Ironman 70.3 Goa: जगातील आव्हानात्मक स्पर्धा म्हणून प्रसिद्ध असलेली आयर्नमॅन स्पर्धेचे रविवारी गोव्यात आयोजन करण्यात आले होते. जगभरातील जवळपास दीड हजार स्पर्धेक या स्पर्धेत सहभागी झाले होते. दरम्यान या साहसी खेळात गोव्यातील एका IPS अधिकाऱ्यांने देखील आपले कसब दाखवले आहे. गोव्याचे IPS अधिकारी निधीन वलसान (Nidhin Walsan) यांनी दुर्धर कर्करोगार मात करून, आव्हानात्मक आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे.
निधीन वलसान यांना Non-Hodgkin's lymphoma हा कर्करोग झाला होता. कर्करोगाचा हा अतिशय धोकादायक प्रकार मानला जातो. वलसान कर्करोगाच्या चौथ्या स्टेजमध्ये असताना त्याच्यावर उपचार सुरू झाले. नऊ महिन्यांपूर्वी वलसान यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यानंतर रविवारी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी स्वत:च्या क्षमतांना आव्हान देत ही स्पर्धा पूर्ण देखील केली. वलसान यांच्या कामगिरीबाबत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
8 तास, 3 मि. आणि 53 सेकंदात पूर्ण केली स्पर्धा
आयर्नमॅन स्पर्धेत 1.9km जलतरण, 90 km सायकलिंग आणि 21 km धावणे यांचा समावेश करण्यात आला होता. निधीन वलसान यांनी ही स्पर्धा 8 तास, 3 मि. आणि 53 सेकंदात पूर्ण केली. वलसान यांना आयर्नमॅन किताबाला गवसणी घालता आली नसली तरी, आपल्या क्षमतांची चाचणी घेत त्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. वलसान यांच्या जिद्दीचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे.
गुन्हे विभागाची जबाबदारी
निधीन वलसान यांच्याकडे गोव्यातील गुन्हे विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गोव्यातील महत्वपूर्ण आणि वादग्रस्त असेलल्या जमीन हडप प्रकरणाचा तपास देखील त्यांच्याकडे आहे. जमीन हडप प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीची जबाबदारी वलसान यांच्याकडे आहे.
सुरूवातील या स्पर्धेत सहभागी होण्याची भिती वाटत होती. 2021 वर्षात आजारामुळे अनेक समस्या आल्या मात्र 2022 वर्षात या स्पर्धेच्या रूपानं माला खूप गोष्टी मिळाल्या. असे वलसान यांनी म्हटले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.