Goa Congress Rebel : गोव्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे आठ आमदार विधानभवनात पोहोचले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या बऱ्याच काळापासून भाजपकडून हे काँग्रेस फोडण्याचे प्रयत्न सुरु होते, मात्र आज हे सर्व आमदार एकत्र विधानसभेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा काँग्रेस फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्यासह अन्य 7 आमदारांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, केदार नाईक, राजेश फळदेसाई आणि रुडॉल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. अद्याप या भाजप प्रवेशाबाबत कोणत्याही आमदाराकडून अधिकृतपणे दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र आज किंवा उद्या हे आठही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान वास्को बायणा येथील एका पत्रकार परिषदेत नजिर खान यांनी या फुटीसंदर्भात एक मोठं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केलं होतं. यावेळी येणाऱ्या दोन महिन्यात विद्यमान काँग्रेसचे आठ आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा नजिर खान यांनी केला होता.
राज्य काँग्रेस पक्षाने गोव्यातील अल्पसंख्याकांचा उपयोग फक्त विधानसभा निवडणुकीपुरता करून आमच्यावर अन्याय केला आहे. अशा स्वार्थी पक्षावर यापुढे विश्वास ठेवणे कठीण असल्याने गोवा प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदाबरोबर काँग्रेस सदस्य पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती नजिर खान यांनी दिली होती. ते पुढे म्हणाले, गोवा प्रदेश काँग्रेस समितीवरील जनतेचा विश्वास गेल्याने काँग्रेस पक्ष रसातळाला पोहचला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.