Congress : गोव्यात काँग्रेसची नवी समिती पक्षाला ऊर्जा देऊ शकते?

आता ही नवीन समिती काँग्रेसच्या या फाटलेल्या आभाळाला किती ठिगळे, कुठे कुठे लावते, हे बघणेच आपल्या हाती राहिले आहे.
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Congress : गोवा राज्याच्या काँग्रेसची नूतन समिती नुकतीच जाहीर झाली आहे. काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये मिळाल्यानंतर पक्षात सामसूम झाली होती. नवीन समिती जाहीर केल्यामुळे ही सामसूम काही अंशी दूर झाली आहे. पण, खरेच ही समिती आपल्या पक्षाला न्याय देते का, हे बघावे लागेल.

सध्या राज्यात काँग्रेसला घरघर लागल्याचे स्पष्टपणे दिसायला लागले आहे. काँग्रेसजवळ आजमितीला बहुजन समाजाला एका धाग्यात गुंफू शकेल, असा नेताच नाही. विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव हे तसे नवखे आहेत. त्यांचा काँग्रेस कार्यकर्त्यांशी विशेष संपर्कही नाही. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर हेही अननुभवी आहेत. त्यात परत आठ आमदारांनी घाऊकपणे पक्षांतर केल्यामुळे त्यांचे नेतृत्व अस्थिरतेच्या भोवर्‍यात सापडल्यासारखे झाले आहे. ‘कोणी कोणाचा नाही राजा’, अशीच सध्या काँग्रेसची स्थिती झाली आहे.

संकल्प आमोणकरसारखा काँग्रेसचा निष्ठावंत पाईक पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसेल, असे कोणी स्वप्नातसुद्धा पाहिले नसेल. पण वस्तुस्थिती आज काँग्रेसच्या अस्तित्वालाच आव्हान देताना दिसायला लागली आहे. दुसर्‍या बाजूला भाजप आज राज्यात कधी नव्हे एवढा कणखर होताना दिसायला लागला आहे. आमदार आयात केल्यामुळे मिळालेल्या पाशवी बहुमतामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आज काही धाडसी निर्णय घेताना दिसताहेत. एक विजय सरदेसाई सोडल्यास भाजपला आव्हान देईल असा आमदार आज विरोधी पक्षांकडे राहिलेला नाही. मुळात राज्यात विरोधी पक्ष आहे की काय, याचीच शंका यायला लागली आहे. काँग्रेसची नाव तर हेलकावे खाताना दिसायला लागली आहे आणि या नावेत स्वकीय किनार्‍यापर्यंत नेऊ शकणारा नावाडीही दिसेनासा झाला आहे. आता ही नवीन समिती नावाड्यांची भूमिका वठवते की काय ते बघावे लागेल.

या समितीत बहुतेक चेहरे नवीन आहेत. मागच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात नाराजीही दिसते आहे. काँग्रेसच्या काही निष्ठावंतांना डावलल्यामुळे, ‘हेचि फळ काय मम तपाला?’, असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली आहे. परवा फोंड्याचा एक काँग्रेस निष्ठावंत हेच सांगत होता, आपण गेली कित्येक वर्षे काँग्रेसचे निष्ठेने कार्य करत आलो असून व अनेक पदे मिळविली असूनसुद्धा आपल्याला या वेळी डावलले जाते आहे. त्याचे म्हणणे पटते. काल परवा पक्षात आलेल्यांची समितीत वर्णी लावल्यामुळे अनेकजण नाराज झाले आहेत.

Congress
Goa Culture : गोव्यातील दत्तोपासनेची समृद्ध करणारी परंपरा

जनार्दन भंडारीसारख्या काँग्रेसची खिंड लढविणार्‍या लढवय्याला डावलून काँग्रेसने काय साधले, हेच कळत नाही. त्यामुळे काँग्रेसचे काही निर्णय हे नेहमीच अनाकलनीय असतात. अशा निर्णयांचे त्यांना फळही मिळाले आहे. पण, ‘गिरा तो भी टांग उपर’ ही काँग्रेसची वृत्ती आजही तशीच आहे. आता लोकसभा निवडणुका फक्त सव्वा वर्षांवर येऊन ठेपल्या आहेत. भाजपने तयारीला कधीच सुरुवात केली आहे. पण काँग्रेस फक्त जुळवाजुळव करताना दिसत आहे. काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन तर हवेत पतंग सोडताना दिसत आहेत. साडेतीन वर्षे आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केलेल्या सार्दिनबाबांना आता निवडणुका जवळ येत आहेत, हे पाहून जाग यायला लागली आहे. ते उलट्या सुलट्या मागण्या करायला लागले आहेत. ‘मोपा विमानतळाला जेक सिक्वेरांचे नाव द्यावे’ ही अशांपैकीच एक मागणी. आता सिक्वेरा व मोपा यांचा कसा संबंध येतो, हे सार्दिनच जाणोत.

आभाळच फाटले तर त्याला ठिगळे तरी कुठे कुठे लावायची, असा प्रश्न काँग्रेसला पडला आहे. आता ही नवीन समिती काँग्रेसच्या या फाटलेल्या आभाळाला किती ठिगळे, कुठे कुठे लावते, हे बघावे एवढेच आपल्या हाती राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com