

मडगाव: बनावट औषध प्रकरणात सरकारी विश्लेषकाच्या अहवालाला आव्हान देण्यासाठी तसेच औषधांच्या नमुन्यांची फेरतपासणी करण्याची मागणी करणारा झुवारीनगर-सांकवाळ येथील अमर पॉलिक्लिनिकचे डॉ. केशव यादव यांचा अर्ज दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. सरकारी विश्लेषकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्धारित २८ दिवसांच्या मुदतीत फेरतपासणीसाठी अर्ज न केल्याने तो मुदतीबाहेर असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायाधीश राम प्रभुदेसाई यांच्या न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. अन्न व औषध प्रशासन संचालनालयाच्या औषध निरीक्षक कविता बोरकर यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. यादव यांच्या क्लिनिकची तपासणी करून औषधांचे नमुने घेतले होते. या नमुन्यांचा सरकारी विश्लेषकाचा अहवाल ६ मार्च २०२५ रोजी डॉक्टरांना देण्यात आला. त्यानंतर ४ जून रोजी क्लिनिकमधील औषधांचा साठा जप्त करण्यात आला. पुढे ३ ऑक्टोबर रोजी वास्को येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आले.
बचाव पक्षाने युक्तिवाद करताना, औषध निरीक्षकांनी संशयित डॉक्टरांना वैयक्तिक सुनावणीची संधी दिली नाही, तसेच औषधांचे नमुने न्यायालयात जमा केल्याची नोटीसही बजावली नाही, असे नमूद केले. न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतरच नमुन्यांच्या फेरतपासणीसाठी अर्ज करण्याची मुदत सुरू होते. त्यामुळे ५ जानेवारी २०२६ रोजी दाखल केलेला अर्ज मुदतीत असल्याचा दावा करण्यात आला.
दुसरीकडे, सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध केला. औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याच्या कलम २५ (३) नुसार सरकारी विश्लेषकाचा अहवाल प्राप्त झाल्यापासून २८ दिवसांच्या आत लेखी आक्षेप नोंदवणे आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
कोर्टाचे निरीक्षण
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, सरकारी विश्लेषकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर २८ दिवसांच्या आत औषध निरीक्षक किंवा न्यायालयाला लेखी स्वरूपात कळवणे कायद्याने बंधनकारक आहे. या प्रकरणात डॉक्टरांना ६ मार्च २०२५ रोजी अहवाल मिळाला होता; मात्र फेरतपासणीसाठीचा अर्ज तब्बल दहा महिन्यांनंतर दाखल करण्यात आला. त्यामुळे कायद्यातील निर्धारित मुदतीचे पालन झालेले नाही. शिवाय संबंधित औषधांची वैधता संपल्यामुळे त्यांच्या नमुन्यांची फेरतपासणी करणेही आता शक्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.