

गोव्यात सध्या अशा तरुणांची संख्या वाढतेय जे केवळ विकेंड पार्ट्या, नाईटलाईफ आणि पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तिथे नोकरी पत्करत आहेत. मात्र, ही नोकरी कायदेशीर नसून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर फसवणूक करणाऱ्या 'फेक कॉल सेंटर्स'मधील आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, हरियाणा, नागालँड आणि मणिपूर या राज्यांतील तरुणांना या रॅकेटमध्ये ओढले जात आहे. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे.
हे बनावट कॉल सेंटर्स प्रामुख्याने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करतात. बनावट कर्ज मंजुरी, मेडिकल बिलिंग ॲडव्हान्स आणि इतर अनेक प्रलोभने दाखवून या परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जाते. तांत्रिक कौशल्याचा वापर करून हे तरुण विदेशी लोकांना जाळ्यात ओढतात. गेल्या वर्षभरात गोवा पोलिसांनी अशा २० हून अधिक सेंटर्सवर छापे टाकले असून ५० हून अधिक तरुणांना बेड्या ठोकल्या आहेत.
तपासादरम्यान असे दिसून आले आहे की, या बेकायदेशीर कॉल सेंटर्सचे बहुतांश चालक हे गुजरात राज्यातील आहेत. त्यांनी गोव्याच्या पर्यटन संस्कृतीचा फायदा घेऊन तरुणांना नोकरीचे आमिष दाखवले आणि या काळ्या धंद्यात उतरवले.
सध्या या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांचे जाळे कोठवर पसरले आहे, याचा सखोल तपास गोवा पोलीस करत आहेत. गोव्यातील शांतता आणि पर्यटन प्रतिमेला तडा देणाऱ्या या प्रवृत्तींविरुद्ध आता कठोर पावले उचलली जात आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.