Goa Congress MLA | Goa Live Update
Goa Congress MLA | Goa Live UpdateDainik Gomantak

गोव्यात बंडखोरांची गोची; आठवा आमदार मिळेना

विरोधी पक्षनेतेपदावरून लोबोंची उचलबांगडी; मुकूल वासनिक आज गोव्यात येणार

मडगाव : दोन तृतीयांश आमदार फोडून काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपात विलीन करण्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि मायकल लोबो (Michael Lobo) यांचे मनसुबे आठवा आमदार मिळत नसल्याने तुर्तास तरी धुळीस मिळालेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी आपले प्रयत्न रात्री शेवटपर्यंत सुरू ठेवले होते.

काँग्रेसच्या या बंडात सुरवातीला दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, राजेश फळदेसाई व कार्लोस फेरेरा हे सहा आमदार होते. एका खनिज उद्योजकाने मध्यस्थी केल्याने लोटलीचे आमदार आलेक्स सिक्वेरा हेही त्यांच्यात सामील झाले. मात्र, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, रुडोल्फ फेर्नांडिस व संकल्प आमोणकर या चारपैकी एकही आमदार फुटण्यास तयार नसल्याने तूर्तास हा बेत रद्द झाल्याचे सांगितले जाते.

पूर्वी ठरलेल्या कार्यक्रमानुसार, केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भुपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या फुटीर गटाला भाजपात समाविष्ट केले जाणार होते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कामत यांचा गट वेगळा बसविण्याची तयारीही झाली होती. यासाठी सभापती कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पण आठवा आमदार मिळू न शकल्याने हा बेत तडीस जाऊ शकला नाही. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता आणि सांताक्रूझचे आमदार रुडोल्फ फेर्नांडिस यापैकी कुणा एकाला आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न मायकल व दिगंबर यांनी शेवटपर्यंत केले. पण त्यांना रात्री उशिरापर्यंत यश आले नव्हते. (Goa marathi news)

विरोधी पक्षनेतेपदावरून लोबोंची उचलबांगडी

विधानसभा अधिवेशनाच्या आदल्या दिवशीच काँग्रेसमधला असंतोष उफाळून आला. बंडखोरीच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी सायंकाळी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या संमतीने मायकल लोबो यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून संकल्प आमोणकर(Sankalp Amonkar) यांची त्याजागी निवड केली आहे. तर लोबोंसह ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांच्यावरही पक्षविरोधी काम केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

‘पक्षामध्ये फूट पडली आहे. यासाठी कामत आणि लोबो यांनी पक्षाच्या विरोधात कट-कारस्थान करत पक्षातील आमदारांना वैयक्तिक फायद्यासाठी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे अनेक पुरावे आम्हाला आढळले आहेत. या आधारे आम्ही लोबो आणि कामत यांच्या विरोधात पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करणार आहोत. याचाच भाग म्हणून लोबो यांचे विरोधी पक्षनेतेपद काढून घेतले असून त्यांच्या जागी संकल्प आमोणकर यांची निवड केल्याची घोषणा राव यांनी केली.

यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, पक्षाचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव, आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, कार्लुस फरेरा, एल्टन डिकॉस्ता, संकल्प आमोणकर उपस्थित होते. यावेळी राव यांनी नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा आमच्यासमवेत असून आजारपणामुळे ते आता उपलब्ध होऊ शकले नाहीत, असे सांगितले. (God live update)

Goa Congress MLA | Goa Live Update
..तर ओबीसी समाज उतरणार रस्‍त्‍यावर

गुंडू राव म्हणाले, ‘सध्या भाजपच्या संपर्कात असलेल्या पाच आमदारांपैकी तीन आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारच्या षडयंत्रात सामील होणे त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. ज्या आमदारांनी देवासमोर शपथ घेऊन आपण पक्षविरोधी कारवाई करणार नाही आणि पक्षांतर करणार नाही, असे जाहीर केले होते. याशिवाय त्यांनी प्रतिज्ञापत्रही लिहून दिले होते, तरीही त्यांनी पक्षविरोधी कारवायांबरोबर पक्षांतर करण्याचा प्रयत्न केला आहे, हे लोकशाहीला घातक आहे.’ भाजपवर टीका करताना ते म्हणाले, भाजपला केंद्रात आणि राज्यांमध्ये विरोधी पक्ष नको आहे. त्यामुळे त्यांना आपला अजेंडा पुढे रेटायचा आहे. देशभरात भाजप पैसा, सत्ता आणि प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोकशाहीविरोधी आहे.

मुकूल वासनिक आज येणार : बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मध्यरात्रीपर्यंत पाच आमदारांसह बैठका घेतल्या. हायकमांडला याची कल्पना दिली असून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते मुकूल वासनिक हे सोमवारी गोव्यात येऊन आढावा घेणार आहेत.

मडगावातील घडामोडी

1 दिनेश गुंडू राव यांनी हॉटेल ला ग्रेस मॅजेस्टिक येथे सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलावले. पण ‘मी रिटायर्ड हर्ट’ असे सांगत बैठकीस अनुपस्थित राहून एकप्रकारे आपण पक्षाबरोबर नसल्याचे जाहीर केले.

2 काही वेळाने प्रतोद फेरेरा यांच्या निवासस्थानी कामत व राव यांच्यात चर्चा झाली. पण त्याच्यातून फारसे काही निष्पन्न झाले नाही. यावेळी चोडणकर, पाटकर हेही उपस्थित होते.

3 तत्पूर्वी लोबोंसह 9 आमदार बैठकीस हजर राहिल्याने पक्षात सर्व आलबेल असे सांगितले. मात्र, नंतर नाईक व फळदेसाई हे कामतांच्या घरी गेले.

4 त्यानंतर आपली आई आजारी असल्याचे सांगून कार्लोस फेरेरा यांनीही हॉटेल सोडले. यामुळे काही वेळातच काँग्रेसच्या गोटात काहीतरी शिजतेय याचे संकेत मिळाले.

5 सायंकाळी 5 पर्यंत मडगाव येथील काँग्रेस गोटात मायकल लोबो, रुडोल्फ फेर्नांडिस ब संकल्प आमोणकर हे तीनच आमदार राहिले होते. पण नंतर लोबो निघून गेले.

न्यायालयाची भीती

बाबू कवळेकरांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस आमदारांचा 11 जणांचा गट भाजपात विलीन झाल्यानंतर काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलेली आहे. ही याचिका सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये सुनावणीस येईल. न्यायालयाने ही फूट ग्राह्य धरली नाही तर आता फुटलेले आमदार गोत्यात येऊ शकतात. त्यासाठीच काही आमदार पक्ष सोडत नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com