
मडगाव: सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर दिवसाढवळ्या झालेल्या खुनी हल्ल्यामुळे सगळेच राज्य ढवळून निघाले असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था डळमळीत झाली आहे आणि गोव्याची वाटचाल बिहारच्या दिशेने सुरू आहे, अशाप्रकारची टीका होऊ लागली आहे. हा दिवसाढवळ्या झालेला हल्ला पाहिल्यावर गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरलेली नाही, हेही सिद्ध झाले आहे, अशी टीका विरोधक करू लागले आहेत.
१ जानेवारी ते १८ सप्टेंबर या साडेआठ महिन्यांच्या कालावधीत गोव्यात तब्बल २० खुनाची प्रकरणे तर १५ खुनी हल्ल्याची प्रकरणे घडली आहेत. यातील कित्येक प्रकरणे झुंडीने हल्ला करणारी आहेत. मागच्या महिन्यात मुंगूल-मडगाव येथे अशाचप्रकारे सामूहिक हल्ला करून दोन गुंडांची हत्या करण्याचा प्रयत्न, बाकीच्या गँगच्या गुंडांकडून करण्यात आला होता. या घटनेतून राज्य अजूनही सावरलेले नसताना रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला झाल्याने पुन्हा राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
वास्तविक या वर्षाची सुरुवातच अशा गुंडगिरी प्रकरणाने झाली होती. ३१ डिसेंबरच्या रात्री हरमल येथे न्यू इयर साजरे करण्यासाठी आलेल्या आंध्र प्रदेशच्या एका पर्यटकाने या भागातील एका शॅकवर माशाच्या किमतीवरून हुज्जत घातली. या लहानशा कारणावरून शॅकच्या वेटरने त्याला जबरदस्त मारहाण केल्याने तो मृत पावला होता.
ही दुर्घटना होऊन दोन दिवसही उलटले नसताना ३ जानेवारी रोजी कळंगुट येथील एका शॅकवर मुंबईच्या पाच पर्यटकांवर अशाचप्रकारे सहाजणांनी खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात रोहित दलोरिया हा पर्यटक गंभीर जखमी झाल्याने त्याला गोमेकॉत इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली हाेती.
२६ जानेवारी रोजी हरमल येथील स्थानिक अमर बांदेकर हा युवक समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेला असता एका शॅकने किनाऱ्यावर ठेवलेल्या खुर्चीवर बसला. या क्षुल्लक कारणावरून शॅकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून त्याला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला हाेता.
त्यापूर्वी १८ जानेवारी रोजी पूर्ववैमनस्यातून नागराज बानी या युवकावर मेरशी येथे चार गुंडांनी जीवघेणा हल्ला केला होता. तर १९ जानेवारी रोजी उसगाव येथे अशाच पूर्ववैमनस्यातून एका कामगारावर दोन स्थानिकांनी खुनी हल्ला केला.
गोव्यात फक्त गुंडांकडून खुनी हल्ले होण्याच्या घटना घडलेल्या नसून भाडोत्री गुंडांचा वापर करून व्यावसायिकांचे अपहरण करण्याचीही घटना १० जून रोजी फोंडा येथे घडली असून कुंडई येथील औद्योगिक वसाहतीत स्क्रॅप डिलर असलेल्या संदीप चौधरी याचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण करून त्याला बंगळुरू येथे नेऊन ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी फोंडा पोलिसांनी त्याची बंगळुरूहून सुटका केली होती.
मागच्या ऑगस्ट महिन्यातच अशाच दोन खुनी हल्ल्याच्या मोठ्या घटना घडल्या. यातील पहिली घटना १२ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वा.च्या सुमारास मुंगूल येथे घडली.
सुमारे २०-२५ गुंडांनी अन्य दोन गुंडांचा कोलवा येथून पाठलाग करत मुंगूल येथे त्यांना गाठत त्यांच्यावर खुनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी २५ जणांना अटक केली तरी हा हल्ला नेमका काेणत्या कारणामुळे करण्यात आला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. या प्रकरणात फरार असलेले अमोघ नाईक आणि वेली डिकाॅस्ता या दोन गुंडांना अटक करण्यात पोलिसांना अजूनही अपयश आले आहे.
परप्रांतीय समाजकंटकांकडून होणारे हल्ले हेही गोव्यासाठी घातक ठरत असून १६ ऑगस्ट रोजी बेतुल येथे झारखंडच्या सहाजणांनी चक्क पोलिसांवर हल्ला केला होता. हे परप्रांतीय रस्त्यावर बसून रात्रीच्यावेळी दारू पितात म्हणून त्यांना हटकण्यासाठी गेलेल्या पाेलिस शिपायावर या गुंडांनी दगडफेक करून जखमी केले होते. सध्या हे सहाहीजण तुरुंगात आहेत.
गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी हिस्ट्रिशिटर्सची यादी तयार केली असून उत्तर गोव्यात १३५ व दक्षिण गोव्यात ९२ हिस्ट्रिशिटर्स पोलिसांच्या रडारवर आहेत, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्राप्त झाली आहे. सात गुंडांना दक्षिण गोव्यातून तडीपार करण्यात आले असून अन्य चार गुंडांना तडीपार करण्याची शिफारस पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
१. रामा काणकोणकर याच्यावर झालेला हल्ला हा सरकारवर ते टीका करत असल्यामुळे त्याचे तोंड बंद करण्यासाठी केलेला हल्ला, असा आरोप सध्या केला जात आहे.
२. यापूर्वी अशाचप्रकारे सरकारच्या दुष्कृत्यावर आवाज उठविणारे सांगे येथील यू-ट्यूबर अमित नाईक यांच्यावर १४ सप्टेंबर २०२४ रोजी रिवण येथे खुनी हल्ला झाला होता. भाडोत्री गुंडांना आणून एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या एका स्थानिक राजकारण्याने हा हल्ला केल्याचे त्यावेळी सांगितले जात होते.
३. १३ ऑक्टोबर २००८ या दिवशी सामाजिक कार्यकर्ते ॲड. आयरीश रॉड्रिग्स यांच्यावरही पणजी भागात तलवारींनी हल्ला केला होता. या प्रकरणात नंतर सहाजणांना अटक केली होती. हे सहाजण तत्कालीन मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे हस्तक होते, असा आरोप त्यावेळी केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.