Dharbandora Panchayat धारबांदोडा ग्रामपंचायतीच्या ४ हजार चौरस मीटर जागेवर सरकारने उपजिल्हाधिकारी कार्यालय उभारले आहे. मात्र ही जागा घेताना पंचायतीला देण्यात आलेली आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
त्यामुळे सरकारला जमीन दान करून पंचायतीला काय मिळाले? असा प्रश्न ग्रामस्थांनी ग्रामसभेत उपस्थित केला. आपल्या आश्वासनाबाबत सरकारला आठवण करून देण्याचा ठरावही यावेळी घेण्यात आला.
काही वर्षांपूर्वी बारावा तालुका म्हणून धारबांदोडा तालुक्याची स्थापना करण्यात आली. तालुक्यातील लोकांच्या सोयीसाठी सरकारने धारबांदोडा येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय उभारले.
यामुळे तालुक्यातील लोकांची सोय झाली असली तरी सरकारने पंचायतीला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता अजूनपर्यंत झालेली नाही.
जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरू असताना पंचायतीसाठी अन्य ठिकाणी जागा, स्थानिकांना रोजगार, इमारतीत पंचायतीसाठी कार्यालय देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
पण अजूनपर्यंत काहीच झाले नसल्याने ग्रामसभेत याबाबत प्रश्न चर्चेला आला तेव्हा स्थानिक आमदार, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व संबंधितांना ठरावाची प्रत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सरपंच बालाजी ऊर्फ विनायक गावस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेला माजी सरपंच स्वाती गावस तिळवे, पंचसदस्य गुरु गावकर, महेश नाईक, अन्य पंचसदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
तळसाय येथील अंगणवाडीच्या इमारतीतून पावसाचे पाणी झिरपते. त्यामुळे लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यावर सध्या ताडपत्री तरी घालून झिरपत असलेले पावसाचे पाणी बंद करावे, अशी मागणी पालकांनी ग्रामसभेत केली.
तेव्हा सरपंच बालाजी ऊर्फ विनायक गावस यांनी लवकरात लवकर ताडपत्री झाकून घेणार तसेच नवीन अंगणवाडी आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेटीमळ-धारबांदोडा येथे एका जुन्या शेडमध्ये दारूनिर्मितीचा कारखाना सुरू होणार आहे.
यावरही चर्चा झाली. हा कारखाना सुरू करण्यास विरोध नाही, परंतु ९५ टक्के स्थानिकांना कारखान्यात काम देण्यात यावे अशी अट घालावी असा ठरावही ग्रामसभेत घेण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.