

पणजी: अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (गोमेकॉ) परिसरात आणि बाहेरील अन्न व्यवसायांवर व्यापक तपासणी मोहीम राबविली.
या कारवाईत अस्वच्छता आणि वैध ‘एफएसएसएआय’ नोंदणी दाखला किंवा परवाना नसल्याचे आढळून आल्याने ९ अन्न व्यवसायांचे काम तात्पुरते बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच ‘अनमोल स्वीट्स’मधून १९ हजार ६०० रुपये किमतीचा ७० किलो मुदतबाह्य मावा जप्त करून नष्ट करण्यात आला.
या विशेष मोहिमेत गोमेकॉ परिसरातील आणि बाहेरील एकूण ३९ अन्न व्यवसाय व स्वयंपाकघरांची तपासणी करण्यात आली. यात अन्न विक्रेते, किरकोळ विक्रेते, उपाहारगृहे, कँटीन आणि ज्यूस सेंटरचा समावेश होता.
एफडीए संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात नियुक्त अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी योगिता शिरसाट, अमित मांद्रेकर, डार्लीन ड्युकार, लेनिन डिसा, साफिया खान तसेच कर्मचारी संदीप शेळके आणि साईनाथ चारी यांचा समावेश होता.
गंभीर त्रुटी आणि अस्वच्छता
तपासणीदरम्यान गंभीर त्रुटी, अस्वच्छता तसेच आवश्यक परवान्यांचा अभाव आढळलेल्या ९ युनिटना त्रुटींची दुरुस्ती करून नियमांची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.