खरी कुजबुज: समीलना काँग्रेसची उमेदवारी?

Khari Kujbuj Political Satire: कुंभारजुवे मतदारसंघातून गेल्या वेळेला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता.
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Dainik Gomantak
Published on
Updated on

समीलना काँग्रेसची उमेदवारी?

कुंभारजुवे मतदारसंघातून गेल्या वेळेला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता. मात्र, त्यानंतर एका नाट्यमय घडामोडीत काँग्रेसमधून हा उमेदवार भाजपवासी झाला; पण मंत्रिपद मिळाले नाही. इकडे कुंभारजुवेवासीयांचे काँग्रेस प्रेम काही कमी झालेले नाही. सध्या सामाजिक कार्यकर्ते समील वळवईकर हे जोमाने कुंभारजुवे मतदारसंघात काम करीत आहेत. एका आमदाराला नसतील एवढी कार्यक्रमांची निमंत्रणे समीलबाबला असतात आणि अशा कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थिती लावतात. लोकांशी संवाद साधतात, त्यामुळे येत्या निवडणुकीत समील यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. आता या संधीचे सोने कसे करून घ्यायचे हे सर्वस्वी समील यांच्याच हाती आहे, हे निश्‍चित.

दामू के मन मे खुशी के लड्डू!

निवडणूक जवळ आली की, फातोर्ड्यातील काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्‍यात कलगितुरा सुरू होणे आता नेहमीचेच झाले आहे. मागच्‍या विधानसभा निवडणुकीच्‍यावेळीही या दोन्‍ही पक्षांमध्‍ये ‘तू तू मैं मैं’ सुरू झाले होते; पण शेवटी युती झाली. आणि विजय अवघ्‍या १,३०० मतांनी जिंकून आले. अशा परिस्‍थितीत पुन्‍हा एकदा काँग्रेस पक्षाने सरदेसाई यांनी युतीची बोलणी स्‍थगित ठेवली आहे, हे निमित्त करून पुन्‍हा इशारा देण्‍यास सुरू केले आहे. सध्‍याची परिस्‍थिती पाहता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्‍यातील संबंध बरेच ताणले आहेत. अशा परिस्‍थितीत दामू नाईक यांच्‍या मनात जर ‘खुशी के लड्डू’ फुटू लागले तर त्‍याला कोण दोष देईल बरे? दामू निवडणुकीसाठी पुन्‍हा एकदा तयार झाले आहेत, असे सगळेच म्‍हणू लागले आहेत, हेही लक्षात ठेवायला पाहिजे.

Khari Kujbuj Political Satire
Goa Rent A Cab: 'रेन्ट-अ-कॅब'च्या मनमानीला लगाम; गोव्यात आता परवाने अन् वाहन तपासणीसाठी समान नियम

आणखी एक पतसंस्था डबघाईला

घरात उंदीर जास्त झाले तर ते शेवटी ज्या घराने आसरा दिला तेच घर पोखरू लागतात. गोव्यातील काही पतसंस्थांचीही स्थिती तशीच झाली आहे. काही पतसंस्था त्या संस्थेतील संचालकांनीच पोखरल्याने शेवटी डबघाईला आल्या. सध्या कुडचडे येथील एका पतसंस्थेचीही तशीच अवस्था झाली आहे. या पतसंस्थेतील संचालकांनी आपल्याच आप्तांना सढळ हस्ते कर्जे वाटल्याने आणि नंतर त्यांची वसुली करण्यात फारसा रस न दाखविल्याने शेवटी व्हायचा तोच परिणाम झाला. सध्या या पतसंस्थेत आठ कोटींचा गफला झाल्याने या पतसंस्थेवर प्रशासक नेमण्यात आले असून गुंतवणूकदारांनी आपली रक्कम काढून घेण्यास सुरवात केली आहे. आता काही संचालक एका राजकारण्याकडे जाऊन ही आठ कोटींची रक्कम तुम्ही भरा आणि संपूर्ण संस्था तुमच्या ताब्यात घ्या, असे सांगू लागले आहेत, अशी बातमीही हाती लागली आहे.

सार्दिननी दिला चर्चेचा विषय!

दक्षिण गोव्याचे माजी खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी कॅसिनोंचे समर्थन केले आहे, त्यांनी कॅसिनोंचा अजिबात विरोध केला नाही. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते नक्कीच बुचकळ्यात पडले असतील. सार्दिन यांनी मुख्यमंत्री असताना काहीच कॅसिनोंना परवानगी दिली होती; पण त्यावेळी काँग्रेसचे सरकार नव्हते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. भाजपमधील अनेकजणांना हा इतिहास माहीतही असेल; पण सार्दिन आता काँग्रेसवासी आहेत. त्यामुळे भाजप काही झाले तरी कॅसिनोविषयी काँग्रेसलाच कठघऱ्यात उभे करणार, हे स्पष्ट आहे. एका बाजूला मांडवीतून कॅसिनो हटवण्यासाठी सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचा दबाव गट निर्माण झाला आहे, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पाहता कॅसिनोंचा विषय सतत चर्चेत राहणार हे नक्की.

Khari Kujbuj Political Satire
Goa Cricket: गोव्याचा यष्टिरक्षकाचा प्रश्न सुटणार? शिवेंद्र भुजबळच्या फलंदाजीने दिला मोठा दिलासा

दळवींची आक्रमकता

सध्या फोंड्यात पाणीटंचाई ही प्रमुख समस्या बनायला लागली आहे. याबाबतीत परवा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी फोंड्यात बैठक घेतली. त्यावेळी ही समस्या मांडताना फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी बरेच आक्रमक झालेले दिसले. त्यांचेही बरोबर आहे म्हणा. पाणीटंचाई विरुद्ध ‘साबांखा’च्या कार्यालयावर जाणाऱ्या बहुतेक मोर्चाचे नेतृत्व त्यांनीच केलेले असल्यामुळे त्यांना या समस्येची चांगलीच जाणीव आहे, यात शंकाच नाही. त्याचेच पडसाद त्यांच्या बोलण्यातून उमटताना दिसत होते; पण उपस्थितांत मात्र चर्चा सुरू होती की, दळवींची ही आक्रमकता म्हणजे त्यांच्या आगामी भूमिकेची ‘नांदी’ तर नव्हे ना? आता ही ‘नांदी’ की ‘भैरवी’ हे कळायलाही तसा जास्त वेळ राहिलेला नाही.

आदेशावर प्रश्नचिन्ह

उच्च न्यायालयाने सत्र न्यायालय आणि ‘जेएमएफसी’ न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करून काही निष्कर्ष अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे न्यायालयीन आदेशातील चुका नेमक्या किती गंभीर होत्या, याची चर्चा आता सुरू झाली आहे. एखाद्या आदेशात एक-दोन त्रुटी असतील तर त्या कायदेशीर प्रक्रियेत दुरुस्त होऊ शकतात; पण चुका अधिक असतील तर मग ‘दंडाधिकारी असो वा न्यायाधीश, कार्यक्षमतेचा हिशेब कोण घेणार?’ असा सवाल सध्या चर्चेत आहे. आता ही चर्चा थांबवायची असेल तर केवळ चर्चा पुरेशी नाही, तर ठोस कार्यवाहीही दिसायला हवी. त्यामुळे संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेबाबत काही कारवाई किंवा प्रशासकीय निर्णय होणार का? याकडेच सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन आदेशावर उच्च न्यायालयाने भाष्य केले. आता पुढचा ‘आदेश’ कोण देणार, याचीच उत्सुकता!

Khari Kujbuj Political Satire
Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

आहे का याचे उत्तर?

मागच्या विधानसभा निवडणुकीत चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालंका या दोघांनी ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढविली होती. चर्चिलनी बाणावली तर वालंकानी नावेलीतून आपले नशीब आजमावून बघितले होते. मात्र, दोघांच्या पदरी घोर निराशाच पडली होती. ही आमची घोडचूक होती, असे आता चर्चिल सांगतात. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल पटेल यांनी आम्हाला राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडणूक लढा, असे सांगितले होते, हे सांगण्यासही चर्चिल विसरत नाहीत. मात्र, यापूर्वी २०१४ साली याच महाशयांनी दक्षिण गोवा लोकसभा निवडणूक तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारीवर लढविली होती व यावेळी भाजपचे नरेंद्र सावईकर जिंकून आले होते. याचा मात्र त्यांना सोयीस्कर विसर पडत आहे; परंतु सासष्टीकार त्यांना आता हाच प्रश्न विचारू लागले आहेत. आहे का याचे उत्तर चर्चिल यांच्याकडे?

कुंकळ्ळीवरील दावा!

राजकारणात कधी कोणाचे तारे चमकणार हे सांगता येत नाही. जर राजकीय आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर विद्यमान मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्याबरोबर बाबू कवळेकर यांचे राजकीय भवितव्य पणाला लागण्याचा धोका आहे. राजकीय आरक्षणाच्या भीतीमुळे सुभाष फळदेसाई, एल्टन डिकॉस्टा व बाबू कवळेकर आपला आरक्षित मतदारसंघ सरेंडर करून सुरक्षित मतदारसंघ शोधणार हे निश्चित. एल्टन वेळ्ळी मतदारसंघावर दावा सांगतात तर सुभाष यांची नजर कुडचडे किंवा कुंकळ्ळीवर असल्याचे सांगण्यात येते. बाबू कवळेकर यांचा दुसरा पर्याय कुंकळ्ळी असल्याची चर्चा आहे. अशा स्थितीत भाजपचे सुदेश भिसे यांनी आता कुंकळ्ळी मतदारसंघावर दावा केला आहे. आता बघूया कुंकळ्ळीत सुदेशची डाळ शिजते की, सुभाष किंवा बाबू कमळावर दावा सांगतात. घोडा मैदान जवळच आहे.

जागा पाहिली होती का?

राज्यभर पुतळे उभारण्याची चर्चा रंगली; पण मुरगाव पोर्ट प्राधिकरणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सध्या सरकारच्याच अंगलट आल्याची चर्चा सुरू आहे. उच्च न्यायालयाने हा पुतळा हटविण्याचे आदेश दिल्यानंतर आता खरी गंमत सुरू झाली- पुतळा हटवायचा; पण ठेवायचा कुठे? मग जागा निश्चित करण्याची सरकारची धावपळ सुरू झाली. आता लोकांमध्ये चर्चा अशी की, पुतळा उभारताना जागा शोधायला फार वेळ लागला नाही; पण न्यायालयाच्या आदेशानंतर तो हलवताना जागेचा शोध घ्यावा लागतोय! उद्या राज्यातील इतर ठिकाणी उभारलेल्या पुतळ्यांवरही आक्षेप घेऊन विषय न्यायालयात गेला आणि तेथेही सरकारची बाजू अडचणीत आली, तर ‘पुतळे उभारण्यापूर्वी जागा पाहिली होती का?’ हा प्रश्न सरकारलाच विचारावा लागेल.

Khari Kujbuj Political Satire
Goa Stray Dog: भटक्या कुत्र्यांसाठी कुडका येथे निवारा! पणजी महापालिकेला न्यायालयाचा मोठा आदेश

फेरीबोटीचा निसर्ग अनुभव

चोडण-रायबंदर फेरीचा गुरुवारचा प्रवास प्रवाशांसाठी नेहमीच्या जलप्रवासापेक्षा काहीसा वेगळाच अनुभव ठरला. फेरी किनाऱ्यावरील झाडांच्या इतकी जवळून धावली की, झाडांच्या फांद्यांनी थेट फेरीत ‘हजेरी’ लावत तिच्यावरून हात फिरवण्यास सुरवात केली. फांद्या फेरीला घासत असताना दुचाकीस्वारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवर उभे असलेले काही दुचाकीस्वार फांद्या अंगावर येऊ नयेत म्हणून चक्क वाकून, बाजूला सरकत आणि मान वाचवत प्रवास करताना दिसले. त्यामुळे काही क्षणांसाठी फेरीवर जलप्रवास कमी आणि ‘फांद्यांपासून बचाव’ अभियानच अधिक सुरू असल्याचे चित्र होते.

कळंगुटमधील अनोखे आंदोलन

कळंगुटमध्ये रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्याविरोधात स्थानिकांनी चक्क बोट उतरवून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. त्यामुळे ‘वॉटरस्पोर्ट्‌ससाठी समुद्र गाठण्याची गरजच काय, रस्त्यावरच सुविधा उपलब्ध!’ अशी चर्चा रंगली. रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून बोट चालवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यटकांसाठी समुद्रकिनारी जलक्रीडेची जाहिरात करणाऱ्या कळंगुटमध्ये आता स्थानिकांनी ‘रस्त्यावरची जलक्रीडा’ सुरू केल्याचे चित्र दिसले. मात्र, ही बोट मनोरंजनासाठी नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आरसा असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. सांडपाण्याची समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी करत या अनोख्या आंदोलनातून संबंधित यंत्रणेला चांगलाच ‘पाण्यातला धडा’ देण्यात आला.

ढवळीकरांचा नोव्हेंबरचा मुहूर्त!

भाजपबरोबर ‘मगो’च्या युतीचा विषय आणि फोंडा मतदारसंघाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत, त्या चर्चांना नोव्हेंबरमध्ये पूर्णविराम मिळेल, असे भाकित वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले आहे. ढवळीकर यांनी काँग्रेसचे आमदार भाजपमध्येही येणार असल्याचे दुसरे भाकित केले आहे. आता त्यांची ही भाकिते किती खरी ठरतील, हा मोठा प्रश्‍नच आहे. अनुभवी आणि जाणते नेते सांगतात म्हटल्यावर त्यात तथ्य असेलच असे मानायला काही हरकत नाही; परंतु नोव्हेंबरमध्ये असा कोणता मुहूर्त ढवळीकरांनी शोधला आहे, की ते तोपर्यंत थांबा म्हणून सांगतात, याचे कोडे मात्र ‘मगो’च्या धुरिणांनाही पडलेले असणार आहे.

Khari Kujbuj Political Satire
Mallikarjun Kharge Rally In Goa: खर्गेंच्या सभेनं गोव्यातलं राजकीय वातावरण तापलं; विधानसभा निवडणुकीत काँग्रेस मारणार मुसंडी?

अन् फाईल्सचा खोळंबा!

म्हापसा पालिकेत सध्या एका नव्या फर्मानाची जोरदार चर्चा रंगली आहे. पालिकेची मुदत संपल्याने कारभार प्रशासकांच्या हाती गेला खरा; पण मॅडम साहेबांचे दर्शन आठवड्यातून फक्त शुक्रवारीच घडते. अशातच ‘प्रत्येक फाईल माझ्या नजरेखालूनच गेली पाहिजे अन् माझ्याच टेबलावर हवी,’ असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, खरा पेच असा आहे की, त्याच शुक्रवारी सकाळपासून ते उशिरा दुपारपर्यंत स्थानिक आमदार महोदयही जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी पालिकेत हजर असतात. त्यामुळे एकाच दिवशी एका बाजूला आमदारांचा दरबार, तर दुसऱ्या बाजूला प्रशासकीय मंजुरीसाठी ताटकळणाऱ्या फाईल्सची रिघ, असा गोंधळ उडत आहे. अवघ्या काही तासांत शेकडो फाईल्स तपासून निर्णय घेणे केवळ अशक्य असल्याने व आठवड्यातून एकच वार, तरीही संपूर्ण नियंत्रणाचा अट्टहास, या अजब कारभारामुळे जनतेची कामे फाईल्सच्या ढिगाऱ्याखाली अडकून पालिकेचा पुरता बोजवारा उडणार, अशी चर्चा सध्या पालिकेच्या वर्तुळात रंगू लागली आहे.

राहुल साहेबांच्या गाडीला धडक

कांपाल परिसरात मालवाहू वाहनाने पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या सरकारी वाहनाला धडक दिल्याने पोलिस यंत्रणेत काही काळ खळबळ उडाली. नेहमी नागरिकांच्या वाहनांची कागदपत्रे तपासणाऱ्या पोलिसांच्या गाडीचीच कागदपत्रे आज मालवाहू वाहनाने तपासल्याची चर्चा रंगली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. मात्र, साहेबांच्या गाडीला धडक देणाऱ्या चालकाला आता ‘पोलिसांचा जवळून परिचय’ मिळाल्याचे मिश्‍कीलपणे बोलले जात आहे.

ज्येष्ठ नागरिकांना हवे प्रेम

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत. ज्येष्ठांना सुरक्षा मिळावी, चांगले वर्तन घरच्यांकडून मिळावे यासंदर्भात जागृती करण्याकडे लक्ष जावे हा आजच्या या दिवसाचा हेतू. हल्ली वृद्धाश्रम ही समाजाची गरज होणे, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी नंबर लावून टोकन घेऊन ठेवणे ही समाज उन्नतीची लक्षणे होय? आज मुले विसरतात की तेही वृद्ध होणार. सकाळी मुलगा जात होता, बापाने विचारले - बाळा कुठं जातो? तो उत्तरतो... पणजीला. वडील परत विचारतात, कुठे जातोस? मुलगा कंटाळतो, बाबा, कितीवेळा विचारणार तेच तेच. बाप सांगतो- मी तुला टेस्ट करत होतो. या खिडकीवर बसून तू मला विचारत होतास. तो कोण? आकाशाकडे बोट दाखवून मी म्हणायचो - बाळा, तो चांदोमामा. तू परत विचारायचास. शंभरदा. मी शंभरदा चांदोमामा उच्चारत होतो.

Khari Kujbuj Political Satire
Goa Politics: खर्गेंच्या दौऱ्यावरून गोव्यात ‘राजकीय घमासान! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली शाब्दिक चकमक

प्रियोळमधील तयारी

प्रियोळ मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण काय तर, ‘एसटी’ आरक्षणाचा प्रश्‍न. आता हे ‘एसटी’ आरक्षण प्रियोळ मतदारसंघाला मिळाले तर विद्यमान आमदार गोविंद गावडे यांना सुकर ठरेल. मात्र, हे आरक्षण पुढे ढकलले तर माजी आमदार दीपक ढवळीकर हे निवडणूक लढवण्यास तयारच आहेत. मात्र, ‘एसटी’ आरक्षण प्रियोळला मिळाले तरीही दीपकनी ‘एसटी’ उमेदवाराची तरतूद करून ठेवली आहे. यावेळेला ‘मगो’तर्फे ‘एसटी’ समाजाचा युवा उमेदवार निवडणुकीत उतरवण्याची सर्व ती तयारी सुरू आहे, हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com