Goa Ex CM Luizinho Faleiro on MGP: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला (मगोप) गोवा हा प्रदेश महाराष्ट्रात विलिन करायचा होता. कारण मराठी भाषा हेच मगोप चे तत्वज्ञान होते, असे वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांनी केले आहे.
फालेरो यांनी 'द बॅटल फॉर कोंकणी अँड स्टेटहुड ऑफ गोवा' हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते.
फालेरो म्हणाले की, गोव्यात जेव्हा विलिनीकरण की स्वतंत्र राज्य याबाबत 1967 मध्ये ओपिनियन पोल झाला, त्यात नागरीकांनी गोवा स्वतंत्र राज्य व्हावे, याबाजुने कौल दिला गेला.
तथापि, त्यानंतरही महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मराठीला तत्कालीन केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याची अधिकृत राज्यभाषा बनवण्यासाठी विधानसभेत अनेक विधेयके आणि ठराव मांडले, असेही फालेरो म्हणाले.
ते म्हणाले, 1980 पूर्वी सलग चार वेळा मगोप निवडून आली होती. मराठी ही गोव्याची मातृभाषा आहे हेच मगोप चे तत्वज्ञान होते. त्यामुळे गोवा हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि तो महाराष्ट्रात विलिन केला पाहिजे, असे मगोपला वाटत होते.
मगोपचे सरकार हे सर्वात लोकप्रिय सरकार होते. कारण लोकांनीच त्यांना निवडून दिले होते. त्यांची एक निश्चित विचारधारा होती. मगोप लोकप्रिय पक्ष होता. पण त्यांचा हेतू हरवला. मग ज्या बहुसंख्य लोकांनी मगोपला निवडून दिले आहे, त्यांच्याविरोधात मी का जाऊ? असे मला वाटले.
पण, मला माझ्या मनाचे ऐकले आणि हे पुस्तक लिहिले. यात 18 प्रकरणे आणि कालक्रमानुसार 18 घटनांचा तारखांसह समावेश आहे. ज्यामध्ये कोंकणीला राजभाषा म्हणून लढाईचा इतिहास आहे. तसेच राज्याचा दर्जा मिळविण्याबाबतचा लढाही आहे.
ते पुढे म्हणाले, “मी हे पुस्तक लिहिण्याचे आणखी एक कारण म्हणजे हजारो गोवावासीयांनी कोकणी आंदोलनात भाग घेतला. त्यांनी पोलिसांचे अत्याचार, लाठीमार, तुरुंगवास, गोळ्या झेलल्या आणि काहींनी प्राणांची आहुतीही दिली.
म्हणून मी हे पुस्तक त्या चळवळीत सहभागी झालेल्यांना आणि ज्यांनी गोवावासीयांसाठी त्रास सहन केला त्यांना समर्पित करतो.
“जानेवारी 1980 मधील सकाळी मी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी भेटलो होतो. राज्याचा दर्जा हीच गोव्यातील लोकांची मागणी असल्याचे मी त्यांना सांगितले. तुमचा काँग्रेस आय पक्ष आणि आमचा काँग्रेस यू पक्ष यांनी जनतेला हे आश्वासन दिले होते.
या लोकांनीच आम्हाला निवडून दिले आहे. तसेच तुमच्या वडिलांनी (जवाहरलाल नेहरू) यांनीही आम्हाला हे आश्वासन दिले होते. त्यावर इंदिरा गांधींनी, तुम्ही आधी तुमची भाषा निश्चित्त करा, आम्ही तुम्हाला राज्याचा दर्जा देऊ," असे सांगितले.
त्यानंतर मी दिल्लीतून परतल्यावर पक्षात आणि गोवा विधानसभेत एक ठराव मांडला होता, तो ऐतिहासिक होता, असेही फालेरो म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.