

म्हापसा: इंदिरानगर-करासवाडा भागातील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या एकाच कुटुंबातील बाप-लेकाचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत अजय जाधव (३८) आणि त्यांचा सात वर्षीय मुलगा अथर्व जाधव यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, अजय यांची पत्नी सुवर्णा जाधव (३०) या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडल्या होत्या. त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल केले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचीही प्राणज्योत मालवली.
या कुटुंबाने एखादे विषारी द्रव्य प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, त्यांनी नक्की काय खाल्ले किंवा प्राशन केले, याचा शोध घेण्यासाठी म्हापसा पोलिसांनी मंगळवारी, जाधव कुटुंब राहत असलेल्या घराची पुन्हा एकदा पाहणी केली. तसेच आजूबाजूच्या परिसराचाही आढावा घेतला आहे.
पोलिसांनी या कुटुंबातील काही सदस्यांचे जबाब नोंदवले असले, तरी अद्याप काही धागेदोरे मिळालेले नाहीत. नातेवाईक सध्या मानसिक धक्क्यात असल्याने पोलिस काही दिवस वाट पाहत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विषारी द्रव्याबाबतही अस्पष्टता
तिन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांच्या आतड्यांचा रंग बदलल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मृत्यूचे नेमके कारण आणि त्यांनी कोणते विषारी द्रव्य प्राशन केले होते, याचे रहस्य शोधण्यासाठी त्यांचे व्हिसेरा नमुने राखून ठेवले आहेत.
हे नमुने पुढील रासायनिक चाचणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, या चाचणीचा अंतिम अहवाल आल्यानंतरच या सामूहिक मृत्यूचे गूढ उकलणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.