दागिने हिसकावणाऱ्या तोतया पोलिसांचा सुळसुळाट

वृद्ध व महिला टार्गेट : म्हापशातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रस्‍ताव अजूनही लालफितीत
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

म्हापसा : मागील काही दिवसांत म्‍हापसा शहरात सोनसाखळी व दागिने हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. बोलबच्चन आणि तोतया पोलिसांचा सुळसुळात झालेला दिसतोय. महिला आणि वृद्धांना लक्ष्य करुन त्यांचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तू हातचलाखीने काढून घेतल्या जाताहेत. अशातच, पुन्हा एकदा शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. म्हापसा पालिकेच्या भोंगळ कारभारामुळेच शहरात नवीन कॅमेरे बसविण्याची प्रक्रिया ही लालफितीत अडकल्याची माहिती मिळाली आहे.

मध्यंतरी म्हापसा नगरपालिकेने केंद्रीय निधीतून संपूर्ण म्हापसा शहर हे सीसीटीव्ही देखरेखीअंतर्गत आणण्यास वेळ लागेल, त्यामुळे अगोदर बाजार क्षेत्र व मुख्य भागात अगोदर 28 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, हे काम सध्या निधीअभावी प्रशासकीय कारभारच्या लालफितीतच अडकल्याचे दिसते. या कामासाठी पालिकेला जवळपास 39 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे समजते, जो सध्या पालिकेला संभव नाही.

याबाबत पालिकेकडे माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, तेथील पदाधिकाऱ्यांनी कोणतीच समर्पक उत्तरे दिली नाहीत. थोडे दिवस थांबा, सविस्तर माहिती घेऊन नंतर सांगतो, असे हे लोक सांगतात. पाच वर्षांपूर्वी काही मुख्य भागात पालिकेने 13 कॅमेरे बसविले होते. परंतु कालांतराने ते नादुरुस्त झाले. तर काही देखभालीअभावी बंद पडले. पालिकेने बसविलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे देखभालअभावीच नादुरुस्त झाल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले होते.

Goa Crime
खुशखबर; गोव्यात आता पर्यटकांना मिळणार हेलिकॉप्टर राईड, सीप्लेनची सेवा

मध्यंतरी, पोलिसांनी शहरातील प्रमुख मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे विनंतीपत्र म्हापसा पालिकेस लिहिले होते. त्यानंतर काही कॅमेरे बसविले गेले, परंतु वर्षभरात ते नादुरुस्त झाले. हे कॅमेरे गुन्ह्यांच्या वेळी तपासकार्यात पोलिसांना मदत करतात, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

कुप्रसिद्ध ‘इराणी गँग’ सक्रीय

शहरात ‘इराणी गँग’ही सक्रीय झाल्याचे म्हापसा पोलिसांनी सांगितले आहे. अशावेळी कुणीही रस्त्यावर अडवून सबब सांगितल्यावर लोकांनी आपल्या अंगावरील दागिने काढून ते पिशवीत ठेवू नयेत, असे आवाहन म्हापसा पोलिसांनी केले आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना अशा घटनांपासून सावध राहण्याचे आवाहन करतो. मुळात पोलिस हे कधीच दागिन्यांबाबत विचारत नाहीत. त्यामुळे असे ठग भेटल्यास ‘चोर...चोर’ म्हणून ओरडावे अथवा गर्दीच्या ठिकाणी जावे अथवा जवळील दुकानात जाऊन माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com