पणजी: ताळगावातील बाबुश मोन्सेरात यांचे खंदे समर्थक व माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज (Tony Rodriguez) यांनी आज काँग्रेसमध्ये (Congress) माजी नगरसेवक तसेच ताळगाव पंच सदस्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत ताळगावातून अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मोन्सेरात (Monsera) यांचा शह देण्यासाठी ताळगाववासिय टोनी रॉड्रिग्ज यांना पाठिंबा देण्यास एकवटले आहेत. सतत चारवेळा ताळगाव मतदारसंघावर पकड असलेल्या बाबुश मोन्सेरात यांना त्यांचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर जात असल्याने चिंता करण्याची पाळी आली आहे.
ताळगावात बाबुश मोन्सेरात हे मतदारांना गृहित धरून स्वतःच निर्णय घेत आहेत. कार्यकर्त्यांचा आदर व सन्मानास ते विसरले आहेत. त्यांच्याकडून कार्यकर्त्यांची होणारी मानहानी ही आता सोसण्याच्या पलिकडे गेली आहे. त्यांच्या फॅमिलीराजला मतदार कंटाळलेले असून लोकांच्या आग्रहाखातीर मी पुढे सरलो व आगामी निवडणुकीत ताळगावात बदल घडविण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया मोन्सेरात यांचे खंदे समर्थक व माजी महापौर टोनी रॉड्रिग्ज यांनी व्यक्त केली.
मला व उदय मडकईकर (Uday Madakaikar) यांना काँग्रेसमध्ये पाठवले आहे असा चुकीचा संदेश मोन्सेरात यांच्या कार्यकर्त्यांकडून ताळगावात पसरविला जात आहे. मी देवाला माननारा आहे. मी आयुष्यात कधी कोणाला फसविले नाही. मोन्सेरात यांच्याप्रमाणे मला लोकांचा विश्वासघात करायचा नाही. त्यांनी कित्येक पक्षामध्ये उड्या मारल्या तसे मी करणार नाही. काँग्रेसमधून मी राजकारणात आलो. त्यानंतर मोन्सेरात यांच्याबरोबर राहिलो. ते जेथे जातील त्यांच्यासोबत गेलो मात्र आता असह्य झाले आहे. पुन्हा काँग्रेसमध्ये परतलो आहे व यापुढे मी काँग्रसमधून बाहेर पडणार नाही असे ते म्हणाले.
काँग्रेसने मला ताळगावातून निवडणूक लढविण्याची संधी दिली तर ताळगाववासियांनी मला एकदा निवडून द्यावे. ताळगाववासियांना जे हवे तेच होईल. ताळगावातील शेती पाण्याखाली गेली आहे ती पुन्हा लोकांना ती करण्यासाठी मिळेल याकडे पहिले प्राधान्य असेल. कोणतेही काम ताळगाववासियांना विश्वासात घेऊनच केले जाईल. ताळगावात लोकांना बदल हवा आहे. भाजप सरकारने लोकांना जे नको तसेच गोव्यासाठी फायदेशीर नाहीत ते प्रकल्प ते प्रकल्प लादले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी युतीसाठी ‘अल्टिमेटम’ देण्यापूर्वी त्यांचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे का त्याची चाचपणी करावी. काँग्रेसमधून फुटलेल्या १० बंडखोरांना राष्ट्रवादी काँग्रेसने दारे खुली केल्यास काँग्रेस युतीचा विचार करणार नाही. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक पी. चिदंबरम (P. Chidambaram) व गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव व त्यांची टीम गोव्यात तीन दिवसांच्या भेटीवर येत आहे. युतीचा प्रश्न ते हाताळतील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
राज्यात भाजपविरोधी वातावरण तयार होऊ लागले आहे. या सरकारने लोकांना भिकेला लावले आहे. लोकांना आगामी सरकार हे भाजपचे नको आहे. काँग्रेसचे सरकार बरे होते अशी चर्चा लोकांमध्ये होत आहे. लोकाना सर्वसामान्य व गरीबांची मते जाणून घेणारे सरकार हवे आहे ते काँग्रेसच देऊ शकते. टोनी रॉड्रिग्ज यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेतल्याने आता ताळगावात काँग्रेसचे बळ वाढेल असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.