Goa: राजधानी पणजीतील (Capital Panaji) स्मार्ट सिटी योजनेखाली (Samart City Sceme) हाती घेतलेली अनेक कामे गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहेत. मिरामार किनाऱ्यावरील (Miramar Bridge) झाडे कचऱ्याबरोबर रासायनिक वापरून नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू आहे. पणजीत पुन्हा फुगे विक्रेते भिकाऱ्यांकडून ड्रग्ज विक्री सुरू झाली आहे. पणजीतील समस्या महापालिका तसेच सरकार सोडविण्यास अपयशी ठरल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसने केला आहे.
पणजी काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते उदय मडकईकर म्हणाले की, कांपाल येथील इनडोअर स्टेडिममधील गेली कित्येक महिने मतदान यंत्रे ठेवल्याने त्याचा वापर खेळाडूंना सरावासाठी करता येत नव्हता. ती तेथून हलविण्यात आल्याने आता खेळाडूंना दिलासा मिळाला आहे. गेली दोन वर्षे कांपाल येथील जलतरण तलावाच्या नुतनीकरणाचे काम बंद आहे. या तलावामध्ये सराव करून अनेक जलतरणपटूंनी राष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. या जलतरण तलावाच्या कामाबाबत पणजीच्या आमदारांचे लक्ष नाही. त्यामुळे खेळाडूंना पेडे येथील जलतरण तलावाकडे जाण्याची नामुष्की आली आहे. क्रीडामंत्री व सरकारने हा जलतरण तलाव जलतरणपटूंना सरावासाठी उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.
महापौर असताना कांपाल येथील परेड मैदानावरील पाईपच्या ठिकाणी वस्ती करून असलेले भिकारी कित्येक वर्षे फुगे विक्रीच्या नावाखाली ड्रग्ज विकत असल्याचा पर्दाफाश केला होता. मात्र पुन्हा हे प्रकार सुरू झाले आहेत. या प्रकरणामागे मोठे ‘सिंडिकेट रॅकेट’ आहे. यासंदर्भात महापालिका व पोलिसांनी कारवाई करावी. मिरामार ते करंझाळेपर्यंतच्या समुद्राच्याबाजूने असलेल्या भागात तेथे असलेल्या सुरूच्या झाडांवर कचरा टाकण्याच्या नावाखाली रासायनिक वापरून ही झाडे नष्ट करण्याचे षडयंत्र सुरू आहे. त्यामुळेच ही सुरूची झाडे सुकत चालली आहेत.
सांतिनेझ येथील महापालिकेचे वाचनालय अजूनही बंदच !
कोविड महामारीच्या काळात सांतिनेझ येथील महापालिकेचे वाचनालय बंद करण्यात आले ते आजपर्यंत खुले करण्यात आलेले नाही. पणजी शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच लोक या वाचनालयात पुस्तके तसेच वृत्तपत्र वाचनासाठी यायचे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून कॅरम बोर्ड होता. मात्र हे वाचनालय बंद असल्याने ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी साधन नाही. त्यामुळे वाचनालय खुले करण्याची मागणी मडकईकर यांनी केली.
मळा खाडीवरील रस्ता सुरू करा: डिक्रुझ
मळा खाडीवरील रस्ता अजूनही वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे लोकांना मानेचा तसेच पाठीच्या कणाच्या आजार होऊ लागला आहे. स्मार्ट सिटी योजनेखालील कामे पूर्ण झालेली नाहीत. अनमोड घाटातील रस्ता अजूनही दुरुस्त न झाल्याने गोवा हद्दी ते रामनगरपर्यंतचा रस्ता अजूनही बंद ठेवला आहे. हा रस्ता कित्येक वर्ष का केला जात नाही याचे उत्तर केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्र्यांनी गोव्यातील भेटीवेळी लोकांना द्यावे अशी मागणी नगरसेवक मिनिन डिक्रुझ यांनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.