Digambar Kamat: दिगंबर कामत यांचे फुटबॉलप्रेम 'खरी कुजबुज'

एकेकाळी त्यांना मडगावात उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जायचे.
Digambar Kamat |Goa News
Digambar Kamat |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

चर्चिल आलेमाव हे आपण नीज फुटबॉल मोगी असे अगदी छाती पुढे काढून सांगतात. मात्र, दोहा कतार येथे जी फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आहे, त्यातील पोर्तुगाल आणि उरुग्वेमधील सामना पाहण्यासाठी कोण जात असतील, तर ते मडगाव येथील आमदार दिगंबर कामत होय.

त्यांनी आपला न्यायालयाकडे जमा केलेला पासपोर्ट सोडविण्यासाठी जो अर्ज केला त्यावरून ही बाब उघड झाली आहे. तसे कामत हे राजकारणी असले, तरी मुळात क्रीडाप्रेमी आहेत. एकेकाळी त्यांना मडगावात उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ओळखले जायचे.

ते पट्टीचे पोहणारेही आहेत. शाळेत असताना ते फुटबॉलही खेळायचे. एक उत्कृष्ट गोल किपर म्हणून त्यावेळी त्यांची ओळख होती हे अवघ्याच लोकांना आता माहीत असेल.

गोवा डेअरीत सावळागोंधळ

गोवा डेअरीतील सावळागोंधळ काही संपता संपत नाही. आता तर बारा दिवस गोवा डेअरीचा पशुखाद्य प्रकल्प बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली. त्यामुळे दूध उत्पादकांना गुरांना देण्यासाठी पशुखाद्यासाठी वणवण करावी लागली, ही बात वेगळी, पण पन्नास वर्षे पूर्ण झालेल्या एखाद्या सरकारी आश्रय लाभलेल्या प्रकल्पाला आता घरघर लागली आहे की काय, अशी आशंका व्यक्त व्हायला लागली आहे.

मुळात गोवा डेअरी प्रकल्पातील उत्पादन वाढीसाठी किंवा दूध उत्पादन वाढीसाठी भगिरथ प्रयत्न झालेले कुणी पाहिलेच नाहीत. संचालक मंडळावर अनेकजण आले आणि गेले... त्यामुळे गोवा डेअरीचे हित जपण्यात कुणालाही स्वारस्य नव्हते हे सिद्ध झाले.

सरकारी आर्थिक मदत मिळाली म्हणजे एखाद्या प्रकल्पाचा पांढरा हत्ती कसा होतो, ते आपण राज्यातील एकमेव संजीवनी साखर कारखान्याच्याबाबतीत पाहिले आहे. आता या पंक्तीत गोवा डेअरी नाही बसवली म्हणजे मिळवली.

गोव्याला कोण वाचविणार?

‘उद्धवा अजब तुझे सरकार...’ हे जुने मराठी गाणे आपल्या गोव्याला आजही चपखल बसते. आपण आज आयआयटी कुठे हवी यावर भांडत बसलो आहोत. मोपा व दाबोळी दोन्ही विमानतळ ठेवावे की नको यावर आपली चर्चा चालते.

आपले सरकार पक्ष पर्यटन व खाण उद्योगातून विकासाची दारे उघडण्यात व्यस्त आहे, तर विरोधी पक्ष लुटुपटूच्या लढाईत मस्त आहे. मात्र, गोव्याची युवा पिढी ड्रग्जच्या विळख्यात जखडत चालली आहे.

पर्यटनाच्या नावावर व्याभिचार, वेश्या व्यवसाय, जुगार, कॅसिनोसारखे गैर व्यवहार खुले आम चालत आहेत. आम जनता मात्र जे चालते ते उघड्या डोळ्यांनी बघते आणि मायबाप पोलिस वाहनचालकांना दंड देण्यात व्यस्त आहेत. याला म्हणतात का ‘गो गोवा गो’?

Digambar Kamat |Goa News
Goa Framers Demand IIT Project: आमची जमीन सोडून सांगेत कुठेही ‘आयआयटी’ उभारा; शेतकऱ्याची मागणी!

दुधाचे दर वाढतेच

राज्यात आणि देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. त्यात आता दुधाची भर पडली आहे. गोव्यात महाराष्ट्रातून येणाऱ्या अन्य दुधाचे दरही वाढले असून आता गोवा डेअरीच्या दुधाचेही दर वाढणार आहेत.

आधीच महागाईने पिचलेल्या लोकांना सरकारकडून तर कोणताच दिलासा नाही, त्यातच आता दुधाची दराची भर पडल्याने गरिबांचे टॉनिक म्हणून ओळखले जाणारे गोवा डेअरीचे दूध महागड्या दराने खरेदी करावे लागणार आहे.

आता एक मात्र खरे... दूध ही जीवनावश्‍यक वस्तू असल्याने दर वाढले तरी ते खरेदी करावे लागणारच, फक्त वापर तेवढा मर्यादित स्वरूपात होईल हे नक्की.

‘सिंघम’ आमने - सामने

राजधानी पणजीमध्ये इफ्फी महोत्सव दिमाखात सुरू आहे. हॉलिवूड व बॉलिवूडच्या विविध क्षेत्रांतील दिग्गज दिग्दर्शक तसेच अभिनेते व अभिनेत्री गोव्यात आले आहेत. देशातील सिने चित्रसृष्टीतील आघाडीचा अभिनेता व सिंघम चित्रपटातील अभिनेता अजय देवगण हासुद्धा कालपासून गोव्यात आहे.

त्याला पाहण्यासाठी सिनेप्रेमिकांची गर्दी होत असतानाच पोलिसही त्यात मागे नाहीत. चित्रपटातील अभिनेत्यांप्रमाणे विविध पोझसाठी प्रसिद्ध असलेला पोलिस खात्यात सिंघम म्हणून ओळखला जाणारा अधिकारी जिवबा दळवी याने आज अखेर अजय देवगण यांच्याशी हातमिळवणी करून त्यांच्यासोबत फोटो घेतला.

या फोटोत चित्रपटातील सिंघम अजय देवगण व पोलिस खात्यातील जिवबा दळवी हे आमने - सामने आले. त्यांचा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जिवबा दळवी हे स्वतःचा फोटो पोझमध्ये देताना दिसत आहेत.

या फोटोची चर्चा आज दिवसभर सुरू होती. दोघेही सिंघम हे वेगवेगळ्या क्षेत्रात वावरणारे असले, तरी त्यांची एंट्री ही लाजवाब आहे. अजय देवगण हे प्रसिद्धीपासून लांब राहणारे, तर जिवबा दळवी हे प्रसिद्धीसाठी नेहमी पुढे असतात ते या फोटोवरून अधिक स्पष्ट झाले आहे.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना रोजगार कधी?

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना रोजगाराचा मुद्दा पुन्हा पुढे आला असून आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी त्यासाठी निर्वाणीची मुदतही दिली आहे. गोवा मुक्तीला साठ वर्षे उलटल्यानंतरही स्वातंत्र्यसैनिकांची मुले रोजगाराविना राहावीत हा खरे तर वादाचा मुद्दा आहे.

कारण गोवा मुक्ती लढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक त्यावेळचे त्यांचे वय पाहिले तर वस्तुस्थिती काय ते उघड होण्याची गरज आहे. गोव्यात काहींनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळालेले पेन्शनही यापूर्वी नाकारलेले असताना त्यांच्याच वारसांना नोकरीसाठी रस्त्यावर यावे लागते हे विसंगत तर वाटतेच, पण ही गोष्ट खरी असल्यास मन सुन्नही होते.

अधीक्षकांची संगीत खुर्ची

पोलिस खात्यामध्ये अधीक्षक व उपअधीक्षकांना बढती दिल्यापासून त्यांना बसण्यासाठी असलेल्या केबिन्स कमी पडत आहेत. काही अधिकाऱ्यांकडे दोन ते तीन पदांचा ताबा आहे. त्यांच्याकडे एकापेक्षा अधिक केबिन्स आहेत.

ज्यांना बसण्याची व्यवस्था नाही त्या अधीक्षकांना मात्र आपल्या सहकाराच्या केबिनमध्ये बसून दिवस काढण्याची पाळी येत आहे. हे अधिकारी त्यांना केबिन मिळेल या प्रतीक्षेत आहेत. पोलिस खात्याने या अधिकाऱ्यांना बढती देण्यापूर्वी बसण्याची व्यवस्था न करता बढती देऊन मोकळे झाले. या अधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचा आनंद आहेच.

मात्र, बसण्याची व्यवस्था नसल्याने नाखूष आहेत. वरिष्ठांनाही याची कल्पना आहे. मात्र, बसण्यासाठी पोलिस मुख्यालयात केबिन्स कमी आहेत. पूर्वी एक केबिन पोलिस उपमहानिरीक्षकांची होती, ती पोलिस महासंचालकांच्या स्टाफ ऑफिसर्ससाठी अडवून ठेवण्यात आली आहे.

सध्या असलेल्या अधीक्षकांपेक्षा निम्म्याहून कमी केबिन्स आहेत. त्यामुळे काहीजण आल्तिनो येथील पोलिस कार्यालयात बसतात. पोलिस महासंचालक, महानिरीक्षक हे अधीक्षक वा उपअधीक्षकांच्या पोलिस मुख्यालयात बैठका घेत असतात किंवा कोणत्याही विषयावर चर्चा करण्यास बोलावत असल्याने या अधीक्षकांची धावपळ होते. त्यामुळे पोलिस मुख्यालयात सहकाऱ्यांच्या कार्यालयात बसणे पसंत करत आहेत.

Digambar Kamat |Goa News
Vasco Illegal Hotel: धक्कादायक! वास्को येथील देव दामोदर ट्रस्टच्या जागेत परप्रांतीयने थाटले बेकायदेशीर हॉटेल

बापरे! पोलिसांनाच केले ब्लॅकमेल!

समाज माध्यमाचा दुरुपयोग करून व्हिडिओ व्हायरल करून इतरांना लुटणारे अनेक ठग आहेत. मात्र, समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांनाच ब्लॅकमेल करणारी एक टोळी म्हणे खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मतदारसंघात कार्यरत आहे.

दोन दिवसांपूर्वी या टोळीने वाहतूक व्यवस्था गस्तीवर असलेल्या दोघा पोलिसांना लुटण्याचा प्रयत्न केला. ट्रकचालकांकडून तुम्ही पैसे घेताना आम्ही व्हिडिओ केला आहे. दहा हजार द्या अन्यथा व्हिडिओ व्हायरल करणार असा दम देत दोघांनी गस्तीवरील पोलिसांनाच लुटण्याचा प्रयत्न केला.

एकाने तर म्हणे पोलिसाच्या खिशातच हात घातला, परंतु त्या हुशार पोलिसांनी रोबोट पोलिसांच्या मदतीने त्या लुटारूंना अटक केली व आपली सुटका करून घेतली. असाच प्रकार याच मतदारसंघात महिन्यापूर्वी घडला होता.

एकाने खोटा आरोप करून वाहतूक पोलिसांचा खोटा व्हिडिओ व्हायरल केला होता. आता सांगा पोलिसांनाच असे हे लोक लुटत असतील, तर सामान्यांचे काय?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com