मल घटनेची वस्तुस्थिती तपासण्यासाठी सविस्तर तपास केला जाईल. ग्राहक पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आम्ही सर्व पाठिंबा देण्यासह आमची टीम ग्राहकासोबत शहानिशा करत आहे."
"एमजीआयमध्ये आम्ही वाहन सुरक्षितता व दर्जात्मक मानकांना प्राधान्य देतो. सर्व पैलूंमध्ये दर्जा राखत एमजी ग्लॉस्टर डिझाइन करण्यात आली आहे आणि या वेईकलने दर्जात्मक वेईकल म्हणून स्वत:ची क्षमता सिद्ध केली आहे" - एमजी मोटर इंडिया.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.