Goa Culture : गोव्यातील दत्तोपासनेची समृद्ध करणारी परंपरा

योगसाधना, भगवद्भक्ती याद्वारे या श्रीदत्त मंदिरांनी गोव्यातल्या श्रीदत्तोपासनेच्या परंपरेला भाविकांनी समृद्ध केले.
Dattatreya Jayanti 2022
Dattatreya Jayanti 2022 Dainik Gomantak

मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा श्रीदत्तजन्माशी निगडित असल्याने ‘श्रीदत्त पौर्णिमा’ म्हणून साजरी केली जाते. हा महिना जत्रा, काला आदी उत्सवांनी खरे तर गजबजलेला असतो आणि त्यामुळे हेमंत ऋतूतल्या थंडीच्या मोसमात साजरी होणारी श्रीदत्त पौर्णिमा भक्ती, अध्यात्म आणि वैराग्य यांचे प्रतीक असणाऱ्या श्रीदत्तात्रेयाच्या भजन, पूजनाने भाविकांत प्रिय ठरलेली आहे. शैव, वैष्णव, शाक्त अशा नानाविध संप्रदायांना एकात्मतेच्या धाग्यात गुंफणारे हे दैवत पूर्वापार लोकप्रिय ठरलेले आहे. अनसूयेच्या पोटी जन्माला आलेले हे दैवत ब्रह्मा, विष्णू आणि महेश या दैवतत्रयींना एकत्र आणते आणि त्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातल्या भक्तिरसाला आगळीवेगळी उंची देण्याचे कार्य श्रीदत्त पौर्णिमा करत आलेली आहे.

गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशांत श्रीदत्त, दत्तगुरू म्हणून परिचित असलेले हे दैवत बंगालात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना एकत्रित आणणारे रूप, ‘त्रिनाथ’ म्हणून ओळखले जाते. नाथ संप्रदायात खरे तर आदिनाथ हे दैवत शिवाचे रूप असून, मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी शिवाला आदिनाथ म्हणून गुरुस्थानी पूजलेले आहे. परंतु, असे असले तरी नाथ संप्रदायाने शैव-वैष्णव संप्रदायाच्या एकात्मतेला चालना देण्यासाठी श्रीदत्तात्रेयाला पूजन परंपरेत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. पृथ्वी, वायू, अग्नी, आकाश, जल, चंद्र, सूर्य, कबुतरे, अजगर, मधमाश्या, मधुपालक, महासागर, ससाणा, पतंग, हत्ती, मृग, मासा, दरबारी, बालक, सर्प, स्त्री, कोळी, सुरवंट आणि बाणकाम कारागीर असे एकूण २४ गुरू करून त्यांच्याकडून ज्ञान संपादन करणारा हा देव साधेपणा, शुचिता आणि वैराग्यमूर्ती म्हणूनच परिचित झालेला आहे.

‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथातून नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय यांच्यातली एकात्मता जशी दृष्टीस पडते, त्याचप्रमाणे हिंदू- मुस्लिमांतल्या संघर्षाच्या कालखंडातील चौदाव्या ते अठरा शतकात नाथ संप्रदायाने हिंदू धर्म सुदृढ करण्यासाठी जे कार्य आरंभले होते, त्याची प्रचिती येते. चक्रधर स्वामीच्या महासंप्रदायाने जरी श्रीकृष्ण भक्तीला प्राधान्य दिलेले असले तरी आपले प्रेरणास्थान म्हणून श्रीदत्तात्रेयाविषयी आदरभाव व्यक्त केलेला आहे. त्यामुळे, भक्ती संप्रदाय, नाथ संप्रदाय यांद्वारे कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांमध्ये वसलेल्या गोव्यात पोर्तुगीज पूर्वकालापासून श्रीदत्तोपासना रुजली आणि समृद्ध होत गेली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील वारकरी संप्रदायाच्या संत तुकाराम महाराजांनी दत्तोपासनेचे महत्त्व जाणले होते आणि त्यामुळे आपल्या अभंगातून

तीन शिरे, सहा हात,

तया माझा दंडवत

कारवे झोळी, पुढे श्वान,

नित्य जान्हवीचे स्नान

तुका म्हणे दिगंबर,

तया माझा नमस्कार..

असा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे श्रीहनुमान, श्रीविठ्ठल मंदिरांच्या गोव्यातल्या परंपरेत श्रीदत्त मंदिरांची ठिकठिकाणी भर पडलेली पाहायला मिळते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही हिंदू धर्मातली तिन्ही रूपे दत्तात्रेयाच्या मूर्तीत एकत्र आलेली असून गोव्यात त्यामुळे कुठे एकमुखी, तर कुठे त्रिमुखी श्रीदत्ताची उपासना होत असलेली पाहायला मिळते. सत्यम्, शिवम् आणि सुंदरम् अशा तीन विचारांचा सुरेख मिलाफ दत्तोपासनेत झालेला असल्याकारणाने गोव्यात जेथे जेथे श्रीदत्त स्थाने निर्माण झाली, तेथे तेथे वड, पिंपळ, औदुंबर, पायरी आदी वृक्षसंपदेत ध्यान धारणा, भक्ती उत्सव, वैराग्य यांची अभिवृद्धी झालेली पाहायला मिळते.

सासष्टी महालातल्या केळशी गावात सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी मंदिर विध्वंसाचे सत्र राबवण्याच्या अगोदर तेथे श्रीदत्त मंदिर असल्याचे मानले जाते. परंतु नंतरच्या काळात लोटलीतील रासई, तिसवाडीतील मेरशी, कुडतरीतील मुगाळी कामरशेत, म्हापशातील दत्तवाडी, सावईवरेतील घाणो, फोंड्यातील खांडेपार, केपेतील कुशावती नदी किनारी, रायात कुण्णे, डिचोलीत पाजवाडा, पणजीत चिंचोळेत पिंपळेश्वर दत्त संस्थान आदी ठिकाणी श्रीदत्त मंदिरे उभी राहिली. योगसाधना, भगवद्भक्ती याद्वारे या श्रीदत्त मंदिरांनी गोव्यातल्या श्रीदत्तोपासनेच्या परंपरेला भाविकांत समृद्ध केले.

सत्तरी आणि डिचोली तालुक्याच्या सीमेवरती असले जंगल समृद्ध टेकडीच्या पायथ्याशी जेथे मान्सूनच्या काळात पश्चिम घाटात उगम पावणारी वाळवंटी नदी उत्सुकतेने येते तेथे नरसोबाच्या वाडीतल्या श्रीदत्त संस्थानातून साक्षात्काराची प्रचिती आल्यावरती औदुंबर वृक्षारोपण केले. तेव्हापासून ध्यानधारणेस बसणाऱ्या भाविकांना दिव्यत्वाची प्रचीती येऊ लागली आणि त्यातून चैत्र वद्य द्वितीयेला म्हणजेच दि. ५ एप्रिल १८२२ रोजी श्रीदत्त संस्थानाची उभारणी साखळीत करण्यात आली आणि तेव्हापासून हे मंदिर शांती, भक्ती, अध्यात्म, वैराग्याला चालना देण्याचे कार्य करत आहे. इथल्या एकमुखी श्रीदत्त मूर्तीला त्यामुळे ‘शांताराम’ असे नाव प्रदान केले. साखळी येथील बाबलपीर दर्ग्यापासून वाळवंटी नदीच्या डाव्या तीरावर बसले हे संस्थान मार्गशीर्ष पौर्णिमेला साजर्‍या होणार्‍या श्रीदत्त पौर्णिमेच्या उत्सवामुळे नावारूपास आलेले आहे.

श्रीदत्ताच्या उत्सवमूर्तीला जयंतीनिमित्त फुलांनी सजवलेल्या पाळण्यात घालून पारंपरिक शैलीत पाळणा गीतांचे उत्स्फूर्त गायन केले जाते, त्यानंतर रात्री श्रीदत्ताचा शिबिकोत्सव पौर्णिमेप्रीत्यर्थ साजरा होतो. पूर्वी देवस्थानाशी निगडित महिला नृत्य, गायनाचा आविष्कार करणाऱ्या ‘पेणे’ गीतांचे सादरीकरण करायच्या. आज पुरुष भाविकांमार्फत पेण्याचे सादरीकरण करून श्रीदत्तविषयीचा भक्तिभाव प्रकट केला जातो. मराठी रंगभूमीवरले प्रसिद्ध कलाकार आणि साखळीचे सुपुत्र रामदास कामत यांनी हे पेणे संगीताच्या साथीवरती गाऊन पेणे गायनाला उभारी देण्याचे कार्य केलेले आहे. श्रीदत्त पौर्णिमच्या दुसर्‍या रात्री कीर्तनानंतर ‘लळित’ या लोकनाट्याचे सादरीकरण मंदिराच्या दीपमाळेसमोर स्थानिक कलाकारांमार्फत केले जाते.

वाळवंटी तीरावरचे साखळी दत्तवाडीतील हे श्रीदत्त संस्थान भारतभरातल्या श्रीदत्त भक्तांसाठी आकर्षण ठरलेले आहे. औदुंबर, पिंपळ आदी वृक्षांच्या सांनिध्यात वसलेले हे मंदिर श्रीदत्त पौर्णिमेच्या उत्सवात भाविकांना आकर्षित करते, शैव, वैष्णव, शाक्त अशा विविध संप्रदायांत विखुरलेल्या भाविकांना एकत्र आणून त्यांना भक्तिरसाची आणि दिव्यत्वाची प्रचीती देण्याची कामगिरी साखळीतील हे श्रीदत्त संस्थान करत आले आहे.

पणजीतील चिंचोळे येथील श्रीदत्त मंदिर नागरीकरणाच्या जहरी विळख्यात फसलेल्या पणजी महानगरातल्या भाविकांना मन:शांती प्रदान करते. संसारातल्या व्यापाने, तापाने संत्रस्त झालेल्यांना भगवद्भक्ती, मानसिक आधार देण्याबरोबर सेवाभावी वृत्ती जागवण्यास कारणीभूत ठरते आणि अशा मंदिराकडे समाज सतत आशेने पाहत असतो. पोर्तुगीज अमदानीत गोमंतकीय समाजमनाचा तेजोभंग करण्याबरोबर त्यांच्या अस्मितेची चिरफाड सत्ताधीशांनी केलेली होती. अशावेळी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी मंदिरांचा आश्रय घेऊन भारतीय संस्कृतीचे संगोपन आपल्याबरोबर नव्या पिढीला कार्यप्रवण करेल या दृष्टीने केले होते. कीर्तन, ललित, भजन गायन आदी परंपरेतून संस्कृती अभिवृद्धीचे कार्य त्यांनी मंदिरांच्या माध्यमातून पुढे नेले होते. भगवद्भक्ती, योगसाधना, वैराग्याचे संगोपन करून श्रीदत्तोपासना भाविकांच्या जगण्याला समृद्ध करत आलेली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com