Goa Congress: लोकसभा निवडणुकीपूर्वी 11 बँक खाती गोठवण्याच्या भाजप सरकारच्या कृतीचा काँग्रेसने निषेध केला आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत हा निषेध व्यक्त केलाय.
यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, खासदार फ्रान्सिस्को सार्दिन, आमदार कार्लूस फॅरेरा, आमदार अॅल्टन डिकोस्टा, आणि रमाकांत खलप उपस्थित होते.
अमित पाटकर म्हणाले की, 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 210 कोटी रुपयांच्या प्राप्तिकर मागणीवर खाती गोठवण्यात आली आहेत.
‘‘आमची खाती गोठवून आणि जबरदस्तीने 115.32 कोटी काढून घेऊन भाजपने आमच्यावर अन्याय केला आहे. लोकांनी काँग्रेस पक्षाला दिलेल्या देणग्या लुटल्या गेल्या आहेत.
निवडणूक जवळ आली आहे आणि प्रचारासाठी आमच्याकडे पैसे नाहीत, आम्हाला पुढे जाण्यापासून रोखण्याचा हा भाजपचा अजेंडा आहे. भाजप घाबरला आहे कारण ते हरत आहेत,” असे पाटकर म्हणाले.
ते म्हणाले की, भाजपसह कोणताही राजकीय पक्ष आयकर भरत नाही, तरीही काँग्रेस पक्षाची 11 बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
पाटकर म्हणाले, “या कृत्याद्वारे हे स्पष्ट होते की ते आमच्यासाठी अडचणी निर्माण करू इच्छित आहेत आणि आमची मोहीम थांबवू इच्छित आहेत, खाती गोठवण्याच्या भाजपच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. गेल्या आठवड्यात आम्हाला आयटी विभागाकडून आर्थिक वर्ष 1993-94 साठी नवीन नोटीस मिळाली. आम्हाला त्रास देण्यासाठी ते असे करत आहेत,” असे पाटकर म्हणाले.
आलेमाव म्हणाले की, ही लोकशाहीची हत्या आहे. “भाजप लोकशाहीला संपवून टाकण्यासाठी सर्व यंत्रणांचा वापर करत आहे. आता निदान निवडणूक आयोगाने तरी हस्तक्षेप करावा.
प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि यासाठी त्यांनी हे समजून घेतले पाहिजे,” असे आलेमाव म्हणाले. रोजगार, खाणकाम सुरू करणे, वित्त, म्हादई आणि इतर मुद्द्यांवर भाजप अपयशी ठरल्याची टिकाही त्यांंनी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.