
sumanta fernandes suicide case: घरगुती जाचाला कंटाळून २९ ऑगस्ट २०२३ रोजी स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमांता फर्नांडिस यांच्या मृतदेहावर अखेर तब्बल दोन वर्षांनंतर शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. सुमांताच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार तिच्या आईला देण्यात यावेत, यासाठी केलेला अर्ज दक्षिण गोवा उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे यांनी ९ ऑक्टोबर रोजी संमत केला आहे.
यासंबंधीच्या आदेशानुसार, सुमांताचे पती नोएल ब्रागांझा यांनी अंत्यसंस्कारांना कोणताही आक्षेप न घेतल्यामुळे मृतदेहाचा ताबा तिची आई आना मारिया डायस यांच्याकडे देण्यात आला आहे. शनिवार, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ३.३० वाजता सां जुझे द आरियल येथील सेंट जोसेफ चर्चमध्ये अंत्यसंस्काराचे विधी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत दुःखद आहे. सुमांता फर्नांडिसने पतीच्या घरी स्वतःला आग लावून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचे निधन झाले.
या घटनेनंतर, सुमांताच्या आईने म्हणजेच आना मारिया डायस यांनी मुलीच्या सासूच्या जाचामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे हे मृत्यू प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते आणि त्यामुळेच अंत्यसंस्काराचे विधी अडकून पडले होते.
आना मारिया डायस यांना ग्रीन गोवा फाउंडेशनने हे प्रकरण तडीस नेण्यासाठी मोठी मदत केली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, सुमांताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तिच्या सासूच्या विरोधात मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या संवेदनशील प्रकरणामुळे, उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, अंत्यसंस्काराच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. दरम्यान, या अंत्यसंस्काराला सुमांताच्या पतीला आणि सासरच्या लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.