पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांच्या बदलीचा आदेश शनिवारपर्यंत जारी होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मुख्यमंत्री कार्यालयाला तसे संकेत देण्यात आले आहेत. पोलिस महासंचालकांना राज्य सरकार सेवेतून मुक्त करू इच्छीते, असे राज्य सरकारने स्पष्टपणे कळविल्यानंतर दिल्लीत नव्या पोलिस महासंचालकांचा शोध सुरू झाला आहे.
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर मोडतोड प्रकरणात कळंगुटचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रशल देसाई नाईक यांना धमकावल्याप्रकरणी महासंचालक जसपाल सिंग यांच्यावर बदलीची टांगती तलवार असतानाच त्यांनी खासगी कामासाठी एक दिवसाचा धावता दिल्ली दौरा केला.
या दौऱ्यात ते दिल्लीत कोणाला भेटले, याची माहिती मात्र मिळू शकली नाही. कौटुंबिक कारणास्तव मी एक दिवसाची रजा घेऊन दिल्लीला गेलो होतो, असे त्यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले. त्यांची बदली व्हावी, असा अहवाल राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला आहे. त्यावर दिल्लीतून लगेच विचार होईल, असे वाटले होते.
निदान राज्य सरकार महासंचालकांचे अधिकार काढून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे देईल, अशी चर्चा होती. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच झालेले नाही. सिंग यांनी नियमित कामकाज पाहणे सुरूच ठेवले आहे.
नवे तीन कायदे लागू झाल्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्याविरोधात अहवाल दिलेल्या मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांनाच पाचारण करून कार्यक्रम केला. त्याशिवाय किनारी पोलिसांना नौका वितरणाच्या कार्यक्रमालाही महासंचालक उपस्थित राहिले होते.
अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि अंदमानच्या पोलिस महासंचालकांची बदली होणार आहे. त्यांना दिल्ली ऐवजी गोव्यात बदली देण्याचा विचार केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
सिंग यांनी मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली गाठली आणि बुधवारी सायंकाळी ते पुन्हा गोव्यात पोचले. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी दिल्लीला गेलो ही बाब खरी असली तरी तो कार्यालयीन दौरा नव्हता. खासगी कामानिमित्त एक दिवसासाठी मी जाऊन आलो.
‘कॉल रेकॉर्ड’कडे सिंग यांचे कान
आसगाव प्रकरणात एका व्यक्तीने दिलेली माहिती औत्सुक्यपूर्ण आहे. आसगाव वादात असलेल्या एका अधिकाऱ्याशी मी संपर्क साधून परिस्थिती समजून घेत होतो. त्याच संध्याकाळी मला खुद्द जसपाल सिंग यांचा फोन आला आणि तेही माझ्याकडून त्या अधिकाऱ्याची माहिती काढून घेत होते, असे सांगून ती व्यक्ती म्हणाली की, कॉल रेकॉर्डमुळेच जसपाल सिंग यांना मी त्या अधिकाऱ्याशी बोललो, हे समजले.
...तरीही महासंचालकांवर दडपण
पोलिस महासंचालक सिंग हे कार्यालयात येत असली तरी त्यांची देहबोली नेहमीप्रमाणे नाही. त्यांच्या चेहऱ्यावर दडपण असून प्रतिमेला बसलेल्या धक्क्यातून ते आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलिस मुख्यालय अधीक्षकांशी प्रशासन कामाबाबत चर्चा करत आहेत. पोलिस खात्यातील कामांबाबत तसेच आगामी विधानसभा अधिवेशनात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत सर्व ती तयारी करण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षकांना देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.