Goa Politics: खरी कुजबुज; चवथीला नारळाच्याच पोटल्या द्या ना!

Khari Kujbuj Political Satire: राज्यात गॅस सिलिंडर्सचा काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आला. गेल्या सहा महिन्यांच्या काळात तीन ठिकाणी छापे टाकून संशयितांना पकडण्यात आले.
Goa Political Updates
Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
Published on
Updated on

चवथीला नारळाच्याच पोटल्या द्या ना!

गोंयकारांची चवथ आता अगदी दारांत येऊन ठेपली आहे, पण यंदा नारळांच्या दराने सगळ्यांच्याच तोंडचे पाणी पळविले आहे. फलोद्यानाने 45 रु. दराने नारळ पुरविण्याची घोषणा केलेली असली, तरी ते हातोहात खपत असतात. हा सध्याचा म्हणे अनुभव आहे व त्यामुळे 80 ते 100 रु. दराने नारळ खरेदी करून चवथ कशी करायची? असा प्रश्न लोकांना पडला आहे. यंदा निवडणूक तशी जवळ नसल्याने राजकारण्यांकडून चवथीच्या पोटल्यांचीही म्हणे तशी तयारी नाही. त्यामुळे या लोकांनी चवथीला अन्य वस्तूंच्या पोटल्यांच्या ऐवजी लोकांना दहा दहा नारळ चवथीची भेट म्हणून दिली असती तरी तो मोठा दिलासा ठरला असता अशी चर्चा ऐकायला मिळते. मागे एकदा नारळ टंचाई झाली असता काही राजकारण्यांनी विशेषतः महिला नेत्यांनी सवलतीच्या दरांत नारळ उपलब्ध केले होते, पण यंदा तसे काही संकेत मिळत नसल्याने लोकांना महाग दरांत नारळ खरेदी करावे लागतील की काय अशी शंका अनेकांना वाटू लागली आहे. ∙∙∙

रवींचा ‘खुला’ अधिकार!

चतुर्थी जवळ आली असतानाच राज्यात गॅस सिलिंडर्सचा काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा उघडकीस आला. गेल्या सहा महिन्यांच्या काळात तीन ठिकाणी छापे टाकून संशयितांना पकडण्यात आले. मंत्री रवी नाईक यांच्याकडे या नागरी पुरवठा खात्याचा ताबा आहे. रवींचे एक चांगले असते, ते म्हणजे आपल्या ताब्यात असलेल्या खात्यातील अधिकाऱ्यांना ते खुला अधिकार देतात. हात आखडता घेत नाहीत, त्यामुळे काम करायला बरं वाटतं, असे अधिकारी म्हणतात. मागच्या काळात मुख्यमंत्री असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम त्यांनी केले अजूनही लोक त्याची आठवण काढतात. मात्र त्यानंतर अशी जरब कुणालाच बसवता आली नाही. लोकच बोलताहेत हे..! ∙∙∙

गावडे काय बोलले!

छाया पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमानिमित्ताने मंगळवारी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत एका मंचावर आले. एका मुलाखतीत अलिकडे मुख्यमंत्र्यांनी आपली गावडे यांच्यासोबतची मैत्री आपल्या बाजूने कायम असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर झालेल्या या कार्यक्रमाकडे त्याचमुळे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. विशेषतः माध्यमकर्मींची गर्दी या कार्यक्रमाला असल्याने दोन्ही नेत्याची देहबोली काय असेल याविषयी उत्सुकता होती. मंचावर दोन्ही नेते सहजपणे वावरले. कानात काहीतरी कुजबुजलेही त्यामुळे मंत्रिपद गेल्यानंतर गावडे व मुख्यमंत्र्यांतील मैत्रीत सार्वजनिकरीत्या दाखवण्याइतपत तरी दरी निर्माण झालेली नाही, असे दिसून आले. तरीही गावडे यांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितले असेल याचे कुतूहल कायम राहिलेच. ∙∙∙

फॉरवर्डचा खटाटोप

गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई विधानसभेतील सर्वात आक्रमक विरोधी आमदार म्‍हणून ओळखले जातात. पण, गत पावसाळी अधिवेशनात विजयनी आक्रमकपणाला काहीसा आवर घालत जनता दरबाराद्वारे लोकांकडून आलेल्‍या प्रश्‍‍नांवर सरकारकडून उत्तरे मिळवण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍यातील जे प्रश्‍‍न सुटले किंवा सरकार सध्‍या सोडवत आहे, त्‍याची माहिती गोवा फॉरवर्ड तत्‍काळ प्रसारमाध्‍यमांपर्यंत पोहोचवत आहे. विजयनी ७ ऑगस्‍टला सभागृहात दक्षिण गोवा जिल्‍हा इस्‍पितळातील वरचे दोन मजले रिकामी ठेवून सरकार रुग्‍णांना जमिनीवर झोपण्‍यास भाग पाडत असल्‍याचा मुद्दा लावून धरला होता. त्‍यावर सरकारने तत्‍काळ कार्यवाही न केल्‍यामुळे विजयनी आता थेट मुख्‍य सचिवांना पत्र पाठवले आहे. पुढील काही दिवस गोवा फॉरवर्ड अशाच पद्धतीने सरकारला आश्‍‍वासनांनी आठवण करून देणार आहे. अधिवेशनानंतर आपण पुन्‍हा लोकांसमोर जाणार, अशी घोषणा विजयनी आधीच केलेली होती. त्‍यावेळी जनतेच्‍या प्रश्‍‍नांना उत्तरे द्यावी लागू नयेत, यासाठी तर गोवा फॉरवर्डचा हा खटाटोप नसेल ना? ∙∙∙

काँग्रेस व फॉरवर्डचे ‘आप’च्‍या पावलावर पाऊल!

सध्‍या गोव्‍यातील विरोधी पक्ष एवढे विस्‍कळीत झाले आहेत, की कोण काय करतोय, त्‍याचा थांगपत्ता लागत नाही, तर दुसऱ्या बाजूने कुणी एकाने कुठलीही मोहीम हाती घेतली तर त्‍याच प्रकारची कॉपी पेस्‍ट मोहीम इतर पक्षांकडूनही चालवली जाते. सध्‍या गोव्‍यातील आम आदमी पक्षाने गोव्‍यातील खराब रस्‍त्‍यांवर लक्ष वेधण्‍यासाठी ‘भाजपचे बुराक’ ही मोहीम संपूर्ण राज्‍यात सुरु केली. तशाच प्रकारची आणखी एक मोहीम काल काँग्रेसने वास्‍कोत राबवली. तर पेडणेत याच मोहीमेचा भाग गोवा फॉरवर्डनेही राबवला. आता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या दोन्‍ही पक्षांनी आपची वाट पकडली, की गोव्‍यात अजुनही इंडिया आघाडी कायम आहे? आणि आमच्‍यात कुठलेही मतभेद नाहीत, हे दाखवायचा त्‍यांचा हा प्रयत्‍न होता का? ∙∙∙

‘त्या’ महिलेवर कारवाई होणार?

मंगळवारी पणजीमध्ये एका महिलेने आपली गाडी रस्त्यावर आडवी लावून ठेवल्याने एक नवा वाद सुरू झाला आहे. यामुळे महत्त्वाच्या प्रसंगासाठी सायरन वाजवत निघालेल्या अग्निशमन दलाच्या गाडीला पुढे जाण्यासाठी खूप उशीर झाला. ही घटना पाहून तिथे उपस्थित लोकांनी संताप व्यक्त केला. अशा बेजबाबदार वागण्यामुळे एखाद्याचा जीव धोक्यात येऊ शकतो, असे म्हणत अनेकांनी या महिलेवर टीका केली. आता तर तातडीने कारवाई करण्याची मागणी सर्व माध्यमातून होत आहे. आता या प्रकरणी पोलिस काय भूमिका घेतात आणि त्या महिलेवर दंड किंवा इतर कोणती कारवाई होते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

Goa Political Updates
Goa Politics: खरी कुजबुज; मुख्‍यमंत्र्यांचा दिल्ली दौरा ‘त्‍या’साठी?

रवींद्र भवनाचे कवित्व...

बार्देश तालुक्याचे रवींद्र भवन हे म्हापसा शहरात उभे राहणार, असे म्हापशाचे आमदार दरवेळी सांगतात. मात्र, अद्याप या रवींद्र भवनाविषयी सरकार दरबारी हालचाली दिसत नाहीत. याच रवींद्र भवनाच्या विषयावरुन जोशुआ यांना विरोधकांची टीका व बोलणी ऐकावी लागते. याविषयी म्हापशातील एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर माजी नगराध्यक्षांनी आमदार जोशुआ हे अकार्यक्षम असल्याचे म्हटले. जोशुआ हे गेल्या तीन वर्षांपासून लोकांना मूर्ख बनवत आहेत. ते म्हणाले की, म्हापसा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण असेल यावर म्हापशातील रवींद्र भवनाची पायाभरणी २०२८ मध्ये अवलंबून असेल. या ग्रुपवर आमदार देखील आहेत. किमान हे ऐकून आमदार साहेब आपला विद्यमान आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी शहरात रवींद्र भवनाची पायाभरणी करण्यास यश मिळवतात, की पुन्हा म्हापसेकरांच्या हाती गाजर देतात, हे वेळप्रसंगी समजेल. ∙∙∙

Goa Political Updates
Priol Political Crisis: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

...प्रकाश सर हरले!

माजी सहकार मंत्री व राज्यात आदर्श सहकार व केपे अर्बन सहकारी बँकेचे मोठे जाळे फैलावण्यात यशस्वी ठरलेले प्रकाश सर गोवा राज्य सहकारी बँकेच्या निवडणुकीत हरले. गोवा डेअरीचे माजी अध्यक्ष श्रीकांत नाईक यांनी प्रकाश सरांचा दारुण पराभव केला. प्रकाश सर तसे भाजपचेच म्हणजे सत्ताधारी गटाचे. निवडणुकीत विजयी ठरलेल्या सगळ्या संचालकांना मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा होता. प्रकाश वेळीप यांनी गोविंद गावडे प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी व सत्ताधारी भाजपाशी वैर पत्करले आणि सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा गोवा राज्य सहकारी बँकेची निवडणूक हरले. पाण्यात राहून माशांशी वैर पत्करणे धोक्याचे असते, हे बोधवाक्य प्रकाश वेळीप यांनी कदाचित ऐकले नसणार.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com