Goa Crime : व्यावसायिक वादातून मित्राला भोसकले; हडफडेत युवक गंभीर

एकास अटक; संशयितांची चौकशी सुरू
Youth Stabbed in arpora
Youth Stabbed in arporaDainik Gomantak
Published on
Updated on

शिवोली : नागवा-हडफडे येथे शनिवारी पहाटे दारूच्या नशेत तरुणांच्या टोळक्याने आपल्याच मित्रावर सपासप वार करून चाकूने भोसकले. रेंट-अ-कार व्यावसायातील वादातून झालेल्या या चाकूहल्ल्यामुळे रवी शिरोडकर हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.

नाईकवाडा-कळंगुट येथील रहिवासी तसेच रेंट-अ-कार व्यावसायिक रवी शिरोडकर याच्यावर शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास संशयित टारझन पार्सेकर आणि इतर युवकांनी चाकूहल्ला केला. या हल्ल्यात रवी गंभीर जखमी झाला.

Youth Stabbed in arpora
CM Pramod Sawant : आता पर्वरीतील वाहतूक कोंडी संपणार

त्याच्यावर गोमेकॉतील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाला रेंट-अ-कार व्यावसायातील वादाची किनार असल्याची माहिती हणजूण पोलिसांनी दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच हणजूणचे पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई, उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी रवीला उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले.

महिलेने धरले पोलिसांना धारेवर

या प्रकरणातील काही संशयितांना जबानीसाठी हणजूण पोलिस स्थानकात बोलावले असता कळंगुट कोमुनिदादशी संबंधित एका बड्या धेंडाच्या पत्नीने तेथे येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, पोलिस उपअधीक्षक जीवबा दळवी तसेच निरीक्षक प्रशाल देसाई यांनी त्या महिलेकडे दुर्लक्ष केले. पोलिस कुणाच्याही दबावाखाली न येता या प्रकरणाचा तपास करतील, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

मुख्य संशयिताला अटक

चाकूहल्लाप्रकरणी संशयित टारझन पार्सेकर (रा. साळगाव) याला हणजूण पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रशाल देसाई यांनी दिली. पोलिस अन्य संशयितांच्या शोधात आहेत. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांची लवकरच धरपकड होणार असल्याने रेंट-अ-कार व्यवसायाशी संबंधित कळंगुटमधील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हल्ला पूर्वनियोजित : उदय शिरोडकर

चाकूहल्ल्यात जखमी झालेला रवी शिरोडकर हा बागा येथील श्री बाबरेश्वर देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष उदय शिरोडकर यांचा चुलत भाऊ आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असून पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी करून त्यांना गजाआड करण्याची मागणी शिरोडकर यांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com